Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नको” या चालीवर आधारित दावीताचे मिक्ताम
58 न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय?
तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय?
2 नाही, तुम्ही फक्त वाईट गोष्टी करण्याचाच विचार करता.
तुम्ही या देशात हिंसक कृत्ये करीत आहात.
3 त्या वाईट लोकांनी जन्मल्याबरोबर दुष्कर्म करायला सुरुवात केली.
ते जन्मापासूनच खोटारडे होते.
4 ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही.
ते सत्य ऐकायला नकार देतात.
5 नागाला गारुड्याचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही
आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत.
6 परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहासारखी आहेत.
म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड.
7 ते लोक वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे नाहीसे होवोत.
ते रस्त्यातल्या गवताप्रमाणे तुडवले जावोत.
8 चालताना विरघळून जाणाऱ्या गोगलगायी प्रमाणे ते विरघळून जावोत.
जन्मत: मेलेल्या व दिवसाचा प्रकाश न पाहिलेल्या बाळा प्रमाणे त्यांचे होवो.
9 भांडे तापविण्यासाठी काट्या पेटवितात.
तेव्हा त्यात चटकन् जळणाऱ्या काट्यांप्रमाणे त्यांचे होवो.
10 वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली
तर चांगल्या माणसाला आनंद होईल,
तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल.
11 असे जेव्हा घडेल तेव्हा लोक म्हणतील “चांगल्या माणसांना त्यांचे फळ मिळाले,
जगाला न्याय देण्यासाठी देव खरोखर आहे.”
3 “एखाद्याने बायकोशी घटस्फोट घेतल्यास ती त्याला सोडते आणि दुसऱ्याशी लग्न करते.
मग तो माणूस परत आपल्या बायकोकडे जाऊ शकतो का? नाही.
जर तो माणूस त्या बाईकडे परत गेला [a] तर तो देश ‘भ्रष्ट’ होतो.
यहूदा, खूप प्रियकर (खोटे देव) असलेल्या वारांगनेप्रमाणे
तू वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे.”
हा परमेश्वराचा संदेश होता.
2 “यहूदा, टेकड्यांच्या उजाड माथ्यांकडे पाहा.
अशी एक तरी जागा आहे का की जेथे तू तूझ्या प्रियकराबरोबर (खोट्या देवांबरोबर) समागम केला नाहीस?
वाळवंटात वाट पाहाणाऱ्या अरबांप्रमाणे,
तू प्रियकराची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसलीस.
तू देश ‘भ्रष्ट’ केलास. कसा?
तू खूप वाईट गोष्टी केल्यास.
तू माझा विश्वासघात केलास.
3 तू पाप केलेस म्हणून पाऊस पडला नाही.
वळवाचा पाऊस तर अजिबात पडला नाही.
पण तरी तुला लाज वाटत नाही.
वारांगनेप्रमाणे तुझ्या तोंडावर निर्लज्जपणाचे भाव आहेत.
तू तुझ्या कृत्यांबद्दल शरमिंदी होत नाहीस.
4 पण आता तू मला ‘पिता’ म्हणत आहेस.
तू म्हणालीस,
‘मी लहान असल्यापासून तू माझा मित्र आहेस.’
5 असेसुद्धा् म्हणालीस,
‘देव नेहमीच माझ्यावर रागावणार नाही.
देवाचा राग सतत राहणार नाही.’
“यहूदा, तू असे म्हणतेस,
पण तू करता येतील तेवढी दुष्कृत्ये केली आहेस.”
दोन वाईट बहिणी इस्राएल आणि यहूदा
6 योशीया यहुदावर राज्य करीत असताना, परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, इस्राएलने केलेली दुष्कृत्ये तू पाहिलीस ना? तिने माझा कसा विश्वासघात केले ते तू पाहिलेस. तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तींबरोबर व्यभिचार करुन पाप केले. 7 मी स्वतःशीच म्हणालो, ‘ही दुष्कृत्ये करुन झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.’ पण ती माझ्याकडे परत आली नाही. इस्राएलने काय केले हे इस्राएलच्या विश्वासघातकी बहिणीने यहूदाने पाहिले. 8 इस्राएल विश्वासघातकी आहे आणि तिला मी दूर का पाठविले ते तिला माहीत आहे. तिने व्यभिचाराचे पाप केले म्हणून मी तिला घटस्फोट दिला हे तिला कळले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण भयभीत झाली नाही. यहूदाला भीती वाटली नाही. यहूदाने सुध्दा बाहेर जाऊन वारांगनेप्रमाणे व्यवहार केला. 9 आपण वारांगनेप्रमाणे वागत आहोत ह्याची यहूदाला पर्वा नव्हती म्हणून तिने तिचा देश ‘भ्रष्ट’ केला. दगड आणि लाकूड यांपासून तयार केलेल्या मूर्तींची पूजा करुन तिने व्यभिचाराचे पाप केले. 10 इस्राएलची विश्वासघातकी बहीण (यहूदा) मनापासून माझ्याकडे परत आली नाही. परत येण्याचे तिने फक्त ढोंग केले.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
11 परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल माझ्याशी निष्ठावंत नाही. पण विश्वासघातकी यहूदापेक्षा तिच्याकडे सबळ सबबी होत्या. 12 यिर्मया, उत्तरेकडे बघ आणि संदेश सांग:
“‘इस्राएलच्या बेइमान लोकांनो, परत या’
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
‘मी तुमच्यावर संतापायचे सोडून देईन.
मी दयाळू आहे.’
हा परमेश्वराचा संदेश आहे.
‘मी कायमचा तुमच्यावर रागावणार नाही.
13 तुम्ही पाप केले आहे एवढे तुम्हाला समजले पाहिजे.
तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या,
विरुद्ध् गेलात तेच तुमचे पाप आहे.
तुम्ही दुसऱ्या राष्ट्रातील मूर्तींना प्रत्येक हिरव्या झाडाखाली पूजले.
तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.’”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे .
14 “तुम्ही लोक विश्वासघातकी आहात. पण माझ्याकडे परत या.” हा परमेश्वराचा संदेश होता. “मी तुमचा प्रभू आहे मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे घेईन आणि तुम्हाला सियोनला आणीन.
1 देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याजकडून, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासात त्यांना मदत करण्यासाठी मला पाठविण्यात आले. त्या लोकांना सत्याची ओळख करवून देण्यासाठी मला पाठविले. व ते सत्य लोकांना देवाची सेवा कशी करायची हे दाखविते. 2 तो विश्वास आणि ते ज्ञान अनंतकाळच्या जीवनाच्या आमच्या आशेमुळे येते. काळाची सुरुवात होण्यापूर्वी देवाने त्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले. आणि देव खोटे बोलत नाही. 3 देवाने आपल्या योग्य वेळी त्या जीवनाविषयीचा संदेश जगाला प्रकट केला. देवाने ते काम माझ्यावर सोपविले. त्या गोष्टीविषयी मी संदेश दिला कारण आमच्या तारणाऱ्या देवाने मला तसे करण्याची आज्ञा केली होती.
4 विश्वासातील माझा खरा मुलगा तीत याला मी लिहीत आहे.
देव पिता व ख्रिस्त येशू आपला तारणारा याजकडून तुला कृपा, दया व शाति असो.
तीताचे क्रेतातील कार्य
5 मी तुला क्रेत येथे सोडून या कारणासाठी आलो: की जे अजून अपूर्ण राहिले होते ते तू व्यवस्थित करावेस व मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक गावी वडील नेमावेत. 6 ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील. ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे. 7 कारण अध्यक्ष (सर्वांगीण काळजीवाहक) हा देवाचा कारभारी असल्यामुळे तो दोषी नसावा. तो उद्धट नसावा, त्याला लवकर राग येऊ नये; तो मद्यपान करणारा नसावा, तो भांडणाची आवड नसणारा, अप्रामाणिकपणे पैसे मिळविण्याची आवड नसणारा असावा. 8 तर तो आदरातिथ्य करणारा, चांगुलपणावर प्रेम करणारा, शहाणा, नीतिमान, भक्तीशील व स्वतःवर संयम ठेवणारा असावा. 9 विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की, हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे. व जे विरोध करतात, त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी.
2006 by World Bible Translation Center