Revised Common Lectionary (Semicontinuous)
मेम
97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते.
मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात.
तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे.
कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त
कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून
दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस
म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
103 माझ्या तोंडात तुझे शब्द
मधापेक्षाही गोड आहेत.
104 तुझी शिकवण मला शहाणा करते.
त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.
16 मग राज्यकर्ते व सर्व लोक बोलले, त्या लोकांनी याजकांना व संदेष्ट्यांना सांगितले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराकडून आपल्या देवाकडून येतात.”
17 नंतर काही वडीलधारी (नेते) उभे राहिले. ते सर्व लोकांना उद्देशून म्हणाले, 18 “संदेष्टा मीखा हा मोरष्टचा राहणारा होता. हिज्कीया यहूदाचा राजा असताना मीखा संदेष्टा होता. मीखाने यहूदाच्या लोकांना पुढील गोष्टी सांगितल्या. [a]
‘सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
सियोनेचा नाश होईल
सियोन नांगरलेले शेत होईल.
यरुशलेम दगडांची रास होईल.
मंदिर असलेल्या टेकडीवर रान माजेल.’ (A)
19 “हिज्कीया यहूदाचा राजा होता. पण हिज्कीयाने मीखाला ठार मारले नाही. यहूदातील कोणीही मीखाला ठार मारले नाही. हिज्कीयाला परमेश्वराबद्दल आदर होता, हे तुम्हाला माहीतच आहे. त्याला परमेश्वराला प्रसन्न ठेवण्याची इच्छा होती. हिज्कीया यहूदाचे वाईट करील असे परमेश्वराने सांगितले होते. पण हिज्कीयाने परमेश्वराची करुणा भाकली आणि परमेश्वराचे हृदयपरिवर्तन झाले. परमेश्वराने त्या वाईट गोष्टी घडू दिल्या नाहीत. आपण जर यिर्मयाला इजा केली, तर आपण स्वतःवरच खूप संकटे ओढवून घेऊन ती आपलीच चूक ठरेल.”
20 पूर्वी आणखी एकाने परमेश्वराचा संदेश ऐकविला होता. त्याचे नाव उरीया तो शमायाचा मुलगा होता. उरीया किर्याथ यारीमचा रहिवासी होता. त्याने ह्या नगरीच्या विरोधात आणि या भूमीच्याही विरोधात, यिर्मयाप्रमाणेच गोष्टी सांगितल्या होत्या. 21 राजा यहोयाकीम, त्याचे सैन्याधिकारी व यहूदातील नेते ह्यांनी उरीयाला संदेश देताना ऐकले. ते रागावले. यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता. हे उरीयाला कळले. तो घाबरला व मिसर देशात पळाला. 22 पण यहोयाकीम राजाने एलनाथान नावाच्या माणसाबरोबर आणखी काही माणसे देऊन त्यांना मिसरला पाठविले. एलनाथान अखबोरचा मुलगा होता, 23 त्या माणसांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्याला यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर गरीब लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत फेकण्यात आले.
24 पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्यापासून वाचविले.
मान्य सेवक
14 लोकांना या गोष्टीची आठवण करुन देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दांविषयी भांडू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. फक्त जे ऐकतात त्यांचा ते नाश करते. 15 देवाने पसंत केलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
16 पण ऐहिक वादविवाद टाळ कारण ते लोकांना देवापासून अधिकाधिक दूर नेतात. 17 आणि अशा प्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हुमनाय आणि फिलेत आहेत, 18 जे सत्यापासून दूर गेले आहेत. ते म्हणतात की, मरणानंतरचे सर्व लोकांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे व ते काही लोकांच्या विश्वासाचा नाश करीत आहेत.
19 तथापि देवाने घातलेला भक्कम पाया त्यावर असलेला शिक्का यासह स्थिर राहतो. “प्रभु जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो.” [a] “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने वाईटापासून वळलेच पाहिजे.”
20 मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनविलेलीही असतात. काही प्रतिष्ठेच्या कामात वापरण्यासाठी असतात तर दुसरी काही कनिष्ठ प्रतीच्या कामी वापरण्यासाठी नेमलेली असतात. 21 म्हणून जर मनुष्य या अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करील तर तो मानसन्मानस योग्य असे भांडे होईल व धन्यासाठी प्रत्येकसमर्पित कामासाठी पवित्र केलेले व उपयुक्त पात्र होईल.
22 पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति आणि शांति यांच्या मागे लाग. 23 नेहमी मूर्ख व निरर्थक अशा वादविवादापासून दूर राहा. कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात. 24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी दयाधर्माने वागावे तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. 25 जे त्याला विरोध करतात, त्यांना विनयाने शिक्षण द्यावे या आशेने की देवाने त्यांना पश्चात्ताप करण्यास सहाय्य करावे आणि त्यांना सत्याची ओळख व्हावी. 26 ते शुद्धीवर यावेत व सैतानाच्या सापळ्यांतून जेथे सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी ठेवले आहे, तेथून त्यांची सुटका व्हावी.
2006 by World Bible Translation Center