Revised Common Lectionary (Semicontinuous)
बाबेलमधील यहूदी कैद्यांना पत्र
29 बाबेलमध्ये राहणाऱ्या यहूदी कैद्यांना यिर्मयाने एक पत्र पाठविले. त्यांने ते पत्र वडीलधारी (नेते) याजक, संदेष्टे आणि बाबेलमध्ये राहणाऱ्या इतर सर्व लोकांना पाठविले. ह्या सर्वजणांना नबुखद्नेस्सरने यरुशलेममधून बाबेलला आणले होते.
4 यरुशलेममधून कैद करुन ज्या लोकांना यरुशलेमहून बाबेलला नेले आहे त्या सर्व लोकांना सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे सांगतो 5 “घरे बांधून त्यात राहा. तेथे वस्ती करा बागा लावा आणि तुम्ही पिकविलेले खा. 6 लग्न करा. तुम्हाला मुलेबाळे होऊ द्या. तुमच्या मुलांचीही लग्ने होऊ द्या. म्हणजे त्यांनाही संतती होईल. तुम्हाला खूप संतती होऊ द्या. तुमची संख्या बाबेलमध्ये वाढू द्या. तुम्ही अल्पसंख्यक राहून नका. 7 मी तुम्हाला ज्या शहरांत पाठविले आहे, त्या शहरांचा फायदा करा. तुम्ही राहत असलेल्या शहराच्या भल्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. का? कारण त्या शहरात शांतता नांदत असेल तर तुम्हालाही शांती मिळेल.”
प्रमुख गायकासाठी स्तुतिगीत
66 पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
2 देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा.
स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.
3 त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा.
देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात.
4 सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे
प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.
5 देवाने केलेल्या गोष्टी बघा त्या गोष्टी
आम्हाला आश्चर्यचकित करतात.
6 देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले
त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.
7 देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो
देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो,
त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही.
8 लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा.
त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
9 देवाने आम्हाला जीवन दिले.
देव आम्हाला संरक्षण देतो.
10 लोक चांदीची अग्नी परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.
11 देवा, तू आम्हाला सापळ्यात अडकू दिलेस.
तू आमच्यावर जड ओझी लादलीस.
12 तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस.
तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस.
परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
8 येशू ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठला व दाविदाचा वंशज आहे त्याची आठवण करीत राहा. जी सुवार्ता मी सांगतो तिचा हा गाभा आहे.
9 कारण सुवार्तेमुळे मी दु:ख सहन करतो. येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे शिक्षण बांधले गेले नाही. 10 म्हणून, देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व अनंतकाळचे गौरव प्राप्त व्हावे.
11 येथे एक विश्वसनीय सत्य आहे:
जर आम्ही त्याच्यासह मेलेले आहोत.
तर त्याच्याबरोबर जीवंतही राहू
12 जर आम्ही दु:खसहन केले
तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू
जर आम्ही त्याला नाकारले
तर तोही आम्हाला नाकारील
13 जरी आम्ही अविश्वासू आहोत
तरी तो अजूनही विश्वासू आहे
कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही.
मान्य सेवक
14 लोकांना या गोष्टीची आठवण करुन देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दांविषयी भांडू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. फक्त जे ऐकतात त्यांचा ते नाश करते. 15 देवाने पसंत केलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
कृतज्ञ असा
11 येशू यरुशलेमाला जात असताना त्याने शोमरोन व गालील यांच्या सीमेवरुन प्रवास केला. 12 तो एका खेड्यात जात असताना, कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला भेटले, ते दूर उभे राहीले. 13 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “येशू, गुरुजी आम्हांवर दया करा!”
14 जेव्हा त्याने त्यांना पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “जा, आणि स्वतःला याजकांना दाखवा.” [a]
ते जात असतानाच बरे झाले, 15 जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की, आपण बरे झालो आहोत, तेव्हा तो परत आला व त्याने मोठ्या स्वरात देवाची स्तुति केली. 16 तो येशूच्या पायाजवळ उपडा पडला. आणि त्याने त्याचे उपकार मानले. तो शोमरोनी होता. 17 येशू त्याला म्हणाला, “दहाजण बरे झाले नव्हते काय? नऊजण कोठे आहेत? 18 या विदेशी माणासाशिवाय कोणीही देवाची स्तुति करण्यासाठी परत आला नाही काय?” 19 येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
2006 by World Bible Translation Center