Revised Common Lectionary (Semicontinuous)
हबक्कूकची देवाकडे तक्रार
1 संदेष्टा हबक्कूकला दिलेला संदेश आसा आहे:
2 परमेश्वरा, मी मदतीसाठी सतत आळवणी करीत आहे. माझ्या हाकेला तू ओ कधी देणार? हिंसाचाराबद्दल मी किती आरडाओरड केली पण तू काहीच केले नाहीस. 3 लोक चोऱ्या करीत आहेत, दुसऱ्यांना दुखवीत आहेत, वादविवाद करीत आहेत आणि भांडत आहेत. अशा भयंकर गोष्टी तू मला का पाहायला लावीन आहेस? 4 कायदा दुबळा झाला असल्याने, लोकांना योग्य न्याय मिळत नाही. दुष्ट सज्जनांवर विजय मिळवितात. म्हणजेच कायदा न्याय राहिलेला नाही. न्यायाचा जय होत नाही.
2 मी रखवालदारसारखा उभा राहून लक्ष ठेवीन परमेश्वर मला काय सांगतो,
त्याची मी वाट पाहीन मी वाट पाहीन
आणि तो माझ्या प्रश्नाला कसे उत्तर देतो ते बघीन.
देवाचे हबक्कूकला उत्तर
2 परमेश्वर मला म्हणाला, “मी तुला जे दाखवितो, ते लिहून ठेव लोकांना सहज वाचता यावे, म्हणून पाटीवर स्पष्ट लिही. 3 हा संदेश भविष्यातील विशिष्ट काळासाठी आहे. हा अंताबद्दलचा संदेश आहे आणि तो खरा ठरेल ती वेळ कदाचित कधीच येणार नाही असे वाटेल, पण धीर धरा आणि वाट पाहा! ती वेळ येईल ती येण्यास फार विलंब लागणार नाही. 4 जे लोक हा संदेश ऐकण्याचे नाकारतील, त्यांना त्याचा फायदा होऊ शकणार नाही. पण सज्जन माणूस ह्या संदेशावर विश्वास ठेवील. आणि तो त्याच्या श्रध्देमुळे जगे”
त्सादे
137 परमेश्वरा, तू चांगला आहेस
आणि तुझे नियम योग्य आहेत.
138 तू आम्हाला करारात चांगले नियम दिलेस
त्यावर आम्ही खरोखरच विश्वास ठेवू शकतो.
139 माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत.
माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.
140 परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो
याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते.
141 मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत.
पण मी तुझ्या आज्ञा विसरत नाही.
142 परमेश्वरा, तुझा चांगलुपणा सदैव राहो
आणि तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
143 माझ्यावर खूप संकटे आली आणि
वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात.
144 तुझा करार नेहमीच चांगला असतो.
तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन.
1 पौल सिल्वान आणि तीमथ्य याजकडून, थेस्सलनीका येथील मंडळीला जो देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्ताची आहे त्यांना
2 देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि शांति तुम्हांबरोबर असो.
3 बंधूंनो, आम्ही नेहमीच तुमच्यासाठी देवाचे आभार मानतो व तसे करणे योग्य आहे. कारण तुमचा विश्वास अद्भुत रीतीने वाढत आहे आणि जे प्रेम तुम्हांतील प्रत्येकाचे एकमेकांवर आहे ते वाढत आहे. 4 म्हणून आम्हाला स्वतः देवाच्या मंडळ्यांमध्ये सर्व छळात व तुम्ही सहन करीत असलेले दु:ख, त्याविषयीची तुमची सहनशीलता सोशिकपणा आणि विश्वासाचा अभिमान वाटतो.
11 या कारणासाठी आम्ही नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करतो व विनंति करतो की, आमच्या देवाने त्याच्या पाचारणासाठी योग्य असे तुम्हाला गणावे तुमच्या विश्वासापासून निर्माण होणारे प्रत्येक काम व चांगुलपणाचा निश्चय समर्थपणे पूर्ण करावा. 12 यासाठी की आमचा देव आणि प्रभु येशूच्या कृपेने आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचे नाव तुमच्यामध्ये आणि तुम्ही त्याच्यामध्ये गौरविले जावे.
जक्कय
19 येशूने यरीहोत प्रवेश केला आणि यरीहोतून जात होता. 2 तेथे जक्कय या नावाचा मनुष्य होता. तो मुख्य जकातदार होता आणि खूप श्रीमंत होता. 3 येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना, कारण तो बुटका होता. 4 तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता.
5 येशू जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून जक्कय याला म्हणाला, “जक्कया त्वरा कर आणि खाली ये. कारण आज मला तुझ्याच घरी राहायचे आहे.”
6 मग तो घाईघाईने खाली उतरला आणि आनंदाने त्याचे स्वागत केले. 7 सर्व लोकांनी ते पाहिले, ते कुरकूर करु लागले. व म्हणू लागले की, “तो पापी माणसाचा पाहुणा होण्यास गेला आहे.”
8 परंतु जक्कय उभा राहिला व प्रभूला म्हणाला, “गुरुजी, जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा व मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन.”
9 येशू त्याला म्हणाला, “आज या घराला तारण मिळाले आहे. कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा पुत्र आहे. 10 कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे.”
2006 by World Bible Translation Center