Revised Common Lectionary (Semicontinuous)
देवाचे स्तुतिस्तोत्र
12 त्या वेळेला तू म्हणशील:
“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो
तू माझ्यावर रागावला होतास
पण आता राग सोड
तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.
2 देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे.
मी निर्भय आहे तो मला तारतो.
परमेश्वर हीच माझी शक्तीआहे.
तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.”
3-4 तारणाच्या झऱ्यातून तुम्ही पाणी घ्या
म्हणजे सुखी व्हाल
आणि म्हणाल,
“परमेश्वराची स्तुती असो.
त्याच्या नावाची उपासना करा.
त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”
5 परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण
त्याने महान कार्य केले आहे.
देवबद्दल ही वार्ता सर्व जगात
पसरवा, सर्व लोकांना हे कळू द्या.
6 सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा.
कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे.
तेव्हा आनंदी व्हा.
परमेश्वर त्याच्या लोकांना वाचवेल
14 रस्ता मोकळा करा! रस्ता मोकळा करा!
माझ्या लोकांकरिता रस्ता मोकळा करा!
15 देव अती उच्च व परम थोर आहे.
देव चिरंजीव आहे.
त्याचे नाव पवित्र आहे.
देव म्हणतो, “मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे
पण मी दुखी: आणि लीन यांच्याबरोबरही असतो.
मनाने नम्र असलेल्यांना
आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.
16 मी अखंड लढाई करीत राहणार नाही.
मी नेहमी रागावणार नाही.
मी सतत रागावलो तर माणसाचा
आत्मा मी त्याला दिलेले जीवन-माझ्यासमोर मरून जाईल.
17 ह्या लोकांनी पापे केली म्हणून मला राग आला.
मग मी इस्राएलला शिक्षा केली.
मी रागावलो असल्याने त्यांच्यापासून तोंड फिरविले.
इस्राएलने मला सोडले त्याला पाहिजे त्या ठिकाणी तो गेला.
18 इस्राएल कोठे गेला ते मी पाहिले म्हणून मी त्याला बरे करीन.
(क्षमा करीन.) मी त्याचे दु:ख हलके करीन आणि त्याला बरे वाटावे म्हणून शब्दांची फुंकर घालीन.
मग त्याला व त्याच्या लोकांना वाईट वाटणार नाही.
19 मी त्यांना ‘शांती’ हा नवा शब्द शिकवीन.
माझ्या जवळ वा दूर असणाऱ्यांना मी शांती देईन.
मी त्या लोकांना बरे करीन.
त्यांना क्षमा करीन.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या
20 पण पापी हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे असतात.
ते गप्प बसत नाहीत, शांत राहत नाही.
ते रागावतात आणि खवळलेल्या
समुद्रप्रमाणेच चिखल ढवळून काढतात.
21 माझा देव म्हणतो,
“पाप्यांना कधी शांती मिळत नाही.”
सर्व लोकांनी चुका केल्या आहेत
18 लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो. 19 हे असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.
20 जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. आणि जर तुम्हांला हे कळत नाही, तर ह्याचे तुम्हांला कसलेच समर्थन करता येणार नाही.
21 कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंतःकरणे अंधकारमय झाली. 22 जरी गर्वाने त्यांनी स्वतःला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले. 23 आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव, पक्षी, चार पायाचे प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली.
24 यासाठी देवाने त्यांना त्यांच्या मनातील वाईट वासनांच्या व वैषयिक अशुद्धतेमुळे सोडून दिले आणि त्यांनी एकमेकांच्या देहाचा अनादर करावा यासाठी त्यांस मोकळीक दिली. 25 त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्वकाळ धन्यवादित आहे. आमेन.
2006 by World Bible Translation Center