Revised Common Lectionary (Semicontinuous)
जायिन
49 परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव.
ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
50 मी पीडित होतो, दु:खी होतो.
आणि तू माझे सांत्वन केलेस.
तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.
51 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझा सतत अपमान केला.
पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
52 मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो.
परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
53 दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे
सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो.
54 घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.
55 परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव
आणि तुझी शिकवण आठवते.
56 असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.
देवाचे वचन
33 यिर्मयाला दुसऱ्यांदा परमेश्वराचा संदेश आला. यिर्मया अजूनही पहारेकऱ्यांच्या चौकात कैद होता. 2 “परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली आणि तो तिचे रक्षण करतो, परमेश्वर हेच त्याचे नाव. परमेश्वर म्हणतो, 3 ‘यहूदा, माझा धावा कर. मी ओ देईन. मी तुला महत्वाची रहस्ये सांगीन. ह्या गोष्टी तू पूर्वी कधीच ऐकल्या नसशील.’ 4 परमेश्वर इस्राएलचा देव आहे. परमेश्वर यरुशलेममधील घरांविषयी व यहूदातील राजांच्या राजवाड्यांविषयी पुढील गोष्टी सांगतो, ‘शत्रू ती घरे पाडील. नगरांच्या तटबंदीपर्यंत तो उतरंडी बांधील. शत्रू शहरांतील लोकांशी तलवारीने लढेल.
5 “‘यरुशलेमच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या. म्हणून मला त्या लोकांचा खूप राग आला. मी त्यांच्याविरुद्ध गेलो. मी तेथे पुष्कळ माणसे मारीन. बाबेलचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढण्यास येईल. यरुशलेमच्या घरांत खूप मृतदेह असतील.
6 “‘पण मग मी त्या नगरीतील लोकांना बरे करीन. मी त्यांना शांती आणि सुरक्षा ह्यांचा आनंद लुटू देईन. 7 यहूदा आणि इस्राएल यांना मी परत आणीन पूर्वीप्रमाणेच मी त्या लोकांना शक्तिशाली करीन. 8 त्यांनी माझ्याशी पापे केली. पण मी ती पापे धुवून टाकीन. ते माझ्याविरुद्ध लढले पण मी त्यांना क्षमा करीन. 9 मग यरुशलेम एक सुंदर ठिकाण होईल. लोक सुखी असतील दुसऱ्या राष्ट्रांतील लोक त्या नगरीची स्तुती करतील. यरुशलेममध्ये चांगल्या गोष्टी घडत असल्याचे ऐकून इतर लोक प्रशंसा करतील. मी इस्राएलला शांतता आणि हित प्राप्त करुन दिल्यामुळे त्यांना माझ्याबद्दल आदरयुक्त दरारा वाटेल व त्यामुळे ते कापतील.’
10 “तुम्ही लोक म्हणत आहात ‘आमचा देश म्हणजे ओसाड वाळवंट आहे. तेथे कोणी माणसे वा प्राणी राहत नाहीत.’ यरुशलेमच्या रस्त्यांवर व यहूदाच्या शहरात सध्या शांतता आहे. पण लवकरच तेथे कोलाहल सुरु होईल. 11 तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.
12 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “आता ही जागा निर्जन आहे. तेथे मनुष्य वा प्राणी कोणीही नाही. पण यहूदातील गावे माणसांनी गजबजतील. तेथे मेंढपाळ असतील आणि त्यांच्या मेंढ्यांना रवंथ करण्यासाठी कुरणेही असतील. 13 मेंढ्या मेंढपाळांच्या पुढे चालत असताना. मेंढपाळ त्या मोजतील. सर्व देशातील लोक-डोंगराळ प्रदेशातील, पश्र्चिमेकडच्या डोंगरपायथ्याचे व नेगेव मधील लोक आणि यहूदातील इतर शहरांतील माणसे मेंढ्यांची मोजदाद करतील.”
एक श्रीमंत मनुष्य येशूला अनुसरण्याचे नाकारतो(A)
16 एक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी अनंतकाळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?”
17 येशूने उत्तर दिले, “काय चांगले आहे असे मला का विचारतोस? फक्त देव एकच चांगला आहे पण जर तुला अनंतकाळचे जीवन पाहिजे तर सर्व आज्ञा पाळ.”
18 त्याने विचारले, “कोणत्या आज्ञा?”
येशूने उत्तर दिले, “‘खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. 19 आपल्या आईवडिलांना मान दे’b आणि ‘जशी स्वतःवर प्रीति करतोस तशी इतंरावर प्रीति कर.’” [a]
20 तो तरुण म्हणाला, “या सर्व आज्ञा मी पाळत आलो आहे. मी आणखी काय करावे?”
21 येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक. आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठा ठेवा मळेल. मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.”
22 पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्याला फार दु:ख झाले. कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला.
2006 by World Bible Translation Center