Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
124 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
इस्राएल, मला उत्तर दे.
2 लोकांनी आपल्यावर हल्ला केला
तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
3 आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते
तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
4 आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते.
नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
5 गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे
आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.
6 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना
आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.
7 जाळ्यात सापडलेल्या आणि
नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत.
जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
8 परमेश्वराकडून आपली मदत आली.
परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.
जलप्रलयाचा शेवट
8 पण देव नोहाला विसरला नाही; त्याने नोहाची व त्याच्या सोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. आणि पाणी दिसेनासे होऊ लागले.
2 आकाशातून मुसळधार पडणारा पाऊस थांबला; आणि पृथ्वीच्या पोटातून उफाळून वर येणारे सर्व झऱ्यांचे पाणी वाहाण्याचे थांबले, 3-4 पृथ्वी भरुन टाकलेले पाणी ओसरुन खाली खाली जाऊ लागले. दिडशे दिवसानंतर पाणी इतके खाली आले की त्यामुळे 5 सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारु आरारात पर्वताजवळ थांबून पुन्हा जमिनीवर टेकले; पाणी सतत ओसरत राहिले आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताची शिखरे दिसू लागली.
6 चाळीस दिवसांनंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली 7 आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पाणी संपून जमीन कोरडी होईपर्यंत इकडे-तिकडे उडत राहिला. 8 जमिनीच्या पृष्टभागावरुन पाणी उतरले आहे का नाही हे जाणून घेण्याकरिता नोहाने एका कबुतरालाही बाहेर सोडले.
9 जमीन अजून पाण्याने झाकलेली असल्यामुळे कबुतराला टेकायला जागा मिळाली नाही. म्हणून ते तारवाकडे परत आले तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरले व तारवाच्या आत घेतले.
10 सात दिवसानंतर नोहाने पुन्हा कबुतराला बाहेर सोडले; 11 तेव्हा ते दुपारी नोहाकडे परत आले तेव्हा त्याच्या चोचींत आँलीव्ह वृक्षाचे (म्हणजे जैतून झाडाचे) कोवळे पान होते. यावरुन जमीन सुकली असल्याचे नोहाला समजले, 12 आणखी सात दिवसांनी नोहाने कबुतराला पुन्हा बाहेर सोडले परंतु यावेळी मात्र ते परत आले नाही.
13 त्यानंतर नोहाने तारवाचे दार उघडले. जमीन सुकून गेली आहे असे होता नोहाला दिसले. हा वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस होता. नोहा तेव्हा 601 वर्षांचा होता. 14 दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत जमीन खडखडीत कोरडी झाली होती.
15 नंतर देव नोहाला म्हणाला, 16 “तू, तुझी बायको, मुले व सुना यांना घेऊन आता तारवाच्या बाहेर नीघ; 17 तुझ्या बरोबर सर्वपक्षी, पशू जमिनीवर रांगणारे प्राणी या सर्वांना तारवातून बाहेर आण; ते प्राणी आपापल्या जातीची भरपूर संतती उत्पन्न करतील व पुन्हा पृथ्वी भरुन टाकतील.”
18 तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघाला; 19 त्याच्या बरोबरचे सर्व पशू, रांगणारे प्राणी व पक्षी जातवारीने जोडीजोडीने तारवातून बाहेर निघाले.
पापात मेलेले पण ख्रिस्तात जिवंत
6 तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय? 2 खात्रीने नाही. आपण जे पापाला मेलो ते अजूनही जिवंत कसे राहू? 3 तुम्हांला माहीत नाही का की ज्या आपण प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता त्या आपला त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला. 4 म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी की, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे.
5 कारण जर त्याच्या मरणाच्या प्रतिरुपाने आपण त्याच्याशी जोडलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरुपाने त्याच्याशी जोडले जाऊ. 6 आपणांला हे माहीत आहे की, आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला यासाठी की आपल्या पापमय शरीराचा नाश व्हावा व यापुढे आपण पापाचे दास होऊ नये. 7 कारण जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान होतो.
8 आणि जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आम्ही विश्वास धरतो की, त्याच्याबरोबर जिवंतही राहू. 9 कारण आम्हांस माहीत आहे की, ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला तो यापुढे मरणार नाही. मरणाची त्याच्यावर सत्ता चालणार नाही. 10 जे मरण तो मेला ते एकदाच पापासाठी मेला, परंतु जे जीवन तो जगतो ते तो देवासाठी जगतो. 11 त्याच रीतीने तुम्ही स्वतःला पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत असे समजा.
2006 by World Bible Translation Center