Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे स्तोत्र
79 देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले.
त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला.
त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
2 शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली
त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली.
3 देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले.
प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.
4 आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला
आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
5 देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का?
देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?
6 देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव.
जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
7 त्या देशांनी याकोबाचा नाश केला
त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.
8 देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस.
आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव.
आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
9 देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर.
आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल.
आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.
इस्राएलच्या शेजाऱ्यांना देवाचे वचन
14 देव काय म्हणतो ते पाहा: “इस्राएलच्या भोवती राहणाऱ्या लोकांसाठी मी काय करणार आहे, ते ती तुम्हाला सांगतो. ते लोक फार दुष्ट आहेत. मी इस्राएलच्या लोकांना दिलेल्या जमिनीचा त्या लोकांनी नाश केला. त्या पापी लोकांना, मी, खेचून काढीन व त्यांच्या देशाबाहेर त्यांना हाकलून देईन. त्यांच्याबरोबर यहूदाच्या लोकांनाही मी बाहेर खेचीन. 15 पण अशा रीतीने त्या लोकांना देशाबाहेर हाकलल्यावर मला त्यांची कणव येईल. मी प्रत्येक कुटुंब परत त्यांच्या देशात आणीन आणि त्यांची जमीन परत देईन. 16 ह्यातून त्या लोकांनी योग्य तो बोध घ्यावा असे मला वाटते. पूर्वी त्या लोकांनी, माझ्या माणसांना, बआलच्या नावाने वचन घ्यायला शिकविले होते. आता मी त्याच रीतीने त्यांना धडा शिकविणार. वचन घेताना माझे नाव घेण्यास त्यांनी शिकावे असे मला वाटते. ‘देव नक्कीच असेपर्यंत’ अशी सुरवात त्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी असे केले तर मी त्यांना यशस्वी करीन आणि माझ्या लोकांत राहू देईन. 17 पण जर एखाद्या राष्ट्राने माझा आदेश मानला नाही, तर त्या राष्ट्राचा मी समूळ नाश करीन. त्या राष्ट्राला मेलेल्या झाडाप्रमाणे उपटीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
घागऱ्याचा संकेत
13 परमेश्वर मला असे म्हणाला: “यिर्मया, जा आणि तागाचा घागरा विकत घे. नंतर तो नेस. तो ओला होऊ देऊ नकोस.”
2 परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मी एक तागाचा घागरा विकत आणला व नेसला. 3 नंतर मला परमेश्वराकडून दुसऱ्यांदा संदेश आला. 4 तो असा होता: “यिर्मया, तू विकत आणून नेसलेला घागरा घेऊन फरातला [a] जा. तिथे तो खडकाला पडलेल्या चिरेत लपवून ठेव.”
5 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे घागरा लपवून ठेवला. 6 पुष्कळ दिवसांनी देव मला म्हणाला, “यिर्मया, फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला घागरा परत घे.”
7 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि घागरा उकरुन काढला. मी दगडाच्या चिरेत लपविलेला घागरा बाहेर काढला. पण आता तो इतका खराब झाला होता की मी तो नेसू शकत नव्हतो. तो अगदी निरुपयोगी झाला होता.
8 मग मला परमेश्वराचा संदेश आला. 9 परमेश्वर मला म्हणाला, “ज्याप्रमाणे घागरा अगदी खराब आणि निरुपयोगी झाला, त्याचप्रमाणे यहूदातील आणि यरुशलेमधील अहंकारी लोकांचा नाश होईल. 10 मी यहुदाच्या उद्दाम आणि पापी लोकांचा नाश करीन. ते लोक माझा संदेश ऐकण्याचे नाकारतात. ते दुराग्रही असून आपल्याला पाहिजे त्याच गोष्टी करतात. ते दुसऱ्या देवांना अनुसरतात व त्यांची पूजा करतात. यहूदाच्या अशा लोकांची गत ह्या तागाच्या घागऱ्याप्रमाणे होईल. त्यांचा नाश होऊन ते निरुपयोगी ठरतील. 11 घागरा जसा माणसाच्या कमरेभोवती घट्ट लपेटला जातो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे माझ्या कमरेला लपेटली.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “त्या लोकांनी माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी असे केले. पण माझ्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही.”
3 तर मग यहूदी असण्यात फायदा काय? किंवा सुंतेपासून फायदा काय? 2 सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती. 3 हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते; देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय? 4 खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
“तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत
असता तू विजय मिळविशील.” (A)
5 जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो). 6 खात्रीने नाही! कारण मग देव जगाचा न्याय कसा करील?
7 परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?” 8 आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यांना मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.
2006 by World Bible Translation Center