Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 119:97-104

मेम

97 परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते.
    मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
98 परमेश्वरा, तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा शहाणे करतात.
    तुझे नियम नेहमी माझ्याजवळ असतात.
99 मी माझ्या सगळ्या शिक्षकांपेक्षा शहाणा आहे.
    कारण मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
100 जुन्या पुढाऱ्यांपेक्षा मला जास्त
    कळते कारण मी तुझ्या आज्ञा सांभाळतो.
101 तू मला प्रत्येक पावलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून
    दूर ठेवतोस म्हणून परमेश्वरा, मी तू जे सांगशील ते करु शकतो.
102 परमेश्वरा, तू माझा गुरु आहेस
    म्हणून मी तुझे नियम पाळणे बंद करणार नाही.
103 माझ्या तोंडात तुझे शब्द
    मधापेक्षाही गोड आहेत.
104 तुझी शिकवण मला शहाणा करते.
    त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.

यिर्मया 31:15-26

15 परमेश्वर म्हणतो,
“रामामधून आवाज ऐकू येईल.
    तो भयंकर आकांत असेल खूप शोक असेल.
राहेल आपल्या मुलांसाठी रडेल
    तिची मुले मेल्यामुळे ती कोणाकडूनही
    सांत्वन करुन घेणार नाही.”

16 पण परमेश्वर म्हणतो, “रडू नकोस!
    तुझे डोळे आसवांनी भरु नकोस
तुझ्या कामाबद्दल तुला बक्षीस मिळेल”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“इस्राएलचे लोक त्यांच्या शत्रूंच्या देशातून परत येतील.
17 इस्राएल, तुला आशा आहे.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
    “तुझी मुले त्यांच्या स्वतःच्या देशात परत येतील.
18 एफ्राईमला रडताना मी ऐकले आहे.
    एफ्राईमला मी पुढील गोष्टी बोलताना ऐकले आहे.
    ‘परमेश्वर तू खरोखरच मला शिक्षा केलीस आणि मी धडा शिकलो.
    मी बेबंद वासराप्रमाणे होतो.
कृपा करुन मला शिक्षा करण्याचे थांबव.
    मी तुझ्याकडे परत येईन.
    तू खरोखरच, परमेश्वर, माझा देव आहेस.
19 परमेश्वरा, मी तुझ्यापासून भटकले होते.
    पण मी केलेली पापे मला कळली,
    म्हणून मी माझे मन आणि जीवन बदलले.
मी तरुण असताना केलेल्या मूर्खपणाच्या गोष्टींची मला लाज वाटते.
त्यामुळे मला ओशाळे वाटते.’”
20 देव म्हणतो,
“एफ्राईम माझा लाडका मुलगा आहे,
    हे तुम्हांला माहीतच आहे मी त्याच्यावर प्रेम करतो.
हो! मी नेहमीच एफ्राईमवर टीका केली.
    पण तरीही मला त्याची आठवण येते.
तो मला अतिशय प्रिय आहे
    आणि मी खरोखरच त्यांच्यावर दया करतो.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

21 “इस्राएलच्या लोकानो, रस्त्यांवर खुणांचे फलक लावा.
    घराकडे जाणाऱ्या वाटेवर खूण करा.
वाटेवर लक्ष ठेवा.
    तुम्ही ज्या रस्त्यावरुन जात आहात.
    त्याचे स्मरण ठेवा.
इस्राएल माझ्या पत्नी, घरी ये.
    तुझ्या गावांना परत ये.
22 तू विश्वासघातकी मुलगी होतीस.
    पण तू बदलशील.
    तू घरी येण्याआधी किती वेळ वाट बघशील?

“परमेश्वराने अघटित निर्माण केले आहे.
    स्त्रीला पुरुषाभोवती फिरु दिले.” [a]

23 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांसाठी मी पुन्हा चांगल्या गोष्टी करीन. कैदी म्हणून नेलेल्या लोकांना परत आणीन. त्या वेळी, यहूदाच्या शहरांत व गावांत राहणारे सर्व लोक म्हणतील, ‘सदगृह, पवित्र पर्वतावर, परमेश्वर तुझे कल्याण करो!’

24 “यहूदातील सर्व गावांतील लोक एकत्र येतील व तेथे शांतता नांदेल. यहुदामधील शेतकरी आणि (मेंढ्यांचे) कळप घेऊन फिरणारे सर्वजण शांतीने राहतील. 25 दुबळ्या आणि थकलेल्या लोकांना मी आराम आणि शक्ती देईन. मी दु:खितांच्या इच्छा पुऱ्या करीन.”

26 हे ऐकल्यानंतर, मी (यिर्मया) उठलो, आणि आजूबाजूला पाहिले. ती खरोखरच फार सुखद निद्रा होती.

मार्क 10:46-52

येशू आंधळ्याला बरे करतो(A)

46 मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. 47 जेव्हा त्याने ऐकले की, नासरेथचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.”

48 तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला. “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.”

49 मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा.”

तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविल आणि म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलावीत आहे.” 50 त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला.

51 येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”

आंधळा मनुष्य त्याला म्हणाला, “गुरुजी मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी.”

52 मग येशू त्याला म्हणाला, “जा! तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस.” लगेच तो पाहू शकला (त्याला दृष्टी आली) आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center