Revised Common Lectionary (Semicontinuous)
त्सादे
137 परमेश्वरा, तू चांगला आहेस
आणि तुझे नियम योग्य आहेत.
138 तू आम्हाला करारात चांगले नियम दिलेस
त्यावर आम्ही खरोखरच विश्वास ठेवू शकतो.
139 माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत.
माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.
140 परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो
याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते.
141 मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत.
पण मी तुझ्या आज्ञा विसरत नाही.
142 परमेश्वरा, तुझा चांगलुपणा सदैव राहो
आणि तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
143 माझ्यावर खूप संकटे आली आणि
वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात.
144 तुझा करार नेहमीच चांगला असतो.
तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन.
5 देव म्हणाला, “मद्य माणसाला दगा देऊ शकते. त्याप्रमाणे बलवान माणसाचा गर्व त्याला मूर्ख बनवू शकतो. पण त्याला शांती मिळणार नाही. तो मृत्यूसारखा असतो त्याची आसक्ती वाढतच राहाते. आणि मृत्यूप्रमाणेच, त्याला कधीही समाधान मिळत नाही. तो इतर राष्ट्रांचा पराभव करीतच राहील. त्या राष्ट्रांतील लोकांना तो कैद करीतच राहील. 6 पण लवकरच तो सर्व लोकांच्या चेष्टेचा विषय होईल. ते त्याच्या पराभवाच्या कथा सांगतील. ते हसून म्हणतील, ‘फारच वाईट झाले बुवा! त्या माणसाने खूप गोष्टी चोरल्या. त्याच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टी त्याने उचलल्या. पण त्यांचेच आता त्याला ओझे होईल. त्याने कर्ज काढून स्वतःला श्रीमंत बनवले.’
7 “तू (बलवान माणसाने) लोकांकडून पैसा घेतलास. कधी ना कधी त्या लोकांना जाग येईल व काय झाले ते समजेल. मग ते तुझ्या विरुध्द उभे राहतील. तुझ्याकडून वस्तू घेतील व तू भयभीत होशील. 8 तू पुष्कळ राष्ट्रांतून बऱ्याच गोष्टी चोरल्यास. ते लोक तुझ्याकडून त्यांची वसुली करतील. तू पुष्कळ लोकांना ठार मारलेस, देश व गावे यांचा नाश केलास. त्या देशांतील व गावांतील लोकांना मारलेस.
9 “हो! खरेच! चुकीच्या मार्गाने श्रीमंत होणाऱ्या माणसाचे भले होणार नाही. हा माणूस सुरक्षित जागी राहायला मिळावे, म्हणून अशा गोष्टी करतो. त्याच्या उंच इमारतीमुळे तो वाचू शकेल असे त्याला वाटते. पण त्याचे वाईट होईल. 10 तू (बलवान माणसाने) खूप माणसांचा नाश करण्याचा कट रचला आहेस त्यामुळे तुझ्याच माणसांना मान खाली घालावी लागेल. तू वाईट गोष्टी केल्या आहेत आणि तुझे आयुष्य तू गमावशील. 11 भिंतींतील दगडसुध्दा तुझ्याविरुध्द ओरडतील तुझ्याच घराचे वासे त्यांना साथ देतील. कारण तू चुकतोस हे त्यांना पटेल.
39 यहूदी लोकांनी उत्तर दिले. “आमचा पिता अब्राहाम आहे.”
येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच अब्राहामाची संतति असता तर अब्राहामाने केल्या त्याच गोष्टी तुम्ही केल्या असत्या. 40 देवाकडून जे सत्य ऐकले ते तुम्हांला सांगणारा मी एक मनुष्य आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारायला पाहता. अब्राहामाने तसे केले नाही. 41 पण अब्राहामाने जे केले नाही ते तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत तर तुमचा पिता अब्राहाम नसून कोणी वेगळा आहे.”
परंतु यहूदी म्हणाले, “ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही! देव आमचा पिता आहे. तोच एक आमचा पिता आहे.”
42 येशू त्या यहूदी लोकांना म्हणाला, “जर देव खरोखरच तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती. मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे. मी माझ्या स्वतःच्या अधिकारात आलो नाही. देवानेच मला पाठविले. 43 मी म्हणतो, मी देत असलेली शिकवण तुम्हांला समजत नाही का? कारण की तुम्हांला माझी शिकवण स्वीकारता येत नाही. 44 तुमचा पिता सैतान आहे. तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुवातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरूद्ध आहे. आणि सैतानाच्या ठायी सत्य नाही. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे. सैतान लबाड आहे. आणि तो असत्याचा पिता आहे.
45 “मी सत्य बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही. 46 मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करु शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही? 47 जो देवाचा आहे, तो देवाचे म्हणणे ऐकतो. परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. कारण तुम्ही देवाचे लोक नाहीत.”
2006 by World Bible Translation Center