Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र
145 देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो.
मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
2 मी तुझी रोज स्तुती करतो.
तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.
3 परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात.
त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.
4 परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील.
तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
5 तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे.
मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.
17 परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते.
तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
18 जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात,
त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो.
जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो,
त्याच्या अगदी जवळ तो असतो.
19 भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो.
परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो.
तो त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो
आणि त्यांना वाचवतो.
20 जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
21 मी परमेश्वराची स्तुती करेन.
प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.
आपल्या लोकांनी परत यावे ही परमेश्वराची इच्छा
1 बरेख्या मुलगा जखऱ्या ह्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीला एक वर्ष आणि आठ महिने झाले, तेव्हाची ही गोष्टी. (जखऱ्या बरेख्याचा मुलगा व बरेख्या प्रेषित इद्दोचा मुलगा होय.) हा संदेश पुढीलप्रमाणे होता:
2 परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता. 3 म्हणून तू पुढील गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेस. परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुमच्याकडे येईन.” सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
4 परमेश्वर म्हणाला, “तुमच्या पूर्वजांप्रमाणे वागू नका. तुमच्या पूर्वजांनी आपली वाईट वर्तणूक बदलावी, वाईट गोष्टी करण्याचे टाळावे, ही सर्व शक्तिमान परमेश्वराची इच्छा असल्याचे, त्या काळच्या संदेष्ट्यांनी त्यांना समजावून सांगितले. होते. पण त्यांनी माझे ऐकले नाही.” परमेश्वराने ह्या गोष्टीची आठवण करुन दिली.
5 परमेश्वर म्हणाला, “तुमचे पूर्वज कालवश झाले आणि ते संदेष्टेसुध्दा चिरकाल जगले नाहीत. 6 ते संदेष्टे माझे सेवक होते. त्यांच्यामार्फत मी तुमच्या पूर्वजांना माझे नियम आणि शिकवणूक कळवीत असे. शेवटी तुमच्या पूर्वजांना धडा मिळाला. ते म्हणाले, ‘सर्व शक्तिमान परमेश्वराने बोलल्याप्रमाणे केले. आमच्या दुराचाराबद्दल व दुष्कृत्यांबद्दल आम्हाला शिक्षा केली.’ आणि ते देवाला शरण आले.”
चार घोडे
7 पारसचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या म्हणजे शेवटच्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्याला परमेश्वराचा आणखी एक संदेश मिळाला. (जखऱ्या हा बरेख्याचा मुलगा. बरेख्या संदेष्टा इद्दोचा मुलगा.) संदेश असा होता:
8 रात्री, तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक माणूस मी पाहिला. तो दरीमध्ये हादस्सीमच्या झुडुपांत उभा होता. त्याच्या मागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते. 9 मी विचारले, “महाराज, हे घोडे इकडे कशाकरिता?”
तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत म्हणाला, “हे घोडे इकडे कशाकरिता आलेत हे मी तुला दाखवीन.”
10 मग हादस्सीमच्या झुडुपांत उभा असलेला माणूस म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे घोडे पाठविलेत.”
11 नंतर ते घोडे हादस्सीमच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दूताशील बोलले. ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो. सर्वत्र स्थैर्य व शांतता आहे.”
12 मग परमेश्वराच्या दूताने विचारले, “परमेश्वरा, यरुशलेमची आणि यहूदाच्या नगरीचे तू समाधान करण्यापूर्वी त्यांची दु:खातून मुक्तता होण्यास आणखी किती वेळ आहे? गेली सत्तर वर्षे तू या नगरींवर कोपला आहेस.”
13 माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या दूताला मग परमेश्वराने उत्तर दिले. परमेश्वर चांगल्या व सांत्वनपर शब्दांत बोलला. 14 मग परमेश्वराच्या दूताने मला पुढील गोष्ट लोकांना कळविण्यास सांगितल्या: सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो:
“मला यरुशलेम व सियोन यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते.
15 आणि जी राष्ट्रे स्वतःला सुरक्षित समजतात, त्यांच्याबद्दल मला अतिशय राग आहे.
मी थोडासा रागावलो
आणि माज्या लोकांना शिक्षा करण्यासाठी मी त्या राष्ट्रांचा उपयोग केला.
पण त्या राष्ट्रांनी प्रचंड नुकसान केले.”
16 म्हणून परमेश्वर म्हणतो, “मी यरुशलोमला परत येईन आणि दया करुन तिचे दु:ख हलके करीन.”
सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमची पुन्हा उभारणी केली जाईल
आणि तिथे माझे निवासस्थान बांधले जाईल.”
17 देवदूत म्हणाला, “लोकांना हेही सांग की, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
‘माझ्या नगरी पुन्हा संपन्न होतील.
मी सियोनचे सांत्वन करीन.
माझी खास नगरी म्हणून मी यरुशलेमची निवड करीन.’”
22 येथपर्यंत यहूदी लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले मग ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अशा मनुष्याल पृथ्वीवरुन नाहीसे केले पाहिजे! तो जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही!” 23 ते मोठमोठ्याने ओरडत होते. आपल्या अंगावरील कपडे काढून फेकीत होते, आणि हवेत धूळ उधळीत होते. हे पाहून सरदाराने पौलाला किल्ल्यात नेण्याची आज्ञा केली. 24 त्याने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा. अशा प्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते. 25 परंतु जेव्हा पौलाला चाबकाने मारण्यासाठी बाहेर काढले, तेव्हा पौल जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला म्हणाला, “ज्याच्यामध्ये काही अपराध आढळत नाही अशा रोमी नागरिकाला तुमचे हे चाबकाचे मारणे कायदेशीर ठरते काय?”
26 जेव्हा शताधिपतीने हे ऐकले तेव्हा तो सरदाराकडे गेला आणि म्हणाला, “तुम्ही काय करीत आहात? तो मनुष्य तर रोमी नागरिक आहे.”
27 सरदार पौलाकडे आला व म्हणाला, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?”
पौल म्हणाला, “होय.”
28 शताधिपती म्हणाला, “रोमी नागरिकत्व मिळ विण्यासाठी मला पुष्कळ पैसे द्यावे लागले.”
पौल म्हणाला, “मी जन्मतःच रोमी नागरिक आहे.”
29 जे लोक त्याला प्रश्न विचारणार होते, ते ताबडतोब मागे सरकले. सरदार घाबरला, कारण त्याने पौलाला बांधले होते. व पौल हा रोमी नागरिक होता. त्यामुळे तो घाबरला.
पौल यहूदी पुढाऱ्यांशी बोलतो
30 दुसऱ्या दिवशी यहूदी लोक पौलावर नेमके कशामुळे दोष ठेवीत होते हे समजून घेण्यासाठी सरदाराने त्याला मोकळे सोडले. मग त्याने मुख्य याजक व धर्मसभेचे सभासद यांना एकत्र जमण्याची आज्ञा केली, मग त्याने पौलाला आणून त्यांच्यापुढे उभे केले.
23 पौल यहूदी धर्मसभेच्या सभासदांकडे रोखून पाहत म्हणाला, “माझ्या बंधूलो, मी आजपर्यंत चांगला विवेकभाव बाळगून देवासमोर माझे जीवन जगत आलो आहे.” 2 तेव्हा मुख्य याजक हनन्या याने पौलाच्या जवळ उभे राहिलेल्यांना पौलाच्या थोबाडीत मारण्यास सांगितले. 3 पौल हनन्याला म्हणाला, “सफेती लावलेल्या भिंतीसारख्या माणसा, देव तुला मारील! त्या ठिकाणी बसून नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो आणि तरीही नियमशास्त्राच्या विरुद्ध मला थोबडीत मारण्याचा आदेश देतोस?”
4 जे लोक पौलाच्या जवळ उभे होते ते म्हणाल, “देवाच्या मुख्य याजकाविरुद्ध तू असे बोलू शकत नाहीस, तू त्याचा अपमान करतोस काय?”
5 पौल म्हणाल, “बंधूनो, तो मनुष्य याजक आहे हे मला माहीत नव्हते, कारण असे लिहिले आहे की, ‘तू आपल्या शासन करणाऱ्याविरुद्ध बोलू नकोस’” [a]
6 जेव्हा पौलाच्या लक्षात आले की, धर्मसभेतील एक गट सदूकी आहे तर दुसरा परुशी. तेव्हा पौल मोठ्याने ओरडून सर्व धर्मसभेपुढे म्हणाला, “बंधूनो, मी एक परुशी आहे, परुश्याचा मुलगा आहे! मेलेल्यांच्या पुन्हा उठण्यासंबंधी माझी जी आशा आहे, त्यामुळे माइयावर हा चौकशीचा प्रसंग आला आहे.”
7 पौलाने असे म्हणताच, परुशी व सदूकी या दोन गटांमध्ये कलह सुरु झाला. आणि धर्मसभेत फूट पडली. 8 (सदूकी असे म्हणतात की, मृतांचे पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्मे नसतात, परुशी दोन्हीवर विश्वास ठेवतात.) 9 सर्व यहूदी मोठमोठ्याने ओरडून बोलू लागले. तेव्हा नियमशास्त्राचे काही शिक्षक उभे राहिले व जोरदारपणे आपले म्हणणे मांडू लागले. ते म्हणाले, “या मनुष्यात आम्हांला काहीच दोष आढळत नाही. कदाचित एखादा देवदूत किंवा आत्मा त्याच्याशी बोलला असेल!”
10 वादविवादाला हिंसक रुप येऊ लागले. तेव्हा लोक पौलाचे कदाचित तुकडे तुकडे करतील, अशी सरदाराला भीति वाटू लागली, म्हणून त्याने शिपायांना पौलाला तेथून घेऊन जाण्याची आज्ञा केली. व त्याला किल्ल्यात घेऊन जाण्यास सांगितले.
11 त्या रात्री प्रभु पौलाजवळ उभा राहिला. आणि म्हणाला, “धीर धर! कारण जशी तू माइयाविषयी यरुशलेममध्ये साक्ष दिलीस तशी तुला माइयाविषयी रोम येथे साक्ष द्यावी लागेल.”
2006 by World Bible Translation Center