Revised Common Lectionary (Semicontinuous)
19 परमेश्वरा, लक्षात ठेव.
मी फार दु:खी आहे, व मला घर नाही.
तू दिलेल्या कडू विषाचे (शिक्षेचे) स्मरण कर.
20 मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे.
म्हणूनच मी दु:खी आहे.
21 पण मी पुढील काही गोष्टींचा विचार
केला की मला आशा वाटते.
22 परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही.
परमेश्वराची करुणा चिरंतन आहे.
23 ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते.
परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.
24 मी मनाशी म्हणतो, “परमेश्वर माझा देव आहे.
म्हणूनच मला आशा वाटेल.”
25 परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर
व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो.
26 परमेश्वराने आपले रक्षण करावे
म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले.
यरुशलेमचे पतन
52 सिद्कीया त्याच्या वयाच्या 21 व्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने 11 वर्षे यरुशलेमवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती यिर्मयाची मुलगी होती. तिचे घराणे लिब्ना येथील होते. 2 यहोयाकिम राजाप्रमाणेच सिद्कीयाने दुष्कृत्ये केली. हे परमेश्वराला आवडले नाही. 3 परमेश्वराचा कोप ओढवून घेतल्याने यरुशलेम व यहूदामध्ये भयंकर गोष्टी घडल्या. शेवटी परमेश्वराने यरुशलेम व यहूदा येथील लोकांना आपल्या दृष्टीसमोरुन दूर केले.
सिद्कीया बाबेलच्या राजाच्या विरोधात गेला. 4 म्हणून सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमवर चाल केली. त्याने आपले सर्वच्या सर्व सैन्य बरोबर घेतले. त्या सैन्याने यरुशलेमच्या बाहेर तळ ठोकला. मग यरुशलेमचा तट ओलांडून जाण्यासाठी त्यांनी तटाभोवती उतरंडी तयार केल्या. 5 सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला. 6 सहाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी उपासमारीचा कहर झाला. नगरीतल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता. 7 सातव्या दिवशी, बाबेलचे सैन्य यरुशलेममध्ये घुसले. यरुशलेमचे सैनिक पळून गेले. त्यांनी रात्रीच्या वेळी नगर सोडले. दोन भिंतींच्या मधल्या दारातून ते पळून गेले. ते दार राजाच्या बागेजवळ होते. बाबेलच्या सैन्याने वेढा घातला असतानासुद्धा ते सैनिक वाळवंटाकडे पळाले.
8 पण बाबेलच्या सैन्याने सिद्कीया राजाचा पाठलाग केला. त्यांनी सिद्कीयास यरीहोच्या मैदानात गाठले. सिद्कीयाचे सर्व सैनिक पळून गेले. 9 बाबेलच्या सैन्याने सिद्कीयाला पकडले मग त्यांनी त्यास रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले. रिब्ला शहर हमाथ देशात आहे. बाबेलच्या राजाने, रिब्ला येथे, सिद्कीया राजाला शिक्षा ठोठावली. 10 रिब्लामध्येच बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना मारले आणि सिद्कीयाला मुद्दाम ते पाहायला लावले. यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांनाही त्याने ठार केले. 11 मग बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले. मग त्याला बेड्या घालून बाबेलला नेले. तेथे त्याने सिद्कीयाला तुरुंगात टाकले. सिद्कीया मरेपर्यंत तुरुंगातच होता.
स्मुर्णा येथील मंडळीला
8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही:
“जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जीवनात आला.
9 “मला तुमचे क्लेश आणि गरीबी माहीत आहे. तरीही तुम्ही श्रीमंत आहात! ज्या वाईट गाष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत, ते सैतानाची सभा आहेत. 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरु नकोस. मी तुला सांगतो, तुम्हांपैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकतील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हांला जीवनाचा मुगुट देईन.
11 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजा होणारच नाही.
2006 by World Bible Translation Center