Revised Common Lectionary (Semicontinuous)
स्तुतिगान
98 परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या
म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
त्याच्या पवित्र उजव्या बाहूने
त्याच्याकडे विजय परत आणला.
2 परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली.
परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
3 त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला.
दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
4 पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर.
त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
5 वीणे, परमेश्वराची स्तुती करा.
वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.
6 कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे,
परमेश्वराचे गुणवर्णन करा.
7 समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना
जोर जोरात गाऊ द्या.
8 नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो,
सगळ्यांनी बरोबर गाणे गा.
9 परमेश्वरासमोर गा.
कारण तो जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने राज्य करेल,
तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.
काम सुरु झाले आहे आशीर्वाद मिळतील
10 पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला. 11 सर्वशक्तिमान परमेश्वर या गोष्टींविषयी नियम काय सांगत आहे, हे तू याजकांना विचारावे अशी मी तुला आज्ञा देतो. 12 “समजा एखादा माणूस वस्त्रांमधून मांस नेतो. ते मांस परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आहे म्हणून ते पवित्र आहे. पण ज्या वस्त्रांत ते गुंडाळले आहे, त्या वस्त्राचा स्पर्श भाकरी, किंवा शिजविलेले अन्न, मद्य, तेल किंवा इतर अन्नाला झाला, तर ह्या स्पर्श झालेल्या सर्व वस्तू पवित्र होतील का?”
याजक उत्तरले, “नाही”
13 मग हाग्गयने विचारले, “एखाद्याने प्रेताला स्पर्श केला, तर तो अशुध्द होतो, ह्या माणसाने दुसऱ्या कोणत्या गोष्टीला स्पर्श केला, तर ती गोष्टसुध्दा अशुध्द होईल का?”
याजक म्हणाले, “हो! ती गोष्टसुध्दा अशुध्दच होईल.”
14 मग हाग्गय म्हणाला, “परमेश्वर देव, या गोष्टी सांगतो. ‘ह्या राष्ट्रातील लोकांबद्दलही असेच म्हणणे योग्य आहे. ते माझ्या दृष्टीने शुध्द व पवित्र नव्हते. म्हणून त्यांनी ज्या गोष्टींना स्पर्श केला, त्या अशुध्द झाल्या आणि ते वेदीवर जे जे अर्पण करतात ते ते अशुध्द आहे.
15 “‘आजच्या दिवसाच्या आधी काय घडले त्याचा विचार करा. परमेश्वराच्या मंदिराचे काम तुम्ही सुरु केलेत त्या पूर्वीच्या काळाचा विचार करा. 16 लोकांना वीस मापे धान्य पाहिजे असताना, राशीत दहा मापेच होते मद्यकुंडातून लोकांना पन्नास बुधले मद्य पाहिजे होते पर त्याच्यात फक्त वीसच बुधले मद्य होते. 17 का? कारण मी तुम्हाला शिक्षा केली. मी पाठविलेल्या रोगाने तुमची झाडे मेली. तुम्ही स्वतःच्या हाताने बनविलेल्या वस्तू मी पाठविलेल्या गारपिटीने नष्ट झाल्या. मी एवढे केले तरी तुम्ही मला शरण आला नाहीत.’ परमेश्वरच असे म्हणाला.”
18 परमेश्वर म्हणाला, “आज नवव्या महिन्याचा चोविसावा दिवस आहे. परमेश्वराच्या मंदिराच्या पायाचे काम तुम्ही पूर्ण केले आहे. आता ह्यापुढे काय होते त्यावर लक्ष ठेवा. 19 कोठारात अजून काही धान्य आहे का? नाही. केली, अंजीर, डाळिंबे, जैतुन ह्या झाडांकडे पाहा. त्यांना फळे धरत आहेत का? नाही. पण आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.”
आम्ही ख्रिस्ताचे वैभव पाहिले
16 कारण आपल्या प्रभु येशूच्या सामर्थ्ययुक्त आगमनाविषयी जेव्हा आम्ही तुम्हांला सांगितले, तेव्हा अक्क लहुशारीने बनवलेल्या भाखडकथांवर आम्ही विसंबून राहिलो नाही. उलट आम्ही आमच्या डोळ्यांनी त्याची महानता पाहिली. 17 कारण त्याला सन्मान व गौरव ही देवपित्याकडून प्राप्त झालीत, तेव्हा उदात्त गौरवाने अशी वाणी त्याच्याकडे आली: “हा माझा प्रिय पुत्र आहे याजविषयी मी संतुष्ट आहे.” 18 आणि त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना [a] ही वाणी स्वर्गातून येत असताना आम्ही स्वतः ऐकली.
19 आम्ही संदेष्ट्यांचे भविष्यवचन अती विश्वासनीय असे समजून त्यास मान देतो. त्याकडे लक्ष देऊन तुम्ही फार चांगले करता, कारण अगदी अंधारात प्रकाशणाऱ्या दीपाप्रमाणे ते दिसते म्हणून दिवस उजाडून प्रभात तारा तुमच्या अंतःकरणात प्रकाशेपर्यंत तुम्ही त्याकडे ध्यान देऊन पाहाल तर चांगले होईल. 20 प्रथम तुम्ही हे समजले पाहिजे की, पवित्र शास्त्रातील कोणतेही भविष्यवचन कोणाही मनुष्याच्या बुद्धीने उकलत नाही. 21 कारण एखाद्या मनुष्याला पाहिजे म्हणून भविष्यवाणी झालेली नाही, तर जे लोक पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले होते, त्यांनीच ती लोकांपर्यंत पोहचविलेली आहे.
2006 by World Bible Translation Center