Revised Common Lectionary (Semicontinuous)
23 म्हणून सियोनवासीयांनो, आनंदित व्हा.
तुमच्या परमेश्वर देवामध्ये संतोष माना.
तो कृपावंत होऊन, पाऊस देईल.
तो पूर्वाप्रमाणेच, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडील.
24 खळी गव्हाने भरून जातील,
आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतुनच्या तेलाने भरून वाहतील.
25 “मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले.
तुमचे जे काही होते ते,
नाकतोडे, टोळ, कुसरूड
व घुले यांनी खाल्ले. [a]
पण, मी, परमेश्वर,
तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन.
26 मग तुम्हाला भरपूर खायला मिळेल.
तुम्ही तृप्त व्हाल.
तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल.
त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत.
माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
27 मी इस्राएलच्या बाजूने आहे हे तुम्हाला समजेल.
मीच परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे,
हेही तुम्हाला कळून येईल.
माझ्याशिवाय दुसरा कोणताच परमेश्वर नाही.
माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.”
परमेश्वर, स्वतःचा आत्मा सर्व लोकांत घालण्याचे वचन देतो
28 “ह्यांनंतर मी
माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन (घालीन).
तुमची मुले-मुली भविष्य सांगतील
तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील.
तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील.
29 त्या वेळी, मी माझा आत्मा
पुरूष व स्त्री सेवकांमध्येसुध्दा ओतीन.
30 मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक खुणा दाखवीन तेथे रक्त,
आग व दाट धूर दिसेल.
31 सूर्याऐवजी अंधार होईल.
चंद्राचे रूपांतर रक्तात होईल.
मग परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवेल.
32 आणि तेव्हा, परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल.
वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर व यरुशलेममध्ये असतील.
परमेश्वराने सांगितलेयाप्रमाणेच हे घडेल.
परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते
असेच लोक वाचलेल्यात असतील.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
65 सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो.
मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.
2 तू केलेल्या गोष्टींबद्दल आम्ही लोकांना सांगतो.
आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस.
तू तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतोस.
3 जेव्हा आमची पापे आम्हांला खूप जड होतात
तेव्हा तू माफ करतोस आणि त्यांची भरपाई करतोस.
4 देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस.
आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत.
तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या
सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.
5 देवा, आम्हाला वाचव.
चांगले लोक तुझी प्रार्थना करतात आणि तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतोस.
तू त्यांच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतोस.
सर्व जगभरचे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात.
6 देवाने त्याच्या शक्तीने पर्वत निर्माण केले.
आपण त्याची शक्ती आपल्या भोवती सर्वत्र पाहतो.
7 देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या समुद्राला शांत केले.
देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले.
8 सर्व जगातील लोक तू केलेल्या विस्मयजनक गोष्टींनी आश्चर्यचकित झाले आहेत.
सूर्योदय आणि सुर्यास्त आम्हाला खूप आनंदी बनवतात.
9 तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस
आणि तिला धान्य उगवायला सांगतोस.
देवा तू झरे पाण्याने भरतोस
आणि पिकांना वाढू देतोस.
10 तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस.
तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस.
तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस.
आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
11 तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस
तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.
12 वाळवंट आणि डोंगर गवताने भरले आहेत.
13 आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत.
दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत.
प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.
6 माझ्याबाबतीत म्हणायचे तर, मी अगोदरच पेयार्पणा सारख ओतला जात आहे. व माझी या जीवनातून जाण्याची वेळ आली आहे. 7 मी सुयुद्ध जिंकेले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे. 8 आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्त्व, तो वाट पाहत आहे. आणि प्रभु जो नीतिमान न्यायाधीश, तो मला त्या दिवशी मुकुट देईल आणि केवळ मलाच तो देईल असे नाही तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत, अशा सर्वांना देईल.
16 पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये. 17 प्रभु माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेश्यांनी ती ऐकावी. सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले. 18 प्रभु मला सर्व दुष्कृत्यांपासून सोडवील व त्याच्या स्वर्गाच्या राज्यात सुखरूपपणे आणिल. त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो.
देवाबरोबर योग्य ते संबंध असणे
9 अशा लोकांना जे स्वतःनीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली. 10 “दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक परुशी होता व दुसरा जकातदार होता. 11 परुशी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासरखा मी नाही. 12 उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो, व माझ्या सर्व उत्पन्नाचा दहावा भाग देतो.’
13 “परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला, ‘हे देवा, मज पापी माणसावर दया कर!’ 14 मी तुम्हांला सांगतो हा मनुष्य, त्या दुसऱ्या माणसापेक्षा नितीमान ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करतो त्याला उंच केले जाईल.”
2006 by World Bible Translation Center