Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी स्तुतिगीत
66 पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
2 देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा.
स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.
3 त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा.
देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात.
4 सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे
प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.
5 देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी
आम्हाला आश्चर्यचकित करतात.
6 देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले
त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.
7 देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो
देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो,
त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही.
8 लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा.
त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
9 देवाने आम्हाला जीवन दिले.
देव आम्हाला संरक्षण देतो.
10 लोक चांदीची अग्नी परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस.
तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस.
तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस.
परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
यिर्मयाच्या प्रवचनाचा सारांश
25 यहूदातील सर्व लोकांबद्दल यिर्मयाला मिळालेला देवाचा संदेश असा आहे. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी [a] हा संदेश आला. यहोयाकीम योशीयाचा मुलगा होता. यहोयाकीम राजाच्या कारकिर्दींचे चौथे वर्ष हे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीचे पहिलेच वर्ष होते. 2 यहूदा आणि यरुशलेम येथील लोकांना यिर्मयाने पुढील संदेश ऐकविला:
3 गेली 23 वर्षे मी परमेश्वराचे संदेश पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे. यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या 13 व्या वर्षापासून मी संदेष्टा आहे. मी तेव्हापासून आजपावेतो तुम्हाला परमेश्वराकडून आलेले संदेश ऐकविले आहेत. पण तुम्ही ऐकले नाही. 4 परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठविले पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही.
5 ते संदेष्टे म्हणाले, “तुमची राहणी बदला. त्या वाईट गोष्टी करु नका. तुम्ही तुमचे वागणे बदललेत, तर तुम्ही, परमेश्वराने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात, परत जाऊ शकाल. त्याने तुम्हाला ही भूमी कायमची राहण्यास दिली होती. 6 दुसऱ्या दैवतांना अनुसरु नका. त्यांची सेवा वा पूजा करु नका. एखाद्या माणसाने तयार केलेल्या मूर्तींची पूजा करु नका. त्यामुळे मला तुमचा रागच येतो. असे करुन तुम्ही स्वतःलाच दुखविता. [b]
7 “पण तुम्ही माझे ऐकले नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “माणासाने घडविलेल्या मूर्तीची तुम्ही पूजा केली. त्यामुळे मला राग आला त्यामुळे तुम्ही दुखविले जाता एवढेच.”
8 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला, “तुम्ही माझ्या संदेशाकडे लक्ष दिले नाही. 9 म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील. 10 त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूंचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल. 11 ती सगळी भूमी वैराण वाळवंट होईल तेथील सर्व लोक, 70 वर्षांपर्यत बाबेलच्या राजाचे दास होतील.
12 “पण 70 वर्षांनंतर मी बाबेलच्या राजाला शिक्षा करीन. मी बाबेल राष्ट्रालाही शिक्षा करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी खास्द्यांनी केलेल्या पापाबद्दल त्यांच्या देशाला शिक्षा करीन. मी त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन. 13 बाबेलमध्ये खूप वाईट गोष्टी घडतील हे मी सांगितले आहेच त्या सर्व गोष्टी घडतीलच. यिर्मयाने त्या परक्या देशाबद्दल भविष्यकथन केलेच आहे आणि या पुस्तकात सर्व धोक्याचे इशारे लिहिले आहेत. 14 हो! बाबेलच्या लोकांना खूप राष्ट्रांचे आणि मोठ्या राजांचे दास्य करावे लागेल. त्यांच्या कृत्यांबद्दल योग्य अशीच शिक्षा त्यांना मी देईन.”
13 माझ्याकडून ऐकून घेतलेल्या सत्य शिक्षणाचा गाभा दृढ धर. आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडणाऱ्या विश्वासाने व प्रीतीने ते कर. 14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
15 आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत. 16 अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही. 17 उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत कसोशीने माझा शोध केला. 18 प्रभु करो आणि त्याला त्या दिवशी प्रभुकडून दया मिळो कारण माझ्या इफिसातील वास्तव्य काळात त्याने अनेक प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
2006 by World Bible Translation Center