Revised Common Lectionary (Semicontinuous)
जायिन
49 परमेश्वरा, तू मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव.
ते वचन माझ्या मनात आशा निर्माण करते.
50 मी पीडित होतो, दु:खी होतो.
आणि तू माझे सांत्वन केलेस.
तुझ्या शब्दांनी मला परत जगायला लावले.
51 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझा सतत अपमान केला.
पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.
52 मी नेहमी तुझ्या राहाणपणाच्या निर्णयांची आठवण ठेवतो.
परमेश्वरा, तुझे निर्णय मला समाधान देतात, माझे सांत्वन करतात.
53 दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे
सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो.
54 घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.
55 परमेश्वरा, रात्री मला तुझे नाव
आणि तुझी शिकवण आठवते.
56 असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.
16 नरीयाचा मुलगा बारुख ह्याला खरेदीखत दिल्यावर मी परमेश्वराची प्रार्थना केली. मी म्हणालो,
17 “परमेश्वर देवा, तू आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आणि पसरलेल्या हातामुळे तू ते निर्माण केलेस. तुला आश्र्चर्य कारक वाटण्याजोगे काहीही नाही. तुला काहीही असाध्य नाही. 18 परमेश्वरा, तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस. पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस. सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा, तुझे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर. 19 परमेश्वर, फार मोठ्या योजना आखतो आणि त्या पार पाडतो. लोक करीत असलेली प्रत्येक कृती तू पाहतोस. तू सत्कृत्ये करणाऱ्यांना बक्षिस देतोस व दुष्कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतोस. म्हणजेच प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे फळ देतोस. 20 परमेश्वरा, तू मिसर देशात अद्भुत चमत्कार केलास. आजपावेतोसुद्धा तू अद्भूत चमत्कार केले आहेस. तू हे चमत्कार इस्राएलमध्ये तर केलेच पण जेथे जेथे लोक आहेत तेथे तेथे केलेस. त्यामुळेच तुझी कीर्ती झाली. 21 परमेश्वरा, अद्भूत चमत्कारांच्याआधारे तू इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणलेस. ह्या गोष्टी तू स्वतःच्या सामर्थ्यवान हाताच्या बळावर केल्यास. तुझे सामर्थ्य विस्मयकारक आहे.!
22 “परमेश्वरा, ही भूमी तू इस्राएलच्या लोकांना दिलीस. फार पूर्वी हीच भूमी तू त्यांच्या पूर्वजांना द्यायचे कबूल केले होतेस. ही फार चांगली भूमी आहे. ह्या चांगल्या भूमीवर अनेक चांगल्या गोष्टी आहेत. 23 इस्राएलचे लोक ह्या देशात आले आणि त्यांनी तो देश आपल्या मालकीचा केला. पण त्या लोकांनी तुझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी तुझ्या शिकवणुकीचा स्वीकार केला नाही. तुझ्या आज्ञेप्रमाणे ते वागले नाहीत. म्हणून तू इस्राएलच्या लोकांच्याबाबत भयंकर गोष्टी घडवून आणल्यास.
24 “आणि आता, शत्रूने नगरीला वेढा घातला आहे. यरुशलेमची तटबंदी ओलांडून जाण्यासाठी व नगरी हस्तगत करण्यासाठी ते उतरंडी रचीत आहेत. युद्ध उपासमार व भयंकर रोगराई यांच्या जोरावर बाबेलचे सैन्य यरुशलेम नगरीचा पराभव करील. आता बाबेलचे सैन्य यरुशलेमवर हल्ला करीत आहे. परमेश्वरा, असे होईल असे तू म्हणाला होतास आणि पाहा आता तसेच घडत आहे.
25 “परमेश्वरा, माझ्या स्वामी, त्या सर्व वाईट गोष्टी घडत आहेत. पण तू मला सांगत आहेस, ‘यिर्मया, चांदी देऊन शेत विकत घे आणि खरेदीचे साक्षीदार म्हणून काही लोकांना निवड’ बाबेलचे सैन्य नगरी जिंकण्याच्या बेतात असताना, तू मला हे सांगत आहेस. मी माझा पैसा अशा रीतीने वाया का घालवावा?”
26 मग यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. 27 “यिर्मया, मी परमेश्वर आहे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाचा मी देव आहे. यिर्मया, मला काहीच अशक्य नाही, हे तुला माहीत आहेच.” 28 परमेश्वर असेही म्हणाला, “मी लवकरच यरुशलेम नगरी बाबेलचे सैन्य आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्यांच्या ताब्यात देईन. ते सैन्य नगरी जिंकेल. 29 बाबेलच्या सैन्याने नगरीवर हल्ला करण्यास अगोदरच सुरवात केली आहे. ते लवकरच नगरीत प्रवेश करतील व आग लावतील. ते नगरी बेचिराख करतील. यरुशलेममधील लोकांनी घरांच्या धाब्यावर दैवत बआल याला नैवेद्य दाखवून मला संतापवले. लोकांनी इतर मूर्तीना पेये अर्पण केली. बाबेलचे सैन्य ती सर्व घरे जाळून टाकेल. 30 मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांवर नजर ठेवली. ते करीत असलेली प्रत्येक गोष्ट वाईट आहे. ते लहान असल्यापासून दुष्कृत्ये करीत आहेत. इस्राएलच्या लोकांनी मला फार संतापविले. त्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या मूर्तींची पूजा केल्याने मला अतिशय राग आला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. 31 “यरुशलेमच्या उभारणीपासून आतापर्यंत ह्या नगरीतल्या लोकांनी मला संतापविले आहे. त्यांनी मला इतके संतापविले की मला ती नगरी नजरे पुढून नाहीशी केलीच पाहिजेत. 32 इस्राएल व यहूदा येथील लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी यरुशलेमचा नाश करीन. लोक, त्यांचे राजे, नेते, त्यांचे याजक आणि संदेष्टे, यहूदातील व यरुशलेममधील लोक यांनी मला फार संतापविले आहे.
33 “त्या लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे यावे पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली. मी त्यांना शिकविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकले नाही. मी त्यांना नीती शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी लक्ष दिले नाही. 34 त्या लोकांनी त्यांच्या मूर्ती तयार केल्या, मला त्या मूर्तीची चीड येते. त्यांनी त्या मूर्ती माझ्या नावावर असलेल्या मंदिरात ठेवल्या. त्यामुळे माझे मंदिर ‘अपवित्र’ झाले.
35 “बेन-हिन्नोमच्या दरीत त्यांनी बआल या दैवतासाठी उच्चस्थाने बांधली. ही पूजास्थाने त्यांनी आपल्या मुलामुलींना जाळून मोलेखला बआलबळी देण्यासाठी बांधली. अशा भयंकर गोष्टी करण्याची आज्ञा मी त्यांना कधीच दिली नव्हती. यहूदातील लोक अशा भयंकर गोष्टी करतील, असे माझ्या कधीही मनातसुद्धा आले नव्हते.
लावदिकीया येथील मंडळीला
14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही:
“जो आमेन [a] आहे, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
15 “मला तुमची कामे माहीत आहेत तुम्ही थंडही नाही व गरमही नाही. माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही दोन्हीपैकी एक काहीतरी असावे! 16 पण, तुम्ही कोमट असल्याने मी तुम्हांला तोंडातून (थुंकून) टाकणार आहे. 17 तुम्ही म्हणता, मी श्रीमंत आहे, मी संपत्ति मिळविली आहे. आणि मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. पण तुम्हाला याची जाणीव होत नाही की, तुम्ही नीच, नराधम, दयनीय, गरीब, आंधळे व ओंगळ आहात. 18 मी तुम्हाला सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घ्या. म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल. आणि शुभ्र वस्त्रे विकत घ्या व तुमची लज्जास्पद नग्नता तुम्ही झाका. आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घ्या.
19 “ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना दटावतो व शिस्त लावतो म्हणून कसोशीचे प्रयत्न करावयास लागा आणि पश्चात्ताप करा. 20 मी येथे आहे! मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबरोबर जेवेल.
21 “जो विजय मिळवील त्याला मी माझ्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन ज्याप्रमाणे मी विजय मिळविला आणि माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो. 22 आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”
2006 by World Bible Translation Center