Revised Common Lectionary (Semicontinuous)
68 “प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो,
कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास,
व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.
69 त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून
आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
70 देव म्हणाला की, मी असे करीन
त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.
71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात
त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.
72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे.
व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
73 हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
74 ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की,
आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.
75 त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.
76 “मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील.
प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
77 कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल
हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.
78 “कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे
स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
79 आणि शांतीच्या मार्गावर आमच्या
पावलांना मार्गदर्शन करील.”
पापी राजांविरुद्ध निवाडा
22 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, राजवाड्यात जा आणि यहूदाच्या राजाला हा संदेश आवर्जून सांग: 2 ‘यहुदाच्या राजा, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐक. तू दावीदच्या सिंहासनावर बसून राज्य करतोस म्हणून हे ऐक, राजा, तू आणि तुझ्या अधिकाऱ्यांनी माझे म्हणणे ऐकलेच पाहिजे. यरुशलेमच्या प्रवेशद्वारावरुन जाणाऱ्या सर्व लोकांनी माझा संदेश ऐकलाच पाहिजे. 3 परमेश्वर म्हणतो, फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच करा. लुटल्या जात असलेल्या लोकांचे लुटारुपासून रक्षण करा. अनाथ मुलाशी अथवा विधवांशी वाईट वागू नका अथवा त्यांना दुखवू नका. निरपराध्यांना मारु नका. 4 तुम्ही माझ्या ह्या आज्ञा पाळल्यात, तर काय होईल? दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरुशलेममध्ये, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर व लोकांबरोबर, रथांतून आणि घोड्यावर स्वार होऊन आत येत राहतील. 5 पण जर तुम्ही आज्ञा पाळल्या नाहीत, तर परमेश्वर काय म्हणतो पाहा, मी, परमेश्वर, वचन देतो की राजवाड्याचा नाश होऊन येथे दगडविटांचा ढिगारा होईल.’”
6 यहूदाचा राजा राहत असलेल्या राजावाड्याबद्दल परमेश्वराने पुढील उद्गार काढले.
“गिलादच्या जंगलाप्रमाणे वा
लबानोनच्या पर्वताप्रमाणे राजवाडा उंच आहे.
पण ती त्याला वाळवंटाप्रमाणे करीन.
निर्जन शहराप्रमाणे तो ओसाड होईल.
7 मी राजवाड्याचा नाश करण्यास माणसे पाठवीन.
त्या प्रत्येकाच्या हातात शस्त्र असेल.
त्यांचा उपयोग ते राजवाडा नष्ट करण्यासाठी करतील.
ही माणसे, गंधसरुपासून बनविलेल्या भक्कम व सुंदर तुळया कापून जाळून टाकतील.
8 “अनेक राष्ट्रांतील लोक या नगरीजवळून जाताना एकमेकांना विचारतील ‘यरुशलेम ह्या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?’ 9 ह्या प्रश्र्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे असेल: ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांची सेवा केली, म्हणून देवाने यरुशलेमचा नाश केला.’”
राजा यहोआहाज (शल्लूम) ह्याच्याविरुद्ध निवाडा
10 मेलेल्या राजाकरिता [a] रडू नका.
त्याच्यासाठी शोक करु नका.
पण हे ठिकाण सोडून जावे लागणाऱ्या
राजासाठी मात्र मोठ्याने रडा [b]
कारण तो परत येणार नाही.
यहोआहाज त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.
11 योशीयाचा मुलगा शल्लूम (यहोआहाज) ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: (राजा योशीया यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शल्लूम यहूदाचा राजा झाला) “यहोआहाज यरुशलेम सोडून दूर गेला आहे. तो पुन्हा यरुशलेममध्ये येणार नाही. 12 मिसरच्या लोकांनी यहोआहाजला पकडून नेले आहे. तो तेथेच मरेल. त्याला परत ही भूमी दिसणार नाही.”
राजा यहोयाकीमविरुद्ध निवाडा
13 राजा यहोयाकीमचे वाईट होईल.
तो वाईट गोष्टी करीत आहे.
आपला महाल तो बांधू शकेल.
लोकांना फसवून त्यावर माड्या चढवू शकेल.
तो लोकांना काहीही न देता त्यांच्याकडून काम करवून घेतो, त्यांना कामाची मजुरी देत नाही.
14 यहोयाकीम म्हणतो,
“मी माझ्यासाठी मोठा वाडा बांधीन.
त्याला खूप मोठे मजले असतील.”
तो मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो.
तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो.
15 यहोयाकीम, तुझ्या घरात खूप गंधसरु आहे
म्हणून त्यामुळे काही तू मोठा राजा होत नाहीस.
तुझे वडील योशीया अन्नपाण्यावरच समाधानी होते.
त्यांनी फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच केल्या.
त्यांच्या ह्या कृत्यांमुळे त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.
16 योशीयाने गरीब व गरजू अशा लोकांना मदत केली.
त्यामुळे त्यांचे सर्व व्यवस्थित झाले.
यहोयाकीम, “देवाला ओळखणे ह्याचा अर्थ काय?”
ह्याचा अर्थ योग्य रीतीने जगणे व न्यायीपणाने वागणे.
मला ओळखणे ह्याचा अर्थ हाच होय.
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
17 “यहोयाकीम, तुला फक्त तुझा फायदाच दिसतो.
तू तुझ्यासाठी जास्तीत जास्त मिळविण्याचाच फक्त विचार करतोस.
निरापराध्यांना ठार मारण्यात व
दुसऱ्याकडून वस्तू चोरण्यातच तुझे मन जडले असते.”
जिवंत आशा
3 आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली. 4 आणि ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याच्यावर काही दोष नाही, व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे.
5 आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे. 6 वेगवेगळ्या प्रकारच्या पिडांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा. 7 नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे.
8 जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात. 9 तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण ते तुम्हाला प्राप्त होत आहे.
2006 by World Bible Translation Center