Revised Common Lectionary (Semicontinuous)
18 देवा मी फार दु:खी आहे.
मी फार घाबरलो आहे.
19 माझ्या लोकांचे रडणे ऐक.
ह्या देशात सगळीकडे लोक मदतीसाठी आक्रोश करीत आहेत.
ते म्हणतात, “परमेश्वर अजून सियोनला आहे का?
सियोनचा राजा अजून तेथेच आहे का?”
पण देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांनी परक्या कवडीमोलाच्या मूर्तीची पूजा केली.
त्याने मला खूप राग आला.
त्यांनी असे का केले?”
20 लोक म्हणतात,
“सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा गेला,
आणि तरीही आम्हाला वाचवण्यात आले नाही.”
21 माझे लोक दुखावले म्हणजे मी दुखावलो.
मी दु:खातिरेकाने बोलू शकत नाही.
22 गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे.
तेथे नक्कीच वैद्य आहे.
मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?
9 जर माझे मस्तक पाण्याने भरलेले असते
आणि माझे डोळे अश्रूंचे झरे असते
तर मी माझ्या नाश पावलेल्या लोकांसाठी अहोरात्र रडलो असतो.
आसाफाचे स्तोत्र
79 देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले.
त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला.
त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
2 शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली
त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली.
3 देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले.
प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.
4 आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला
आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
5 देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का?
देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?
6 देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव.
जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
7 त्या देशांनी याकोबाचा नाश केला
त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.
8 देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस.
आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव.
आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
9 देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर.
आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल.
आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.
पुरुष आणि स्त्रियांसाठी काही नियम
2 सर्वांत प्रथम मी कळकळीने विनंति करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व माणसांच्या वतीने करावे. 2 आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे. प्रार्थना करा की, आम्हांला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. 3 हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
4 ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. 5 कारण फक्त एकच देव आहे. आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे: तो म्हणजे ख्रिस्त येशू जो स्वतःमनुष्य होता. 6 सर्व लोकांच्या पापांची खंडणी म्हणून त्याने स्वतःला दिले. अशा प्रकारे देवाच्या योजनेविषयी त्याने योग्य वेळी साक्ष दिली. 7 आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित (मी खरे सांगतो, खोटे सांगत नाही!) असा विदेशी लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.
खरी संपत्ती
16 येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो. असे त्या श्रीमंत माणसाला सांगण्यात आले. 2 म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावले आणि म्हणाला, ‘हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे तुझ्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे कारभारी म्हणून तुला राहता येणार नाही.’
3 “तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, ‘मी काय करु? माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत. शेतात कष्ट करण्याइतका मी बळकट नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते. 4 मी काय करावे हे मला माहीत आहे. यासाठी की जेव्हा मला कारभाऱ्याच्या कामावरुन काढून टाकतील, लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील.’
5 “मग त्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, ‘तू माइया मालकाचे किती देणे लागतोस?’ 6 तो म्हणाला, ‘चार हजार लीटर जैतून तेल.’ मग तो त्याला म्हणाला, ‘तुझी पावती घे बघू, खाली बस आणि लवकर त्यावर दोन हजार लीटर लिही.’
7 “मग दुसऱ्याला तो म्हणाला, ‘आणि तुझे किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘तीस हजार किलो गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘तुझी हिशेबाची पावती घे व त्यावर पंचवीस हजार किलो लिही.’
8 “आणि मालकाने त्या अप्रामाणिक कारभाऱ्याची प्रशंसा केली. कारण तो धूर्तपणे वागला होता. या जगाचे पुत्र त्यांच्यासारख्यांशी वागताना प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा अधिक धूर्ततेने वागतात.
9 “मी तुम्हांस सांगतो, तुमच्यासाठी तुमच्या ऐहिक संपत्तीने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा ते संपेल तेव्हा ते तुमचे अनंतकाळच्या घरात स्वागत करतील. 10 ज्या कोणावर थोडा विश्वास ठेवणे शक्य आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे. व जो कोणी थोडक्याविषयी अविश्वासू आहे तो अधिकाविषयीसुद्धा अविश्वासू आहे. 11 “म्हणून जर तुम्ही ऐहिक संपत्तीविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या संपत्तीविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील? 12 जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हांस कोण देईल?
13 “कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो द्वेष करील व दुसऱ्यावर तो प्रेम करील किंवा एकाशी तो प्रामाणिक राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करु शकणार नाही.”
2006 by World Bible Translation Center