Revised Common Lectionary (Semicontinuous)
नवीन काल येत आहे
17 “मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन.
लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत.
त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.
18 माझे लोक सुखी होतील.
ते अखंड आनंदात राहतील का?
मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल.
मी यरूशेमला आनंदाने भरून टाकीन
आणि त्यांना सुखी करीन.
19 “मग यरूशलेमबरोबर मलाही आनंद होईल.
मी माझ्या लोकांबरोबर सुखी होईन.
त्या नगरीत पुन्हा कधीही आक्रोश
व दु:ख असणार नाही.
20 तेथे पुन्हा कधीही अल्पायुषी मुले जन्माला येणार नाहीत.
त्या नगरीत कोणीही माणूस अल्प वयात मरणार नाही.
आबालवृध्द् दीर्घायुषी होतील.
शंभर वर्षे जगणाऱ्याला तरूण म्हटले जाईल.
पण पापी माणूस जरी शंभर वर्षे जगला तरी त्याच्यावर खूप संकटे येतील.
21 “त्या नगरीत घर बांधणाऱ्याला त्या घरात राहायला मिळेल.
आणि द्राक्षाचा मळा लावणाऱ्याला त्या मळ्यातील द्राक्षे खायला मिळतील.
22 एकाने घर बांधायचे व त्यात दुसऱ्याने राहायचे किंवा
एकाने द्राक्ष मळा लावायचा व दुसऱ्याने
त्या मळ्यातील द्राक्षे खायची
असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही.
माझे लोक वृक्षांएवढे जगतील.
मी निवडलेले लोक, त्यांनी स्वतः तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
23 स्त्रियांना बाळंतपणाचा त्रास कधीच होणार नाही.
बाळंतपणात काय होईल ह्याची त्यांना भिती वाटणार नाही.
परमेश्वर माझ्या सर्व लोकांना व त्यांच्या मुलांना आशीर्वाद देईल.
24 त्यांनी मागण्या आधीच त्यांना काय पाहिजे ते मला समजेल.
आणि त्यांचे मागणे पुरे होण्याआधीच मी त्यांना मदत करीन.
25 लांडगे आणि कोकरे,
सिंह आणि गुरे एकत्र जेवतील.
माझ्या पवित्र डोंगरावरील कोणाही माणसाला जमिनीवरचा साप घाबरविणार नाही.
अथवा चावणार नाही.”
परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.
देवाचे स्तुतिस्तोत्र
12 त्या वेळेला तू म्हणशील:
“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो
तू माझ्यावर रागावला होतास
पण आता राग सोड
तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.
2 देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे.
मी निर्भय आहे तो मला तारतो.
परमेश्वर हीच माझी शक्तीआहे.
तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.”
3-4 तारणाच्या झऱ्यातून तुम्ही पाणी घ्या
म्हणजे सुखी व्हाल
आणि म्हणाल,
“परमेश्वराची स्तुती असो.
त्याच्या नावाची उपासना करा.
त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”
5 परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण
त्याने महान कार्य केले आहे.
देवबद्दल ही वार्ता सर्व जगात
पसरवा, सर्व लोकांना हे कळू द्या.
6 सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा.
कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे.
तेव्हा आनंदी व्हा.
कार्य करण्यासाठी अटी
6 आता, बंधूंनो, आम्ही तुम्हांला आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करतो की, जो कोणी बंधु, ज्या परंपरा त्यांना आमच्याकडून मिळाल्या त्या परंपरांप्रमाणे चालत नाही, तर आळशी जीवन जगत आहे तर त्याच्यापासून दूर राहा. 7 मी तुम्हांला हे सांगतो कारण तुम्ही स्वतः जाणता की तुम्ही आमचे अनुकरण कसे करायचे, कारण आम्ही तुमच्यामध्ये आळशी नव्हतो. 8 किंवा कोणाकडूनही आम्ही फुकटची भाकर खाल्ली नाही, उलट, रात्रंदिवस आम्ही काबाडकष्ट केले यासाठी की तुमच्यावर आम्ही ओझे होऊ नये. 9 याचा अर्थ असा नाही की, आम्हांला तुमच्याकडून मदत मागण्याचा अधिकार नाही, पण आम्ही आमच्या गरजा भागविण्यासाठी काम केले ते यासाठी की, आम्ही तुमच्यासमोर उदाहरण ठेवावे व तुम्ही आमचे अनुकरण करावे. 10 कारण आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर होतो, तेव्हा आम्ही तुम्हांला हा नियम दिला: “जर एखाद्याला काम करायचे नसेल, तर त्याने खाऊ नये.”
11 आम्ही हे सांगतो कारण आम्ही ऐकतो की तुमच्यापैकी काही जण आळशीपणाचे जीवन जगत आहेत. ते काहीच काम करीत नाहीत. उलट कोणत्याही दिशाहीन असल्यासारखे इकडे तिकडे फिरत असतात. (इतरांच्या कामात दखल देतात) 12 आम्ही अशा लोकांना आज्ञा करतो व प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बोध करतो की, त्यांनी शांतीने काम करावे आणि स्वतःची भाकर स्वतःच मिळवून खावी. 13 पण बंधूंनो, तुम्ही तुमच्यासाठी चांगले करीत असता थकू नका.
मंदिराचा नाश(A)
5 शिष्यातील काही जण मंदिराविषयी असे बोलत होते की, ते सुंदर पाषाणांनी आणि नवसाच्या अर्पणांनी सुशोभित केले आहे.
6 येशू म्हणाला, “या गोष्टी तुम्ही पाहताना असे दिवस येतील की, एकावर एक असा एकही दगड ठेवला जाणार नाही. ते सर्व पाडले जातील.”
7 त्यांनी त्याला प्रश्न विचारला आणि ते म्हणाले, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”
8 आणि तो म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि तो ‘मी आहे’ असे म्हणतील. आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे.’ त्यांच्यामागे जाऊ नका! 9 जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”
10 मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल. 11 मोठे भूंकप होतील, दुष्काळ पडतील, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील. आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
12 “परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हांला अटक करतील. ते तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हांस सभास्थानांसमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हांला राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील. 13 यामुळे तुम्हांला माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल. 14 आपला स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी काळजी करायची नाही अशी मनाची तयारी करा, 15 कारण मी तुम्हांला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही. 16 परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हांपैकी काही जणांना ठार मारतील. 17 माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील. 18 परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही. 19 आपल्या सहनशीलतेने तुम्ही जिवाचे रक्षण कराल.
2006 by World Bible Translation Center