Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
129 “मला आयुष्यभर खूप शत्रू होते.”
इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.
2 मला आयुष्यभर खूप शत्रू होते
पण ते कधीही विजयी झाले नाहीत.
3 माझ्या पाठीत खोल जखमा होईपर्यंत त्यांनी मला मारले.
मला खूप मोठ्या आणि खोल जखमा झाल्या.
4 पण परमेश्वराने दोर कापले
आणि मला त्या दुष्टांपासून सोडवले.
5 जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला.
त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले.
6 ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते.
ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.
7 ते गवत कामगाराला मूठ भरही मिळू शकत नाही.
धान्याचा ढीग करण्याइतकेही ते नसते.
8 त्यांच्या जवळून जाणारे लोक, “परमेश्वर तुला आशीर्वाद देवो” असे म्हणणार नाहीत.
लोक त्यांचे स्वागत करुन, “आम्ही परमेश्वराच्या नावाने तुम्हाला आशीर्वाद देतो” असे म्हणणार नाहीत.
सिद्कीया यिर्मयाला काही प्रश्न पुन्हा विचारतो
14 नंतर सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलवायला कोणाला तरी पाठविले. त्याने यिर्मयाला परमेश्वराच्या मंदिराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आणविले मग राजा म्हणाला, “यिर्मया, मी तुला काही विचारतो माझ्यापासून काही लपवू नकोस. मला प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांग!”
15 यिर्मया सिद्कीयाला म्हणाला, “मी तुला काही सांगितले, तर तू बहुधा मला मारशील मी तुला जरी सल्ला दिला, तरी तू माझे ऐकणार नाहीस!”
16 पण सिद्कीया राजाने गुप्तपणे शपथ घेतली. सिद्कीया म्हणाला, परमेश्वराने आम्हाला जीव व जीवन दिले. परमेश्वर नक्कीच आहे म्हणून मी वचन देतो की यिर्मया मी तुला मारणार नाही. तुला मारु इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात मी तुला देणार नाही, असेही मी तुला वचन देतो.
17 मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वर हा इस्राएलचा देव आहे. तोच म्हणतो ‘तुम्ही जर बाबेलच्या राजाला शरण गेलात, तर तुमच्या जिविताचे रक्षण होईल. यरुशलेम जाळले जाणार नाही. तू आणि तुझे कुटुंबीयही जगाल. 18 पण तू शरण जाण्यास नकार दिलास, तर यरुशलेम खास्द्यांच्या सैन्याच्या ताब्यात दिली जाईल. ते यरुशलेम जाळून भस्मसात करतील आणि तू त्यांच्या तावडीतून सुटणार नाहीस.’”
19 पण सिद्कीया राजा यिर्मयाला म्हणाला, “खास्द्यांच्या सैन्याला जाऊन मिळालेल्या यहूदाच्या लोकांची मला भीती वाटते. सैनिक मला त्या यहूदाच्या लोकांच्या ताब्यात देतील व ते लोक माझ्याशी अत्यंत वाईट वागतील, मला मारतील म्हणून मी घाबरतो.”
20 पण यिर्मया म्हणाला, “सैनिक तुला त्या यहूदाच्या लोकांच्या स्वाधीन करणार नाहीत. राजा सिद्कीया, माझ्या सांगण्याप्रमाणे वागून परमेश्वराची आज्ञा पाळ. मग तुझ्यासाठी सर्व सुरळीत होईल आणि तुझा जीवही वाचेल. 21 पण तू बाबेलच्या राजाला शरण जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे. परमेश्वराने मला पुढीलप्रमाणे सांगितले. 22 यहूदाच्या राजवाड्यात मागे राहिलेल्या सर्व स्त्रियांना बाबेलच्या राजाच्या मुख्य अधिकाऱ्यांपुढे आणले जाईल. त्या स्त्रिया पुढील गाणे गाऊन तुमची चेष्टा करतील.
‘तुमच्या चांगल्या मित्रांनी तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेले,
आणि ते तुमच्याहून बलवान झाले, तेच ते मित्र ज्यांच्यावर
तुम्ही विश्वास ठेवला.
तुमचे पाय चिखलात रुतलेत.
तुमच्या मित्रांनी तुम्हाला सोडले.’
23 “तुमच्या बायका मुलांना बाहेर काढले जाईल. त्यांना बाबेलच्या सैन्याच्या स्वाधीन केले जाईल. तू स्वतःही त्या सैन्याच्या तावडीतून सुटणार नाहीस. तुला बाबेलचा राजा पकडेल आणि यरुशलेम जाळले जाईल.”
24 मग सिद्कीया यिर्मयाला म्हणाला, “मी तुझ्याशी बोललो हे कोणालाही सांगू नकोस. तसे केलेस, तर मरशील. 25 कदाचित्. मी तुझ्याशी बोललो हे त्या अधिकाऱ्यांना कळेल. मग ते तुझ्याकडे येतील आणि म्हणतील, ‘यिर्मया, तू सिद्कीया राजाला काय सांगितलेस ते आम्हाला सांग तसेच सिद्कीया तुला काय म्हणाला तेही सांग. आमच्याशी खरे बोल व प्रत्येक गोष्ट सांग नाहीतर आम्ही तुला ठार मारु’ 26 जर ते असे म्हणाले तर तू त्यांना सांग ‘मी राजाकडे मला योनाथानच्या घरातील अंधार कोठडीत परत पाठवू नका.’ अशी गयावया केली. मी तेथे परत गेलो, तर मी मरेन.”
27 ते वरिष्ठ अधिकारी यिर्मयाकडे येऊन प्रश्न विचारु लागले. खरेच असे घडले? मग राजाने हुकूम केल्याप्रमाणे यिर्मयाने सांगितले. मग त्या अधिकाऱ्यांनी यिर्मयाला सोडले. यिर्मया व राजा यांच्यात झालेले बोलणे कोणालाही कळले नाही.
28 मग यिर्मया, यरुशलेम जिंकले जाईपर्यंत, मंदिराच्या चौकात पहाऱ्यात राहिला.
Judging Problems Between Believers
6 जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्या व्यक्तीबरोबर भांडणतंटा असेल तर ती समस्या (वाद) देवाच्या पवित्र लोकांपुढे न आणता ती व्यक्ति तो वाद न्यायालयात अनीतिमान लोकांसमोर नेण्याचे धाडस का करते? 2 किंवा तुम्हांला माहीत नाही का की देवाचे पवित्र लोक जगाचा न्याय करतील? आणि जर जगाचा न्याय तुमच्याकडून होणार आहे तर लहानशा बाबींमध्ये त्याचा न्याय करण्यासाठी तुम्ही अपात्र आहात काय? 3 आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हांला माहीत नाही का? तर मग रोजच्या जीवनातील साध्या गोष्टींचा विचारसुद्धा कशाला? 4 म्हणून जर दररोज तुम्हांला प्रकरणे निकालात काढायची असतील, तर ज्यांना मंडळीत काही पाठिंबा नाही, अशा माणसांना न्यायाधीश म्हणून का नियुक्त करता? 5 तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी हे म्हणत आहे. गोष्टी इतक्या वाईट होत आहेत का की, तुमच्यामध्ये एकही सुज्ञ मनुष्य नाही जो त्याच्या (ख्रिस्ती) भावांचा समेट घडवून आणू शकेल? 6 पण एक भाऊ दुसऱ्या भावाविरुद्ध न्यायालयात जातो आणि तुम्ही हे सर्व अविश्वासणाऱ्यांसमोर करीत आहात?
7 वास्तविक, तुमचे एकमेकांविरुद्ध खटले आहेत यातच तुमचा संपूर्ण पराभव झाला आहे. त्याऐवजी तुम्ही स्वतःवर अन्याय का होऊ देत नाही? त्याऐवजी तुम्ही स्वतःची लुबाडणूक का होऊ देत नाही? 8 उलट तुम्ही स्वतः अन्याय करता व लुबाडणूक करता, आणि तुम्ही हे सर्व तुमच्या ख्रिस्ती बांधवांना करता!
9-10 किंवा तुम्हांला माहीत नाही का की, अनीतिमान लोकांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही? तुमची स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका! जारकर्मी, मूर्तिपूजक, व्याभिचारी, पुरुषवेश्या (पुरुष जे समलिंगी संबंधास तयार होतात), समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, किंवा दरोडेखोर, लोभी, दारुडे, निंदा करणारे, फसविणारे यांपैकी कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. 11 आणि तुमच्यातील काही असे होते. पण तुम्ही स्वतःस धुतलेले होते, तुम्हाला देवाच्या सेवेला समर्पित केलेले होते. प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही नीतिमान ठरला होता व देवाच्या आत्म्यामध्ये नीतिमान ठरला होता.
2006 by World Bible Translation Center