Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
65 सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो.
मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.
2 तू केलेल्या गोष्टींबद्दल आम्ही लोकांना सांगतो.
आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस.
तू तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतोस.
3 जेव्हा आमची पापे आम्हांला खूप जड होतात
तेव्हा तू माफ करतोस आणि त्यांची भरपाई करतोस.
4 देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस.
आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत.
तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या
सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.
5 देवा, आम्हाला वाचव.
चांगले लोक तुझी प्रार्थना करतात आणि तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतोस.
तू त्यांच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतोस.
सर्व जगभरचे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात.
6 देवाने त्याच्या शक्तीने पर्वत निर्माण केले.
आपण त्याची शक्ती आपल्या भोवती सर्वत्र पाहतो.
7 देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या समुद्राला शांत केले.
देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले.
8 सर्व जगातील लोक तू केलेल्या विस्मयजनक गोष्टींनी आश्चर्यचकित झाले आहेत.
सूर्योदय आणि सुर्यास्त आम्हाला खूप आनंदी बनवतात.
9 तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस
आणि तिला धान्य उगवायला सांगतोस.
देवा तू झरे पाण्याने भरतोस
आणि पिकांना वाढू देतोस.
10 तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस.
तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस.
तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस.
आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
11 तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस
तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.
12 वाळवंट आणि डोंगर गवताने भरले आहेत.
13 आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत.
दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत.
प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.
टोळधाडीमुळे पिकांचा नाश होईल
1 पथूएलचा मुलगा योएल ह्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला:
2 नेत्यांनो, हा संदेश ऐका!
ह्या देशात राहणाऱ्या सर्व लोकानो, माझे ऐका!
तुमच्या आयुष्यात पूर्वी, असे काही घडले आहे का?
नाही. तुमच्या वडिलांच्या काळात असे काही घडले का? नाही.
3 तुम्ही तुमच्या मुलांना ह्या गोष्टी सांगाल.
तुमची मुले, त्यांच्या मुलांना व तुमची नातवंडे
त्यांच्या पुढच्या पिढीला ह्या गोष्टी सांगतील.
4 जे नाकतोड्याने खाल्ले व जे कुसरूडाने सोडले,
ते घुल्याने खाल्ले. [a]
टोळधाड येते
5 मद्यप्यांनो, जागे व्हा व रडा!
सर्व दारूड्यांनो, रडा!
का? कारण तुमचे गोड मद्य संपले आहे.
पन्हा तुम्हाला त्याची चव चाखता येणार नाही.
6 माझ्या राष्ट्राबरोबर लढण्यासाठी एक मोठा व शक्तिशाली देश येत आहे.
त्यांचे सैनिक अगणित आहेत.
ते टोळ (शत्रू-सैनिक) तुमचा नाश करण्यास समर्थ आहेत.
त्यांचे दात सिंहाच्या दाताप्रमाणे आहेत
7 माझ्या द्राक्षवेलीवरची सर्व द्राक्षे ते “टोळ” खातील.
चांगल्या द्राक्षवेली जळाल्या व मेल्या माझी झाडे, ते, सोलून खातील.
त्या झाडांच्या फांद्या
पांढऱ्या पडून त्यांचा नाश होईल.
लोकांचे आक्रंदन
8 एखाद्या तरुण वाग्दत्त वधूचा
भावी पती मारला गेल्यावर ती जशी रडते, तसे रडा!
9 याजकांनो, परमेश्वराच्या सेवकांनो, शोक करा!
का? कारण परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पणे व पेयार्पणे होणार नाहीत.
10 शेतांचा नाश झाला आहे.
भूमीसुध्दा रडत आहे.
का? कारण धान्याचा नाश झाला आहे,
नवे मद्य सुकून गेले आहे
आणि जैतुनाचे तेल नाहीसे झाले आहे.
11 शेतकऱ्यांनो, दु:खी व्हा!
द्राक्षमळेवाल्यांनो, मोठ्याने रडा!
का? कारण शेतातील पीक नाहीसे झाले आहे.
12 वेली सुकून गेल्या आहेत,
अंजिराचे झाड वठत आहे,
डाळींब, खजूर, सफस्चंद अशी
सर्वच बागेतील झाड सुकत आहेत
आणि लोकांमधील आनंद लोपला आहे.
13 याजकांनो, शोकप्रदर्शक कपडे चढवून मोठ्याने रडा.
वेदीच्या सेवकांनो, मोठ्याने शोक करा.
माझ्या परमेश्वराच्या सेवकानो, शोकप्रदर्शक कपडे घालूनच तुम्ही झोपाल.
का? कारण परमेश्वराच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे होणार नाहीत.
टोळांचा भयंकर नाश
14 “उपवासाची एक विशिष्ट वेळ असेल”, असे लोकांना सांगा. खास सभेसाठी लोकांना एकत्र बोलवा. देशात राहणाऱ्या लोकांना व नेत्यांना एकत्र गोळा करा. त्यांना प्रभूच्या, तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात आणा, व परमेश्वराची प्रार्थना करा.
15 शोक करा! का? कारण परमेश्वराचा खास दिवस जवळच आहे. त्या वेळी, सर्वशक्तिमान परमेश्वराची शिक्षा हल्ल्याप्रमाणे अचानक येईल. 16 आमचे अन्न तुटले आहे. आमच्या परमेश्वराच्या मंदिरातून आनंद व सुख निघून गेले आहे. 17 आम्ही बियाणे पेरले पण ते मातीतच सुकून मरून गेले. आमची झाडे वाळली व मेली आहेत. आमची धान्याची कोठारे रिकामी झाली आणि कोसळत आहेत.
18 प्राणी भुकेन व्याकूळ होऊन कण्हत आहेत. गुरांचे कळप गांगरून जाऊन, इतस्ततः भटकत आहेत. त्यांना खाण्यास चारा नाही. मेंढ्या मरत आहेत. 19 हे परमेश्वरा, मी तुझा मदतीसाठी धावा करतो. आगीने आमच्या हिरव्या रानांचे वाळवंटात रूपांतर केले आहे. 20 हिंस्र पशूसुध्दा तहानेने व्याकूळ झालेले आहेत आणि ते तुझ्या मदतीसाठी आक्रोश करत आहेत. झरे आटले आहेत-कोठेही पाणी नाही. आगीने आमच्या हिरव्या रानांचे वाळवंट केले आहे.
शेवटचे दिवस
3 हे लक्षात ठेव: शेवटच्या दिवसांत कठीण समय आपल्यावर येतील. 2 लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, शिव्याशाप देणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे, कृतघ्र, अधार्मिक 3 इतरांवर प्रीती नसणारे, क्षमा न करणारे, चहाडखोर, मोकाट सुटलेले, क्रूर, चांगल्याच्या विरुद्ध असले. 4 विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगले, देवावर प्रेम करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारे असे होतील; 5 ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील, परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
6 मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवितात. 7 अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत. 8 यान्रेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत. 9 ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत. कारण जसा यान्रेस व यांब्रेस यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.
2006 by World Bible Translation Center