Revised Common Lectionary (Semicontinuous)
परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल करूणा वाटत होती
7 परमेश्वर कृपाळू आहे ह्याचे मी स्मरण ठेवीन.
परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन.
इस्राएलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या.
परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे.
परमेश्वराने आमच्यावर दया केली.
8 परमेश्वर म्हणाला, “ही माझी माणसे आहेत.
ही मुले खोटे बोलत नाहीत.”
म्हणून त्यांना परमेश्वराने वाचविले.
9 लोकांपुढे अनेक संकटे होती.
पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द् नव्हता.
परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती.
म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले,
त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला.
त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.
148 परमेश्वराची स्तुती करा.
स्वर्गातल्या देवदूतांनो
स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा.
ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा.
आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा.
का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती
त्या सदैव राहाव्यात म्हणून केली.
देवाने कधीही न संपणारे नियम केले.
7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा.
महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
8 देवाने अग्नी आणि गारा, बर्फ
आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे
आणि देवदार वृक्ष निर्मिले.
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि
पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले.
त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या.
देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा.
त्याच्या नावाला सदैव मान द्या.
स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील.
लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील.
लोक इस्राएलची स्तुती करतील.
हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो.
परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र
10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधु आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही. 12 येशू म्हणतो,
“मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन
मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.” (A)
13 तो आणखी म्हणतो,
“मी माझा विश्वास देवावर ठेवीन.” (B)
आणि तो पुन्हा म्हणतो,
“येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” (C)
14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्यानेसुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्यासमवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. 15 आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. 16 कारण हे स्पष्ट आहे की, तो काही देवदूतांना मदत करत नाही, उलट अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो, 17 या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते. 18 कारण ज्याअर्थी त्याला स्वतःला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
येशूचे आईवडील त्याला इजिप्तला घेऊन जातात
13 ज्ञानी लोक गेल्यानंतर, प्रभूचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निसटून इजिप्त देशास जा. कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे, तेव्हा मी तुला धोका टळल्याची सूचना देईपर्यंत इजिप्तमध्येच राहा.”
14 तेव्हा तो उठाला व रात्रीच बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशास गेला. 15 आणि हेरोद मरेपर्यंत तेथेच राहिला. प्रभु देवाने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “मी माझ्या मुलाला इजिप्त देशातून बोलाविले आहे” [a] ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
बेथलहेमातील मुलांची हेरोदाकडून कत्तल
16 तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले, हे पाहून हेरोद अतिशय रागावाला. त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजून घेतली होती. त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्षे उलटली होती. म्हणून त्याने माणसे पाठवून बेथलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची कत्तल करण्याची आज्ञा केली. 17 यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे देवाने जे सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले. ते वचन असे होते:
18 “रामा येथे आकांत ऐकू आला.
दु:खदायक रडण्याचा हा आकांत होता.
राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे,
पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहेत.” (A)
योसेफ आणि मरीया इजिप्तहून परत येतात
19 हेरोद मेल्यांनंतर प्रभुचा दूत स्वप्नात योसेफाकडे आला. योसेफ जेव्हा इजिप्तमध्ये होता तेव्हा हे घडले. 20 दूत म्हणाला, “ऊठ! बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा. जे लोक बाळाला मारू पाहत होते ते आता मेले आहेत.”
21 मग योसेफ बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास गेला. 22 हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव यहूदाचा राजा झाला आहे असे जेव्हा योसेफाला समजले, तेव्हा तो तेथे जाण्यास घाबरला. पण स्वप्नात त्याला ताकीद मिळाल्याने तो तेथून निघाला आणि गालील प्रदेशात आला. 23 योसेफ नासरेथ नावाच्या गावात गेला आणि तेथे राहिला. ख्रिस्त नासरेथकर म्हटला जाईल, असे जे देवाने संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणूल हे झाले.
2006 by World Bible Translation Center