Revised Common Lectionary (Semicontinuous)
7 “शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोना, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.
8 टेहळणी करणारे [a] आरडाओरडा करतात.
ते सर्व मिळून आनंद व्यक्त करीत आहेत.
का? कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वराला सियोनाला परत येताना पाहिले आहे.
9 यरूशलेमा, तुझ्या नाश झालेल्या इमारती पुन्हा आनंदित होतील.
तुम्ही सर्व मिळून आनंद साजरा कराल.
का? कारण परमेश्वराने त्याच्या लोकांना सुखी केले आहे. त्याने यरूशलेमला मुक्त केले आहे.
10 परमेश्वर त्याची पवित्र शक्ती सर्व राष्ट्रांना दाखवील.
देव त्याच्या लोकांना कसे वाचवितो हे अती दूरच्या सर्व देशांना दिसेल.
स्तुतिगान
98 परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या
म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
त्याच्या पवित्र उजव्या बाहूने
त्याच्याकडे विजय परत आणला.
2 परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली.
परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
3 त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला.
दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
4 पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर.
त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
5 वीणे, परमेश्वराची स्तुती करा.
वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.
6 कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे,
परमेश्वराचे गुणवर्णन करा.
7 समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना
जोर जोरात गाऊ द्या.
8 नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो,
सगळ्यांनी बरोबर गाणे गा.
9 परमेश्वरासमोर गा.
कारण तो जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने राज्य करेल,
तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.
देव त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे
1 भूतकाळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे पुष्कळ वेळा वेगवेगळ्या मार्गांनी बोलला. 2 पण या शेवटच्या दिवसांत तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने हे जगसुद्धा पुत्राकरवीच निर्माण केले. 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला. 4 तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे त्याला मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
5 त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की:
“तू माझा पुत्र आहेस;
आज मी तुझा पिता झालो आहे.” (A)
देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की,
“मी त्याचा पिता होईन,
व तो माझा पुत्र होईल.” (B)
6 आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो,
“देवाचे सर्व देवदूत त्याची उपासना करोत.” (C)
7 देवदूताविषयी देव असे म्हणतो,
“तो त्याच्या देवदूतांना वारा बनवितो,
आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवितो.” (D)
8 पण पुत्राविषयी तो असे म्हणतो,
“तुझे सिंहासन, हे देवा, तुझे सिंहासन सदासर्वकाळासाठी आहे,
आणि तुझे राज्य न्यायाचे असेल.
9 नीति तुला नेहमी प्रिय आहे. अनीतीचा तू द्वेष करतोस.
म्हणून देवाने तुझ्या देवाने,
तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला आनंदादायी तेलाचा अभिषेक केला आहे.” (E)
10 आणि देव असेही म्हणाला,
“हे प्रभु, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास,
आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे.
11 ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील
ते कापडासारखे जुने होतील.
12 तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील,
तू त्यांना कपड्यासारखे बदलशील,
पण तू नेहमी सारखाच राहशील,
आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.” (F)
येशू जगात येतो
1 जगाची उत्पत्ति होण्यापूर्वी शब्द [a] अस्तित्वात होता, तो शब्द देवाबरोबर होता. आणि शब्द देव होता. 2 तो शब्द सुरूवातीपासूनच देवाबरोबर होता. 3 त्याच्याद्वारे (शब्दाच्या) सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. 4 त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश (समजबुद्धी, चांगुलपण) असे होते. 5 हा प्रकाश अंधारात प्रकाशतो. पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत [b] केले नाही.
6 योहान [c] नावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठविले. 7 तो लोकांना प्रकाशाविषयी (ख्रिस्ताविषयी) सांगण्यासाठी आला. यासाठी की, योहानाकडून प्रकाश विषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा. 8 योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला. 9 खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो.
10 शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही. 11 तो जगात आला, जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही. 12 काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. 13 ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आईवडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला.
14 शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा (दयाळूपणा) आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता.
2006 by World Bible Translation Center