Revised Common Lectionary (Semicontinuous)
94 परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस.
असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो.
2 तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस.
गर्विष्ठ दुष्ट माणसांना योग्य अशी शिक्षा दे.
3 परमेश्वरा, दुष्ट लोक किती काळ मजा करीत राहाणार आहेत?
परमेश्वरा किती काळ?
4 आणखी किती काळ हे गुन्हेगार त्यांनी केलेल्या
गुन्ह्यांबद्दल गौरवोद्गार काढणार आहेत?
5 परमेश्वरा, ते तुझ्या माणसांना त्रास देतात.
त्यांनी तुझ्या माणसांना यातना भोगायला लावल्या.
6 ते दुष्ट लोक विधवांना आणि आपल्या देशात आलेल्या परकीयांना ठार मारतात.
ते अनाथ मुलांचा खून करतात.
7 आणि ते म्हणतात की या वाईट गोष्टी करताना परमेश्वर त्यांना बघत नाही.
ते म्हणतात की जे काही घडते आहे ते इस्राएलाच्या देवाला माहीत नाही.
8 तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात.
तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार?
तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात!
तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
9 देवानेच आपले कान केलेत
तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत
आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो.
देवानेच आपले डोळे केलेत.
तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत
आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.
10 देव त्या लोकांना शिस्त लावेल.
देव लोकांना काय करायचे ते शिकवेल.
11 लोक काय विचार करतात ते देवाला माहीत असते.
लोक म्हणजे वाऱ्याचा झोत आहे हे देवाला माहीत आहे.
12 परमेश्वर ज्या माणसाला शिस्त लावेल तो सुखी होईल.
देव त्या माणसाला जगण्याचा योग्यमार्ग शिकवेल.
13 देवा, तू त्या माणसाला संकटात शांत राहाण्यास शिकवशील.
तू त्या माणसाला वाईट लोक थडग्यात जाईपर्यंत शांत राहाण्यास मदत करशील.
14 परमेश्वर त्याच्या माणसांना सोडून जाणार नाही.
तो त्याच्या माणसांना मदत केल्याशिवाय सोडून जाणार नाही.
15 न्याय प्रस्थापित होईल आणि तो न्यायीपणा आणेल आणि
नंतर प्रामाणिक आणि चांगले लोक तेथे येतील.
16 वाईट लोकांशी लढायला मला कोणीही मदत केली नाही.
वाईट कृत्य करणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी माझ्या बरोबरीने कोणीही उभे राहिले नाही.
17 आणि जर परमेश्वराने मला मदत केली
नसतीतर मी मेलो असतो.
18 मी पडायला आलेलो आहे हे मला माहीत आहे,
पण परमेश्वराने त्याच्या भक्तांना आधार दिला.
19 मी खूप चिंताग्रस्त आणि उदास होतो.
परंतु परमेश्वरा, तू माझे सांत्वन केलेस.
20 देवा, तू दुष्ट न्यायाधीशांना मदत करीत नाहीस.
ते वाईट न्यायाधीश कायद्याचा दुरुपयोग करुन लोकांचे आयुष्य कठीण करतात.
21 ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात.
ते निरपराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात आणि त्यांना ठार मारतात.
22 परंतु परमेश्वर माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहे.
देव माझा खडक माझी सुरक्षित जागा आहे.
23 देव त्या दुष्ट न्यायाधीशांना त्यांनी केलेल्या वाईटकृत्याबद्दल शिक्षा करेल.
त्यांनी पाप केले म्हणून देव त्यांचा नाश करेल.
परमेश्वर आपला देव त्या दुष्ट न्यायाधीशांचा सर्वनाश करेल.
18 “पण जेव्हा ते भयानक दिवस येतील.
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे,
तेव्हा, यहूदा, मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही.
19 यहूदाचे लोक तुला विचारतील,
‘यिर्मया, आमच्या परमेश्वर देवाने आमचे असे वाईट का केले?’
त्यांना पुढील उत्तर दे,
‘यहूदाच्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराला सोडले
आणि तुमच्या देशात तुम्ही परक्या मूर्तींची सेवा केली.
तुम्ही असे वागलात म्हणून आता
तुम्ही परक्या देशात परक्यांचीच सेवा कराल.’”
20 परमेश्वर म्हणाला, “याकोबाच्या वंशजांना
आणि यहूदातील राष्ट्रांना हा संदेश द्या.
21 ऐका! तुम्हा मूर्खांना अक्कल नाही.
तुम्हाला डोळे असून दिसत नाही
कान असून ऐकू येत नाही.
22 खरोखर तुम्हाला माझी भिती वाटते.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
“माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापावे.
समुद्राला सीमा असावी म्हणून समुद्रकिनारे निर्माण करणारा मी एकमेव आहे.
पाणी अखंड जागच्या जागी राहावे म्हणून मी असे केले.
लाटा कधी किनाऱ्यावर आक्रमण करतात.
पण त्या किनाऱ्याचा नाश करीत नाहीत.
लाटा गर्जना करीत कधी कधी आत येतात, पण त्या किनाऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.
23 पण यहूदाचे लोक दुराग्रही आहेत.
ते नेहमीच माझ्याविरुद्ध् जाण्यासाठी मार्ग आखत असतात.
ते माझ्यापासून दूर गेले आणि त्यांनी माझा त्याग केला.
24 यहूदातील लोक आपल्या मनाशी असे कधीही म्हणत नाहीत
‘आपण आपल्या परमेश्वर देवाला घाबरु या आणि त्याचा मान राखू या.
योग्य वेळेला तो आपल्याला आगोटीचा व वळवाचा पाऊस देतो.
योग्य वेळी आपल्याला कापणी करता येईल, ह्याची तो खात्री करुन घेतो.’
25 यहूदातील लोकांनो, तुम्ही पाप केलेत म्हणूनच पावसाळा व सुगीचा हंगाम आला नाही.
तुमच्या पापांनी परमेश्वराकडून मिळणाऱ्या ह्या चांगल्या गोष्टींचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेतला आहे.
26 माझ्या माणसांत काही दुष्ट आहेत.
ते फासेपारध्यांप्रमाणे आहेत.
हे लोक जाळे पसरवितात,
पण पक्ष्यांना पकडण्या ऐवजी ते माणसांना पकडतात.
27 पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्या
दुष्टांची घरे कपटांनी भरलेली असतात.
त्यांच्या कपटांनी त्यांना श्रीमंत व शक्तिशाली बनविले.
28 त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते पुष्ट व लठ्ठ झाले आहेत.
त्यांच्या दुष्कृत्यांना अंत नाही.
ते अनाथांच्या वतीने बोलणार नाहीत.
ते त्यांना मदत करणार नाहीत.
ते गरीब लोकांना योग्य न्याय मिळवून देणार नाहीत.
29 त्यांनी केलेल्या ह्या कर्मांबद्दल मी त्यांना शिक्षा करावी का?”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“अशा राष्ट्राला मी शिक्षा करणार हे तुम्हाला माहीत आहे.
त्यांना योग्य ती शिक्षा मी करीन.”
30 परमेश्वर म्हणतो, “यहूदात भयानक
व धक्कादायक गोष्ट घडली आहे.
31 संदेष्टे खोटे सांगतात,
जे काम करण्यासाठी याजकांची निवड केली आहे, ते काम ते करणार नाहीत.
आणि माझ्या लोकांना हे आवडते!
पण तुमची शिक्षा जवळ
आल्यावर तुम्ही काय कराल?”
8 परंतु, प्रिय मित्रांनो, ही एक गोष्ट विसरु नका की, प्रभूला एक दिवस एक हजार वर्षांसारखा आणि एक हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. [a] 9 देव त्याच्या अभिवचनाची परिपूर्ती करण्यासाठी उशीर लावणार नाही. जसे काही लोकांना वाटते, परंतु तो आमच्याशी धीराने वागतो. कारण आपल्यापैकी कोणाचा नाश व्हावा असे त्याला वाटत नाही. वास्तविक सर्व लोकांनी पश्चात्ताप करावा असे त्याला वाटते.
10 परंतु प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल, त्यादिवशी आकाश मोठ्या गर्जनेने नाहीसे होईल व आकाशातील सर्व गोष्टी जळून नाहीशा होतील आणि पृथ्वीवरील लोक व त्यांची कामे उघडकीस येतील. [b] 11 जर अशा प्रकारे सर्व गोष्टींचा नाश होणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असायला पाहिजे याचा विचार करा. तुम्ही आपले जीवन पवित्रतेने जगावे व देवाच्या सेवेत मग्न असावे.
12 तुम्ही प्रभुच्या येण्याच्या दिवसाची वाट पाहावी यासाठी की देवाच्या येण्याचा दिवस अधिक लवकर यावा. त्या गर्जनेने (आवाजाने) आकाश पेटून नष्ट होईल व आकाशातील सर्व गोष्टी आगीत वितळतील. 13 पण देवाच्या वचनाप्रमाणे, जथे चांगुलपणा वास करतो असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची आपण वाट पाहू.
2006 by World Bible Translation Center