Revised Common Lectionary (Semicontinuous)
दु:खी माणसाची प्रार्थना तो अगदी दुबळा असतो आणि त्याला त्याची कैफियत परमेश्वरासमोर मांडायची असते तेव्हाचे स्तोत्र.
102 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि
माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
2 परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस.
माझ्याकडे लक्ष दे.
मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
3 माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे.
हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.
4 माझी शक्ती निघून गेली आहे.
मी वाळलेल्या, मरणाला टेकलेल्या गवताप्रमाणे आहे.
मी जेवण करण्याचे सुध्दा विसरलो.
5 माझ्या दुखामुळे माझे वजन कमी होत आहे.
6 मी वाळवंटात राहणाऱ्या घुबडाप्रमाणे एकाकी आहे.
जुन्या पडझड झालेल्या इमारतीतल्या घुबडाप्रमाणे मी एकाकी आहे.
7 मी झोपू शकत नाही.
मी छपरावर असलेल्या एकाकी पक्ष्याप्रमाणे आहे.
8 माझे शत्रू नेहमी माझा अपमान करतात.
ते माझी चेष्टा करतात आणि मला शाप देतात.
9 माझे अन्न हे माझे सर्वांत मोठे दु:ख आहे.
माझे अश्रू माझ्या पेयात पडतात.
10 का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस.
तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.
11 दिवस अखेरीला पडणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य आता जवळ जवळ संपत आले आहे.
मी वाळलेल्या आणि मरायला टेकलेल्या गवतासारखा आहे.
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील
तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील.
तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात.
त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील.
देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक
पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल.
देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
शमायाला देवाचा संदेश
24 शमायालासुद्धा संदेश दे. शमाया नेहेलमी घराण्यातील आहे. 25 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “शमाया, तू यरुशलेममधील सर्व लोकांना पत्रे पाठविलीस. मासेयाचा मुलगा याजक सफन्या ह्यासही तू पत्रे पाठविलीस. तू सर्व याजकांनाही पत्रे पाठविलीस. परमेश्वराची परवानगी न घेता, स्वतःच्या नावाने तू पत्रे पाठविलीस. 26 शमाया, सफन्याला पाठविलेल्या पत्रात तू असे लिहितोस ‘सफन्या, परमेश्वराने तुला यहोयदाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. परमेश्वराच्या मंदिराचा तू उत्तराधिकारी आहेस. जो कोणी वेड्याप्रमाणे [a] वागेल, वा संदेष्टा असल्याचे भासवेल, त्याला तू अटक करावेस. तू त्या माणसाचे पाय लाकडाच्या खोड्यात अडकवून त्याच्या गळ्यात लोखंडाची बेडी घालावी. 27 हल्ली यिर्मया आपण संदेष्टा असल्याचे दाखवीत आहे. मग तू त्याला अटक का केले नाहीस? 28 यिर्मयाने बाबेलमध्ये आम्हाला असा संदेश पाठविला तुम्हाला बाबेलमध्ये बराच काळ राहावे लागेल, म्हणून घरे बांधा, वस्ती करा, बागा लावा व स्वतः पिकविलेले खा.’”
29 याजक सफन्याने हे पत्र संदेष्टा यिर्मयाला वाचून दाखविले. 30 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला तो असा: 31 “यिर्मया, बाबेलमध्ये असलेल्या सर्व कैद्यांना पुढील निरोप पाठव नेहेलमी घराण्यातील शमाया ह्या माणसाबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘शमायाने तुम्हाला उपदेश केला. पण मी त्याला पाठविलेले नाही. शमायाने तुम्हाला खोटे सांगून त्यावर विश्वास ठेवायला लावले. 32 शमाया असे वागला म्हणून परमेश्वर म्हणतो की मी नेहेलमी घराण्यातील शमायाला लवकरच शिक्षा करीन. मी त्याच्या घराण्याचा सर्वनाश करीन. मी माझ्या लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी करीन, त्यात त्याचा वाटा असणार नाही.’” हा परमेश्वराचा संदेश आहे “‘शमायाने लोकांना परमेश्वराविरुद्ध पढविले म्हणून मी त्याला शिक्षा करीन.’”
देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा
10 शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा. 11 देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे. 12 कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे. 13 म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.
14 म्हणून भक्क मपणे उभे राहा! सत्याने आपली कंबर बांधा, नीतीमत्त्वाचे उररत्राण धारण करा. 15 आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला. 16 या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल. 17 आणि तारणाचे शिररत्राण घ्या, आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे, तो घ्या. 18 प्रत्येक प्रंसांगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक विनंति करुन आत्म्यात प्रार्थना करा. चिकाटी व प्रार्थनेसह सर्व संतांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत राहा. कारण जेव्हा मी तोंड उघडेन तेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा. यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करुन देणे शक्य व्हावे. 20 त्याच्या वतीने मी साखळदंडनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे. धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा.
2006 by World Bible Translation Center