Revised Common Lectionary (Semicontinuous)
11 त्या वेळेला यहुदा व यरुशलेम येथील
लोकांना एक संदेश दिला जाईल.
“उजाड टेकड्यावरुन गरम वारा वाहतो.
तो वाळवंटातून माझ्या लोकांकडे वाहत येतो.
फोलकटापासून धान्य वेगळे करण्याकरिता शेतकरी ज्या वाऱ्याचा उपयोग करतात,
तसा हा सौम्य वारा नाही.”
12 हा वारा त्यापेक्षा जोराचा आहे
आणि तो माझ्याकडून येतो आता,
“मी यहुदाच्या लोकांविरुद्ध् माझा निकाल जाहीर करीन.”
22 देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत.
ते मला ओळखत नाहीत.
ती मूर्ख मुले आहेत
त्यांना समजत नाही.
दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत
पण सत्कृत्ये कशी करावी त्यांना माहीत नाही.”
अरिष्ट येत आहे
23 मी पृथ्वीकडे पाहिले.
पृथ्वी उजाड आणि
अस्ताव्यस्त होती.
पृथ्वीवर काहीही नव्हते.
मी आकाशाकडे पाहिले त्याचा प्रकाश गेला होता. [a]
24 मी डोंगराकडे पाहिले ते कापत होते.
सर्व टेकड्या थरथरत होत्या.
25 मी पाहिले पण कोठेही माणसे नव्हती.
आकाशातील सर्व पक्षी दूर उडून गेले होते.
26 मी पाहिले आणि सुपीक जमिनीचे वाळवंट झाले.
त्या भूमीवरील सर्व शहरांचा नाश झाला.
परमेश्वराने हे घडविले.
परमेश्वराने आणि त्याच्या क्रोधाने हे घडवून आणले.
27 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो:
“संपूर्ण देशाचा नाश होईल.
(पण मी देशाचा संपूर्ण नाश करणार नाही.)
28 म्हणून देशातील लोक मृतांसाठी शोक करतील.
आकाश काळे होईल.
मी बोललो आहे ते बदलणार नाही.
मी निर्णय घेतला आहे आणि मी बदलणार नाही.”
14 दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही”
पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात
त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.
2 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता.
त्याला शहाणे लोक शोधायचे होते
शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
3 परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे.
सर्वलोक वाईट झाले आहेत.
एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.
4 दुष्टांनी माझ्या माणसांचा नाश केला.
दुष्टांना देव माहीत नाही.
त्यांच्याकडे खायला [a] खूप अन्न असते आणि ते परमेश्वराची उपासना करीत नाहीत.
5 त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते.
का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता.
6 परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो.
म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.
7 सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले?
परमेश्वरच इस्राएलला वाचवतो.
परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले.
परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील
नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
देवाच्या दयेबद्दल उपकार
12 जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभुचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू समजले आणि त्याने मला त्याची सेवा करण्यासाठी नियुक्त केले. 13 जरी मी पूर्वी निंदा करणारा, मनस्ताप देणारा आणि हिंसक होतो, तरी माझ्यावर दया दाखविण्यात आली. तोर्पांत मी विश्वासणारा नव्हतो म्हणून अज्ञानामुळे मी तसा वागलो. 14 परंतु विश्वास आणि दया जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभुच्या कृपेने ओसंडून वाहिली.
15 एक विश्वसनीय वचन आहे जे स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला. मी त्या पाप्यातील पहिला आहे. 16 परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली, यासाठी की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्याच्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळावे. 17 आता अनंतकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला माहिमा आणि गौरव अनंतकाळासाठी असो. आमेन.
स्वर्गातील आनंद(A)
15 सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते. 2 तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”
3 मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली. 4 “जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? 5 आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. 6 आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करुन म्हणतो, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे.’ 7 मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.
8 “समजा एका बाईजवळ चांदीची दहा नाणी आहेत. जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय? 9 आणि जेव्हा तिला ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ 10 त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हांस सांगतो.”
2006 by World Bible Translation Center