Revised Common Lectionary (Semicontinuous)
मेम
97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते.
मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात.
तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे.
कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त
कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून
दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस
म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
103 माझ्या तोंडात तुझे शब्द
मधापेक्षाही गोड आहेत.
104 तुझी शिकवण मला शहाणा करते.
त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.
मंदिरात यिर्मयाचा बोधपर उपदेश
26 यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी परमेश्वराकडून हा संदेश आला. यहोयाकीम हा योशीया राजाचा मुलगा होता. 2 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा संदेश दे. मी तुला सांगितलेले सर्व यहूदातील सगळ्या लोकांना सांग. माझ्या संदेशातील कोणताही भाग गाळू नकोस. 3 कदाचित् ते ऐकतीलही आणि माझ्या संदेशाचे पालन करतील. पापी जीवन जगण्याचे ते कदाचित् सोडून देतील. त्यांचे परिवर्तन झाल्यास, त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन. त्यांनी खूप वाईट कृत्ये केली. त्याबद्दल त्यांना शिक्षा करण्याची योजना मी आखत आहे. 4 तू त्यांना सांग ‘परमेश्वर काय म्हणतो ते ऐका: मी तुम्हाला माझी शिकवण दिली. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागलेच पाहिजे. 5 माझ्या सेवकांनी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच पाहिजेत. (संदेष्टे माझे सेवक आहेत) मी पुन्हा पुन्हा माझे सेवक पाठविले. पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. 6 तुम्ही माझे ऐकले नाही तर मी माझे यरुशलेममधील मंदिर शीलोमधील माझ्या पवित्र तंबूप्रमाणे [a] करीन दुसऱ्या शहरांवर अरिष्ट यावे असे वाटणाऱ्या लोकांना यरुशलेम जरुर आठवेल.’”
7 परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले. 8 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, “अशा भयंकर गोष्टी सांगितल्याबद्दल तू मरशील! 9 परमेश्वराच्या नावावर अशा भयंकर गोष्टी सांगण्याचे धाडस तू कसे काय करु शकतोस! शिलोच्या मंदिराप्रमाणे ह्या मंदिराचा नाश होईल, असे म्हणण्याचे साहस तू कसे काय करु शकतोस. यरुशलेम निर्जन वाळवंटाप्रमाणे होईल असे तू कसे काय म्हणू शकतोस!” परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.
10 यहूदातील राज्यकर्त्यांना ही सर्व हकिगत कळली, म्हणून ते राजवाड्यातून बाहेर आले व देवाच्या मंदिरात गेले. तेथे ते नव्या प्रवेशद्वाराजवळ आपापल्या स्थानांवर बसले. “नवे प्रवेशद्वार” परमेश्वराच्या मंदिरात जाण्याचे दार होते. 11 नंतर याजक व संदेष्टे राज्यकर्त्यांशी व लोकाशी बोलले. ते म्हणाले “यिर्मयाला ठार करावे. यरुशलेमबद्दल तो वाईट भविष्यकथन करतो तुम्ही त्याचे बोलणे ऐकलेच आहे.”
12 मग यिर्मया यहूदाच्या राज्यकर्त्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “ह्या नगरीबद्दल व ह्या मंदिराबद्दल ह्या गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठविले. तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द परमेश्वराच्या तोंडचा आहे. 13 तुम्ही तुमची वागणूक बदला. तुम्ही सत्कृत्ये करायला सुरवात केलीच पाहिजे. तुम्ही परमेश्वराचे, तुमच्या देवाचे ऐकलेच पाहिजे. तुम्ही असे वागलात, तर परमेश्वराचे हृदयपरिवर्तन होईल. त्याने सांगितलेल्या वाईट गोष्टी तो करणार नाही. 14 माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हाला योग्य व बरोबर वाटेल ते करा. 15 पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध माणसाला मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही ह्या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसालाही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरीच मला तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही ऐकलेला संदेश खरेच परमेश्वराकडूनच आलेला आहे.”
22 मग पौल अरीयपगाच्या सभेपुढे उभा राहिला, पौल म्हणाला, “अर्थनैच्या लोकांनो, मी पाहत आहे की, सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धर्मिक आहात. 23 मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली. त्यावर असे लिहिले होते: ‘अज्ञात देवाला’. तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हांला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हांला सांगत आहे!
24 “ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभु आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही! 25 हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे. 26 देवाने एका माणसाला (आदाम) निर्माण करुन सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या.
27 “त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्याची इच्छा होती. कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल. पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही. 28 आम्ही त्याच्यासह राहतो आम्ही त्याच्यासह चालतो आम्ही त्याच्यासह आहोत. तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे: ‘आम्ही त्याची मुले आहोत’
29 “आपण देवाची मुले आहोत. म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये. तो सोने, चांदी, किंवा दगडासारखा नाही. 30 भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की, त्याने आपले ह्रदय व जीवन बदलावे. 31 देवाने एक दिवस ठरविलेला आहे, ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील. तो नि:पक्षपाती असेल, हे करण्यासाठी तो एका माणासाचा (येशूचा) वापर करील. देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे. व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे; त्या माणसाला मरणातून पुन्हा उठवून दाखवून दिले आहे!”
32 जेव्हा लोकांनी ऐकले की, येशूला मरणातून पुन्हा उठविण्यात आले तेव्हा त्यांच्यातील काही जण हसू लागले. लोक म्हणाले, “आम्ही याविषयी नंतर पुन्हा ऐकू!” 33 पौल त्यांच्यापासून निघून गेला. 34 पण काही लोकांनी पौलावर विश्वास ठेवला व ते त्याला जाऊन मिळाले. त्यांच्यापैकी एक दिओनुस्य होता. तो अरीयपगा सभेचा सभासद होता. दामारि नावाच्या स्त्रीनेही विश्वास ठेवला. आणखीही काही लोक होते, ज्यानी विश्वास ठेवला.
2006 by World Bible Translation Center