Revised Common Lectionary (Semicontinuous)
त्सादे
137 परमेश्वरा, तू चांगला आहेस
आणि तुझे नियम योग्य आहेत.
138 तू आम्हाला करारात चांगले नियम दिलेस
त्यावर आम्ही खरोखरच विश्वास ठेवू शकतो.
139 माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत.
माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.
140 परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो
याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते.
141 मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत.
पण मी तुझ्या आज्ञा विसरत नाही.
142 परमेश्वरा, तुझा चांगलुपणा सदैव राहो
आणि तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
143 माझ्यावर खूप संकटे आली आणि
वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात.
144 तुझा करार नेहमीच चांगला असतो.
तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन.
चांगली शाखा
14 हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांना विशेष वचन दिले आहे मी कबूल केलेल्या गोष्टी करण्याची वेळ येत आहे. 15 त्यावेळी दावीदाच्या वंशवृक्षाची एक चांगली शाखा मी वाढवीन ती ‘शाखा’ देशासाठी चांगल्या आणि योग्य गोष्टी करील. 16 ह्या ‘शाखेच्या’ काळात यहूदातील लोकांचे रक्षण केले जाईल. लोक यरुशलेममध्ये सुखरुप राहतील. त्या शाखेचे नाव ‘परमेश्वर चांगला आहे’” असे आहे.
17 परमेश्वर म्हणतो, “दावीदाच्या घराण्यातील माणूस नेहमीच सिंहासनावर बसेल व इस्राएलवर राज्य करील. 18 आणि याजक नेहमी लेवी घराण्यातील असतील. ते याजक नेहमी माझ्यासमोर उभे राहतील आणि ते मला होमार्पण, धान्य अर्पण करतील आणि बळीही अर्पण करतील.”
19 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 20 परमेश्वर म्हणतो, “दिवस आणि रात्र यांच्याबरोबर मी करार केला आहे. ते निरंतर राहतील असे मी मान्य केले, तुम्ही तो करार बदलू शकत नाही. दिवस आणि रात्र नेहमी योग्य वेळेलाच येतील. तुम्ही जर हा करार बदलू शकला, 21 तरच तुम्ही माझा दावीद व लेवी यांच्याबरोबर झालेला करार बदलू शकाल. मग दावीदाचे वंशज राजे होणार नाहीत आणि लेवीच्या घराण्यातून याजक येणार नाहीत. 22 पण मी माझा सेवक दावीद आणि लेवीचे कूळ यांना मोठा वंश देईन. आकाशातील ताऱ्यांएवढी त्यांच्या वंशजांची संख्या असेल कोणीही आकाशातील तारे मोजू शकत नाही. अथवा समुद्रकाठच्या वाळूच्या कणांएवढी त्यांची संख्या असेल. कोणीही वाळूचे कण मोजू शकत नाही.”
23 यिर्मयाला परमेश्वराचा पुढील संदेश मिळाला 24 “यिर्मया, लोक काय बोलतात, ते तू ऐकलेस का? ते लोक म्हणतात ‘परमेश्वर इस्राएल आणि यहूदा या घराण्यापासून दूर गेला. परमेश्वराने त्या लोकांची निवड केली होती.’ पण आता तो त्यांचा राष्ट्र म्हणून सुद्धा स्वीकार करीत नाही.”
25 परमेश्वर म्हणतो, “माझा दिवस व रात्र यांच्याबरोबरच्या कराराचा जर भंग झाला आणि मी जर आकाश आणि पृथ्वी ह्यांच्यासाठी नियम केले नसते, तर कदाचित् मी त्या लोकांना सोडले असते. 26 मग कदाचित याकोबाच्या वंशजांचा मी त्याग केला असता आणि दावीदच्या वंशजांना, अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या वंशजांवर राज्य करु दिले नसते. पण दावीद माझा सेवक आहे आणि मला त्या लोकांची दया येईल आणि प्रेम वाटेल. मी कैद्यांना पुन्हा त्यांच्या मायभूमीत परत आणीन.”
1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रषित झालेला पौल याजकडून, तसेच आपला बंधु तीमथ्य याजकडून, देवाची करिंथ येथील मंडळी आणि अखयातील संपूर्ण प्रदेशातील देवाच्या लोकांना 2 देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्त याजकडून कृपा व शांति असो.
पौल देवाचे उपकार मानतो
3 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, करुणायुक्त देवपिता. तो सांत्वन करणारा देव आहे. 4 तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करु शकू. देव जे सांत्वन आम्हाला देतो त्याच सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करु शकतो. 5 आणि ख्रिस्ताच्या पुष्कळ दु:खामध्ये सहभागी होतो, त्याच प्रकारे ख्रिस्ताद्वारे आम्हांला पुष्कळ सांत्वन मिळते 6 जर आमच्यावर संकटे येतात तर ती संकटे तुमच्या सांत्वनासाठी आणि तारणासाठी आहेत, जर आमच्याकडे सांत्वन आहे तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे. यामुळे आम्हाला जे दु:ख आहे तशाच प्रकारचे दु:ख सहन करायला, धीराने सहन करायला मदत होते. 7 आमची तुमच्याविषयीची आशा बळकट आहे. कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दु:खाचे भागीदार आहात तसे सांत्वनाचेही भागीदार आहात.
8 बंधूंनो, आशिया प्रांतात जो त्रास आम्ही सहन केला त्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही. आम्हांला तेथे मोठे ओझे होते. आमच्या शक्तिपलीकडचे ते ओझे होते. आम्ही जीवनाविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती. 9 खरोखर आम्हांला वाटत होते की, आम्ही मरु, पण आम्ही आपल्या स्वतःवर भरंवसा ठेवू नये, यासाठी हे घडले. हे यासाठी घडले की, जो मनुष्यांना मरणातून उठवितो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा. 10 देवाने आम्हांला मरणाच्या मोठ्या संकटातून वाचविले. आणि देव आम्हांला पुढेदेखील वाचवील. आम्ही त्याच्यावर आमची आशा ठेवली आहे. यासाठी की, तो यापुढे ही आम्हांस सोडवील. 11 तुम्ही प्रार्थना करण्याने आम्हांला मदत करावी. मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हाला आशीर्वादित केले आहे.
2006 by World Bible Translation Center