Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र
76 यहुदातील लोकांना देव माहीत आहे.
इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात.
2 देवाचे मंदिर शालेममध्ये आहे.
देवाचे घर सियोन डोंगरावर आहे.
3 देवाने त्या ठिकाणी धनुष्य बाण, ढाली, तलवारी
आणि इतर शस्त्रांचा नाश केला.
4 देवा, तू ज्या डोंगरावर शत्रूचा पराभव केलास
त्या डोंगरावरुन परतताना तू वैभवशाली दिसतोस.
5 त्या सैनिकांना आपण खूप बलवान आहोत असे वाटत होते.
परंतु आता ते रणांगणावर मरुन पडले आहेत.
त्यांची शरीरे आता त्यांच्या जवळच्या वस्तू ओरबाडल्या गेल्यामुळे उघडी पडली आहेत.
या शूर सैनिकांपैकी कुणीही स्वत:चे रक्षण करु शकला नाही.
6 याकोबाचा देव त्या सैनिकांवर ओरडला
आणि ते सैन्य त्यांचा रथ आणि घोडे यांच्यासकट मरुन पडले.
7 देवा, तू भयकारी आहेस.
तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.
8-9 परमेश्वर न्यायाधीश म्हणून उभा ठाकला.
त्याने त्याचे निर्णय जाहीर केले.
देवाने देशातल्या दीन लोकांना वाचवले त्याने स्वर्गातून निर्णय दिला.
सर्व पृथ्वी शांत आणि घाबरलेली होती.
10 तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात.
तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.
11 लोकहो! तुम्ही तुमच्या परमेश्वराला, देवाला वचने दिलीत.
आता तुम्ही जी वचने दिलीत ती पूर्ण करा.
प्रत्येक ठिकाणचे लोक देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात.
ते देवासाठी भेटी आणतात.
12 देव मोठ्या नेत्यांचा सुध्दा पराभव करतो.
पृथ्वीवरचे सर्व राजे त्याला घाबरतात.
देव सर्व राष्ट्रांना न्याय देईल
66 देव असे म्हणाला,
“आकाश माझे सिंहासन आहे
आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे.
मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही.
तुम्हाला ते शक्य नाही.
तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही.
तुम्ही जागा देऊ शकणार नाही.
2 मी स्वतःच सर्व गोष्टी निर्माण केल्या.
मी घडविल्या म्हणून या सर्व गोष्टी येथे आहेत.”
परमेश्वर असे म्हणाला, “मला सांगा, मी कोणत्या लोकांची काळजी घेतो?
मी गरीब आणि नम्र लोकांची काळजी घेतो.
हे लोक फार दु:खी आहेत.
माझ्या शब्दांचे पालन करणाऱ्या लोकांची मी काळजी घेतो.
3 काही लोक बैलांना मारून होमार्पण देतात,
पण ते लोकांनाही चोपतात
ते लोक होमार्पण अर्पण करण्यासाठी मेंढ्या मारतात
पण ते कुत्र्यांच्याही माना मुरगळतात.
ते डुकराचे रक्त मला अर्पण करतात.
ते लोक आठवणीने धूप जाळतात,
पण ते त्यांच्या शून्य किंमतीच्या मूर्तीवरही प्रेम करतात.
ते लोक त्यांचे स्वतःचे मार्ग निवडतात.
माझे मार्ग निवडत नाहीत.
ते त्यांच्या भयानक मूर्तीवर प्रेम करतात.
4 म्हणून मी त्यांच्याच युक्त्या वापरायचे ठरविले आहे.
ह्याचाच अर्थ ते ज्या गोष्टींना फार भितात, त्या वापरून मी त्यांना शिक्षा करीन.
मी त्या लोकांना बोलाविले पण त्यांनी ऐकले नाही.
मी त्यांच्याशी बोललो, पण त्यांना ते ऐकू आले नाही म्हणून मी त्यांच्यासाठी तीच गोष्टी करीन.
मी ज्यांना पापे म्हटले, त्या गोष्टी त्यांनी केल्या.
मला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी निवडल्या.”
5 परमेश्वराच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकहो
तुम्ही परमेश्वर ज्या गोष्टी सांगतो त्या ऐकाव्या.
“तुमच्या भावांनी तुमचा तिरस्कार केला.
ते तुमच्याविरूध्द् गेले, कारण तुम्ही मला अनुसरलात.
तुमचे भाऊ म्हणाले, ‘परमेश्वराचा सन्मान केला गेल्यावर आम्ही परत तुमच्याकडे येऊ.
मग आम्हाला तुमच्याबरोबर राहण्यात आनंद होईल.’
त्या वाईट लोकांना शिक्षा केली जाईल.”
शिक्षा आणि नवे राष्ट्र
6 ऐका! नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे. त्यांना योग्य शिक्षा देव करीत आहे.
7-8 “कळा आल्याशिवाय बाई मुलाला जन्म देत नाही. आपण जन्म दिलेल्या मुलाला पाहण्यासाठी बाईला कळा सहन कराव्या लागतात. त्याचप्रमाणे कोणीही नव्या जगाचा आरंभ एका दिवसात झालेला पाहिला नाही. एका दिवसात नवीन राष्ट्र उभे राहिल्याचे कोणीही ऐकलेले नाही. राष्ट्राला प्रथम प्रसूतिवेदनांसारख्या वेदना व्हाव्याच लागतात. प्रसूतिवेदनानंतर सियोन तिच्या मुलांना जन्म देईल. 9 त्याचप्रमाणे मी सुध्दा नवीन निर्मिती होऊ न देता वेदना होऊ देणार नाही.”
परमेश्वर पुढे म्हणतो, “जर मी तुम्हाला प्रसूतिवेदना दिल्या तर तुम्हाला नवीन राष्ट्र मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मी तुम्हाला वचन देतो.” तुमचा देव असे म्हणाला.
10 यरूशलेम, सुखी हो! यरूशलेमवर प्रेम करणारे तुम्ही लोकहो, सुखी व्हा!
यरूशलेमला दु:खकारक गोष्टी घडल्या म्हणून तुमच्यातील काही लोकांना दु:ख झाले आहे. पण आता तुम्ही सुखी व्हावे.
11 का? कारण आईच्या स्तनातून येणाऱ्या दुधासारखी दया तुम्हाला मिळेल,
ते “दूध” तुम्हाला खरी तृप्ती देईल.
तुम्ही ते दूध प्याल आणि तुम्ही यरूशलेमच्या वैभवाने खरोखरीच आनंदित व्हाल.
12 परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी तुम्हाला शांती देईन.
मोठ्या नदीप्रमाणे ही शांती वाहत वाहत तुमच्याकडे येईल.
पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या संपत्तीचा ओघ तुमच्याकडे येईल.
पुराप्रमाणे हा संपत्तीचा ओघ येईल.
तुम्ही लहान मुलासारखे व्हाल. तुम्ही ‘दूध’ प्याल.
मी तुम्हाला उचलून कडेवर घेईन.
मी तुम्हाला मांडीवर खेळवीन.
13 तुम्ही यरूशलेममध्ये आरामात राहाल.
आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.”
तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा
23 “काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत.” पण सर्वच हितकारक नाही. “आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत.” परंतु सर्व गोष्टी लोकांना सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत. 24 कोणीही स्वतःचेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.
25 मांसाच्या बाजारात जे मास विकले जाते ते कोणतेही मांस खा. विवेकबुध्दीला त्या मांसाविषयीचे कोणतेही प्रश्न न विचारता खा. 26 कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही प्रभूचे आहे.”
27 विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हांला जेवावयास बोलाविले आणि तुम्हांस जावेसे वाटले तर सद्सद्वविवेकबुद्धिने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा. 28 परंतु जर कोणी तुम्हांस सांगितले की, “हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,” तर विवेकबुद्धिसाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका. 29 आणि जेव्हा मी “विवेक” म्हणतो तो स्वतःचा असे मी म्हणत नाही तर इतरांचा. आणि हेच फक्त एक कारण आहे. कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सद्सद्विवेकबुद्धिने न्याय का करावा? 30 जर मी आभारपूर्वक अन्र खातो तर माझ्यावर टीका होऊ नये. कारण या गोष्टींबद्दल देवाला मी धन्यवाद देतो.
31 म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा. 32 यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका. 33 जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
11 मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
2006 by World Bible Translation Center