Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
20 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून
येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्व प्राप्त करुन देवो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो.
तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.
3 तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले
त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
4 तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो.
तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
5 देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल.
देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल
ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
6 परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले.
देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत:च निवडलेल्या राजाला उत्तर दिले.
देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
7 काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यांवर विश्वास ठेवतात
परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
8 त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला.
ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.
9 परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले.
देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.
देवाचे स्तवनगीत
26 त्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील
परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे.
भक्कम तटबंदी व पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्य आहे.
2 वेशी उघडा म्हणजे देवाची चांगली शिकवण
मानणारे सज्जन लोक आत प्रवेश करतील.
3 परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना
आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना,
तू खरी शांती देतोस.
4 म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा,
कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे.
5 पण परमेश्वर उद्दाम शहराचा नाश करील,
आणि तेथील लोकांना शिक्षा करील.
परमेश्वर ते मोठे शहर धुळीला मिळवील.
6 नंतर दीनदुबळे त्याचे भग्नावशेष पायाखाली तुडवतील.
7 प्रामाणिकपणा हे सज्जनांचे ब्रीद असते.
सज्जन सत्याच्या सरळ मार्गाने जातात,
आणि देवा तू तो मार्ग सुकर
व सुलभ करतोस.
8 पण परमेश्वरा, तू न्याय कसा करतोस ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत.
आमचे आत्मे तुला व तुझ्या नांवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात.
9 प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे,
आणि प्रत्येक पहाटेबरोबर माझ्यातील आत्मा तुझ्याशी समरस होऊ इच्छितो.
जेव्हा तू न्याय देशील तेव्हा
लोकांना जगण्याचा योग्य मार्ग सापडेल.
विश्वासाचे जगणे
16 म्हणून आम्ही धीर सोडीत नाही. जरी बाह्यदृष्ट्या आम्ही व्यर्थ ठरत आहोत तरी अंतरीकदृष्ट्या आम्ही दिवसेंदिवस नवीन होत आहोत. 17 कारण आमची हलकी व क्षणिक दु:खे ही आमच्यासाठी अनंतकळचे गौरव मिळवीत आहेत, जे दु:खापेक्षा कितीतरी मोठे आहे. 18 म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायमस्वरुपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावीत नाही पण जे दिसत नाही, पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे, पण जे दिसत नाही, ते अनंतकालीक आहे.
2006 by World Bible Translation Center