Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नको” या चालीवर आधारित दावीताचे मिक्ताम
58 न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय?
तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय?
2 नाही, तुम्ही फक्त वाईट गोष्टी करण्याचाच विचार करता.
तुम्ही या देशात हिंसक कृत्ये करीत आहात.
3 त्या वाईट लोकांनी जन्मल्याबरोबर दुष्कर्म करायला सुरुवात केली.
ते जन्मापासूनच खोटारडे होते.
4 ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही.
ते सत्य ऐकायला नकार देतात.
5 नागाला गारुड्याचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही
आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत.
6 परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहासारखी आहेत.
म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड.
7 ते लोक वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे नाहीसे होवोत.
ते रस्त्यातल्या गवताप्रमाणे तुडवले जावोत.
8 चालताना विरघळून जाणाऱ्या गोगलगायी प्रमाणे ते विरघळून जावोत.
जन्मत: मेलेल्या व दिवसाचा प्रकाश न पाहिलेल्या बाळा प्रमाणे त्यांचे होवो.
9 भांडे तापविण्यासाठी काट्या पेटवितात.
तेव्हा त्यात चटकन् जळणाऱ्या काट्यांप्रमाणे त्यांचे होवो.
10 वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली
तर चांगल्या माणसाला आनंद होईल,
तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल.
11 असे जेव्हा घडेल तेव्हा लोक म्हणतील “चांगल्या माणसांना त्यांचे फळ मिळाले,
जगाला न्याय देण्यासाठी देव खरोखर आहे.”
23 “यहूदा, ‘मी अपराधी नाही.
मी बआलदैवताच्या मूर्तीची पूजा केली नाही’ असे तू मला कसे म्हणू शकतेस?
तू दरीमध्ये केलेल्या गोष्टींचा विचार कर.
तू काय केलेस त्याबद्दल विचार कर.
एका जागेवरुन दुसऱ्या जागी
धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस.
24 तू वाळवंटात राहणाऱ्या रानगाढवीप्रमाणे आहेस.
समागमाच्या काळात ती वारा हुंगते.
ती माजावर असताना कोणीही तिला परत आणू शकत नाही.
त्या काळात ज्याला पाहिजे त्या नराला ती मिळू शकते.
तिला मिळविणे सोपे असते.
25 यहूदा, मूर्तीमागे धावण्याचे थांबव.
त्या दैवतांची लागलेली तहान आता पुरे़.
पण तू म्हणतेस, ‘त्याचा काही उपयोग नाही.
मी त्यांना सोडू शकत नाही.
मला ते दैवत आवडतात.
मला त्यांना अनुसरायचे आहे.’
26 “चोराला लोकांनी पकडताच
तो शरमिंदा होतो.
त्याचप्रमाणे इस्राएलचे लोक झाले आहेत.
राजे आणि नेते, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.
27 ते लाकडाच्या तुकड्याशी बोलतात त्याला
‘माझे वडील’ म्हणतात.
ते खडकाशी बोलतात. ते म्हणतात,
‘तू मला जन्म दिलास.’
त्या सर्व लोकांना शरमेने मान खाली घालायला लागतील.
ते लोक माझ्याकडे पाहत नाहीत.
त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे.
पण जेव्हा यहूदातील लोक संकटात सापडतात, तेव्हा ते मला म्हणतात,
‘ये आणि आम्हाला वाचव.’
28 त्या मूर्तींना येऊ देत आणि तुम्हाला वाचवू देत.
तुम्ही स्वतः घडविलेल्या त्या मूर्ती कोठे आहेत?
तुम्ही संकटात असताना त्या मूर्ती येऊन तुम्हाला सोडवितात का ते पाहू या.
यहूदा, तुला तुझ्या शहरांइतक्या मूर्ती आहेत!
29 “तुम्ही माझ्याशी वाद का घालता?
तुम्ही सर्व माझ्याविरुद्ध गेलात.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.
30 “यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला शिक्षा केली,
पण त्याचा काही फायदा झाला नाही.
तुम्हाला शिक्षा झाल्यावरही तुम्ही परत आला नाहीत
तुमच्याकडे आलेल्या संदेष्ट्यांना तुम्ही तलवारीने मारले.
तुम्ही धोकादायक सिंहासारखे होता.
तुम्ही संदेष्ट्यांना ठार मारले.”
31 ह्या पिढीतील लोकांनो, परमेश्वराच्या संदेशाकडे लक्ष द्या.
“इस्राएलच्या लोकांना मी वाळवंटासारखा आहे का?
मी काळोखी आणि धोकादायक प्रदेशासारखा त्यांना वाटतो का?
माझे लोक म्हणतात, ‘आमच्या मार्गाने जायला आम्ही स्वतंत्र आहोत.
परमेश्वरा आम्ही तुझ्याकडे परत येणार नाही.’
ते असे का म्हणतात.?
32 तरुण स्त्री आपले दागिने विसरत नाही.
वधू आपला कमरपट्टा विसरत नाही.
पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.
33 “यहूदा, प्रियकरांचा (खोट्या देवांचा) पाठलाग कसा करायचा हे तुला बरोबर माहीत आहे.
दुष्कृत्ये करायला खरोखरच तू शिकली आहेस.
34 तुझ्या हातांना रक्त लागले आहे.
ते रक्त गरीब व निष्पाप माणसांचे आहे.
तुझे घर फोडताना तू त्यांना पकडले नाहीस.
तू कारण नसताना त्यांना ठार मारलेस.
35 पण तरी तू म्हणतेस, ‘मी निरपराध आहे.
परमेश्वर माझ्यावर रागावलेला नाही.’
मी तुला खोटे बोलल्याबद्दलही दोषी ठरवीन.
का? कारण तू म्हणतेस, ‘मी काहीही चूक केलेली नाही.’
36 मन बदलणे तुला अगदी सोपे आहे.
अश्शूरने तुझी निराशा केली, म्हणून तू अश्शूरला सोडले
आणि मदतीसाठी तू मिसरला गेलीस.
पण मिसरसुध्दा् तुझी निराशा करील.
37 मग अखेरीला तुला मिसरलाही सोडावे लागेल
आणि लाजेने तोंड लपवावे लागेल.
तू त्या देशांवर विश्वास ठेवलास.
पण परमेश्वराने त्या देशांना नाकारले.
म्हणून जिंकण्यासाठी ते तुला मदत करु शकत नाहीत.
7 ज्यांनी तुम्हांला देवाचा संदेश दिला त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील निष्पत्ती पाहा. आणि त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे. 9 निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिकवणुकींमुळे बहकून जाऊ नका. अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली ह्रदये बळकट केलेली फार बरी. कारण अन्नाच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.
10 ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे. 11 यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात. 12 म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांना शुद्ध करावे यासाठी नगराच्या वेशी बाहेर दु:ख सोसले, 13 म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. 14 कारण कायमस्वरूपी असे नगर आपल्याला येथे नसले तरी भविष्याकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत. 15 तर मग आपण येशूच्या द्वारे स्तुतीचा यज्ञ सातत्याने करू या. म्हणजे त्याचे नाव आपल्या ओठांनी सतत घेऊ या 16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
17 आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे.
18 आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सदसदविवेक बुध्दि शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तेच सदैव करीत राहावे अशी आमची इच्छा आहे. 19 मी तुम्हांला विनंति करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून प्रार्थना करा.
20-21 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभु येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्वारे उठविले. त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हांला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
2006 by World Bible Translation Center