Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे स्तोत्र
79 देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले.
त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला.
त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
2 शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली
त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली.
3 देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले.
प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.
4 आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला
आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
5 देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का?
देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?
6 देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव.
जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
7 त्या देशांनी याकोबाचा नाश केला
त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.
8 देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस.
आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव.
आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
9 देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर.
आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल.
आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.
8 हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे: “त्या वेळी, लोक यहूदाच्या राजाची प्रमुख नेत्यांची, याजकांची, संदेष्ट्यांची आणि यरुशलेममधील सर्व लोकांची हाडे कबरीतून बाहेर काढतील. ते ती हाडे चंद्र सूर्य तारे यांच्या खाली जमिनीवर पसरती. यरुशलेमच्या लोकांना चंद्र सूर्य तारे यांच्यावर प्रेम करायला, त्यांना अनुसरायला, त्यांचा सल्ला घ्यायला आणि त्यांची पूजा करायला आवडते. कोणीही ती हाडे गोळा करुन परत पुरणार नाही. ती हाडे जमिनीवर पसरलेल्या शेणखतासारखी असतील.
3 “मी यहूदातील लोकांना सक्तीने त्यांची घरे व त्यांचा देश सोडायला लावीन. लोकांना परक्या प्रदेशात नेले जाईल. यहूदातील जे दुष्टलोक युध्दात मारले गेले नाहीत, त्यांना आपण मारले गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल,” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
पाप आणि शिक्षा
4 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना हे सांग: ‘परमेश्वर असे म्हणतो:
“‘माणूस जमिनीवर पडल्यास
पुन्हा उठतो
व जर माणूस चुकीच्या मार्गाने गेला
तर फिरुन मागे येतो, हे तुम्हाला माहीत आहे.
5 यहूदाचे लोक चुकीच्या मार्गाने गेले (जगले)
पण यरुशलेममधील लोक चुकीच्या मार्गाने सतत का जात आहेत?
ते त्यांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.
ते वळून परत येण्याचे नाकारतात.
6 मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे.
ते योग्य ते बोलत नाहीत.
त्यांना त्यांच्या पापाबद्दल पश्र्चाताप वाटत नाही.
त्यांनी केलेल्या वाईट कर्मांचा ते विचार करीत नाहीत.
विचार केल्याशिवाय ते गोष्टी करतात.
युद्धात दौडणाऱ्या घोड्यांसारखे ते आहेत.
7 आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा वेळेची
योग्य जाणीव असते.
करकोचे, पारवे, निळवी व सारस ह्यांना
नवीन घरट्यात केव्हा जायचे ते समजते.
पण माझ्या लोकांना, देवाला त्यांच्याकडून काय हवे आहे ते कळत नाही.
8 “‘“आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत!” असे तुम्ही म्हणत राहता.
पण ते खरे नाही, का? कारण लेखक लेखण्यांच्या साहाय्याने खोटे बोलले आहेत.
9 त्या “शहाण्या लोकांनी” परमेश्वराची शिकवण ऐकण्याचे नाकारले
म्हणूनच ते अजिबात खरे शहाणे नाहीत.
ते “शहाणे लोक” सापळ्यात सापडले गेले.
त्यांना धक्का बसला. त्यांची अप्रतिष्ठा झाली.
10 म्हणून मी त्यांच्या बायका दुसऱ्यांना देईन.
त्यांची शेते नव्या मालकांना देईन.
इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे.
अती महत्वाचे व अति सामान्य सर्व सारखेच आहेत.
संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत सर्व खोटे बोलतात.
11 माझे लोक अतिशय वाईट रीतीने दुखावले जात आले आहेत.
संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात
पण ते तर त्या जखमांवर, किरकोळ खरचटल्यावर करतात, त्याप्रमाणे इलाज करतात.
ते म्हणतात, ‘ठीक आहे. ठीक आहेत.’
पण हे ठीक नाही.
12 संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे.
पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही.
आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही.
म्हणून बाकीच्यांबरोबर त्यांना शिक्षा होईल.
मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील.
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
13 “मी त्यांची फळे व पिके काढून घेईन.
मग तेथे सुगीचा हंगाम होणार नाही.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“वेलींवर एकही द्राक्ष नसेल.
अंजिराच्या झाडांवर एकही अंजिर नसेल.
एवढेच नाही तर झाडांची पानेही सुकतील व गळतील.
मी त्यांना दिलेल्या गोष्टी काढून घेईन. [a]
देवाची ख्रिस्त येशूमधील प्रीति
31 यावरुन आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? 32 ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले तो आपणांला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय? 33 देवाच्या निवडलेल्या लोकांवर आरोप कोण ठेवील? देव हाच एक त्यांना निरपराध ठरवितो. 34 दोषी ठरवितो तो कोण? जो मेला आणि याहीपेक्षा अधिक महत्तवाचे म्हणजे जो उठविला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, जो आपल्या वतीने मध्यस्थी करतो तो ख्रिस्त येशू आहे. 35 ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणांस कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय? 36 असे लिहिले आहे की,
“दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत.
आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात.” (A)
37 तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हांवर प्रीति केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवीत आहोत. 38 कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत, अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्यकाळात, 39 येशूचे सामर्थ्य, उंच किंवा खाली, जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणांस देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करु शकणार नाही.
2006 by World Bible Translation Center