Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र
76 यहुदातील लोकांना देव माहीत आहे.
इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात.
2 देवाचे मंदिर शालेममध्ये आहे.
देवाचे घर सियोन डोंगरावर आहे.
3 देवाने त्या ठिकाणी धनुष्य बाण, ढाली, तलवारी
आणि इतर शस्त्रांचा नाश केला.
4 देवा, तू ज्या डोंगरावर शत्रूचा पराभव केलास
त्या डोंगरावरुन परतताना तू वैभवशाली दिसतोस.
5 त्या सैनिकांना आपण खूप बलवान आहोत असे वाटत होते.
परंतु आता ते रणांगणावर मरुन पडले आहेत.
त्यांची शरीरे आता त्यांच्या जवळच्या वस्तू ओरबाडल्या गेल्यामुळे उघडी पडली आहेत.
या शूर सैनिकांपैकी कुणीही स्वत:चे रक्षण करु शकला नाही.
6 याकोबाचा देव त्या सैनिकांवर ओरडला
आणि ते सैन्य त्यांचा रथ आणि घोडे यांच्यासकट मरुन पडले.
7 देवा, तू भयकारी आहेस.
तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.
8-9 परमेश्वर न्यायाधीश म्हणून उभा ठाकला.
त्याने त्याचे निर्णय जाहीर केले.
देवाने देशातल्या दीन लोकांना वाचवले त्याने स्वर्गातून निर्णय दिला.
सर्व पृथ्वी शांत आणि घाबरलेली होती.
10 तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात.
तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.
11 लोकहो! तुम्ही तुमच्या परमेश्वराला, देवाला वचने दिलीत.
आता तुम्ही जी वचने दिलीत ती पूर्ण करा.
प्रत्येक ठिकाणचे लोक देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात.
ते देवासाठी भेटी आणतात.
12 देव मोठ्या नेत्यांचा सुध्दा पराभव करतो.
पृथ्वीवरचे सर्व राजे त्याला घाबरतात.
17 “आता तुझ्याजवळ तांबे आहे,
मी तुला सोने आणीन.
आता तुझ्याजवळ लोखंड आहे,
मी तुला चांदी आणून देईन.
मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन.
तुझ्या खडकांचे लोखंड करीन.
मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन.
आता लोक तुला दुखावतात,
पण तेच तुझ्यासाठी
चांगल्या गोष्टी करतील.
18 तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही.
लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत.
आणि तुला लुटणार नाहीत.
तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.
19 “या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे
तर परमेश्वर प्रकाश देईल.
परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल.
तुझा देवच तुझे वैभव असेल.
20 तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही
आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही.
कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल.
तुझा दु:खाचा काळ संपेल.
21 “तुझे सर्व लोक सज्जन असतील.
त्यांना कायमची भूमी मिळेल.
मी त्या लोकांना निर्माण केले.
मी माझ्या स्वतःच्या हातांनी
तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.
22 सर्वात लहान कुटुंबाचा मोठा समूह होईल.
सर्वांत लहान कुटुंबाचे मोठे बलवान राष्ट्र होईल.
योग्य वेळी मी, परमेश्वर, त्वरेने येईन.
मी ह्या गोष्टी घडवून आणीन.”
25 म्हणून लबाडी करु नका! “प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबरोबरच्या व्यक्तीशी खरे तेच बोलावे.” 26 “तुम्ही रागवा पण पाप करु नका.” सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. 27 तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका. 28 जो कोणी चोरी करील असेल तर त्याने यापुढे चोरी करु नये. उलट, त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे.
29 तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. 30 आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दु:खी करु नका. कारण तुम्ही आत्म्याबरोबर देवाची संपत्ती म्हणून तारणाच्या दिवसासाठी शिक्का मारलेले असे आहात. 31 सर्व प्रकारची कटुता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. 32 एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.
5 प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा, 2 आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.
2006 by World Bible Translation Center