Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नको” या चालीवर आधारित दावीताचे मिक्ताम
58 न्यायाधीशांनो, तुम्ही तुमच्या निर्णयात न्यायी आहात काय?
तुम्ही लोकांचा न्यायाने निवाडा करीत आहात काय?
2 नाही, तुम्ही फक्त वाईट गोष्टी करण्याचाच विचार करता.
तुम्ही या देशात हिंसक कृत्ये करीत आहात.
3 त्या वाईट लोकांनी जन्मल्याबरोबर दुष्कर्म करायला सुरुवात केली.
ते जन्मापासूनच खोटारडे होते.
4 ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही.
ते सत्य ऐकायला नकार देतात.
5 नागाला गारुड्याचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही
आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत.
6 परमेश्वरा, ती दुष्ट माणसे सिंहासारखी आहेत.
म्हणून परमेश्वरा तू त्यांचे दात पाड.
7 ते लोक वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे नाहीसे होवोत.
ते रस्त्यातल्या गवताप्रमाणे तुडवले जावोत.
8 चालताना विरघळून जाणाऱ्या गोगलगायी प्रमाणे ते विरघळून जावोत.
जन्मत: मेलेल्या व दिवसाचा प्रकाश न पाहिलेल्या बाळा प्रमाणे त्यांचे होवो.
9 भांडे तापविण्यासाठी काट्या पेटवितात.
तेव्हा त्यात चटकन् जळणाऱ्या काट्यांप्रमाणे त्यांचे होवो.
10 वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली
तर चांगल्या माणसाला आनंद होईल,
तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल.
11 असे जेव्हा घडेल तेव्हा लोक म्हणतील “चांगल्या माणसांना त्यांचे फळ मिळाले,
जगाला न्याय देण्यासाठी देव खरोखर आहे.”
15 मग मी तुम्हाला नवे मेंढपाळ (शासनकर्ते) देईन. ते माझ्याशी निष्ठावान असतील. ते ज्ञान आणि समज ह्यांच्या सहाय्याने तुम्हाला मार्गदर्शन करतील. 16 त्या काळात, देशात तुमच्यापैकी बरेचजण असतील.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे .
“त्या वेळेला, लोक पुन्हा कधीही असे म्हणणार नाहीत, ‘परमेश्वराच्या कराराचा कोश आमच्याजवळ असण्याचे दिवस आम्हाला आठवतात.’ येथून पुढे ते त्या पवित्र कोशाचा विचारसुद्धा् करणार नाहीत. 17 त्या वेळेला यरुशलेम नगरीला ‘परमेश्वराचे सिंहासन’ म्हटले जाईल. परमेश्वराच्या नावाचा मान राखण्यासाठी सर्व राष्ट्रे यरुशलेममध्ये एकत्र येतील. ह्या पुढे ते त्यांच्या दुराग्रही आणि दुष्ट मनांचे अनुसरण करणार नाहीत. 18 त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.”
19 मी, परमेश्वर, स्वतःशी म्हणालो,
“माझ्या स्वतःच्या मुलांप्रमाणे तुम्हाला वागवावे असे मला वाटते.
इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा, तुम्हाला, सुंदर व
आल्हाददायक भूमी द्यावी अशी माझी इच्छा आहे.
मला वाटले की तुम्ही मला ‘पिता.’
म्हणाल व नेहमीच मला अनुसराल.
20 पण तुम्ही पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे आहात.
इस्राएलच्या घराण्यातील लोकांनो, तुम्ही माझा विश्वासघात करीत आहात.
हा देवाचा संदेश आहे .
21 उजाड टेकड्यांवरुन येणारा रडण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता.
इस्राएले लोक रडत आहेत.
ते दयेसाठी याचना करीत आहेत.
ते फार पापी झाले.
ते त्यांच्या परमेश्वर देवाला विसरले.”
22 परमेश्वर पुढे म्हणाला, “इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही माझ्याशी विश्वसघात करता.
पण माझ्याकडे परत या.
माझ्याकडे परत या.
जरी तुम्ही विश्वासघातकी असलात तरी मी तुम्हाला क्षमा करीन.”
पण लोकांनी म्हणावे, “हो! आम्ही तुझ्याकडे येऊ
तूच परमेश्वर आमचा देव आहेस!”
23 टेकड्यांवर मूर्तींची पूजा करणे मूर्खपणाचे आहे.
डोंगरावर मोठ्या, दिखाऊ मेजवान्या करणे चूक आहे.
इस्राएलचे पापविमोचन नक्कीच
आपल्या परमेश्वर देवाकडून येईल.
24 त्या भयानक खोट्या देवाने बआल देवताने आमच्या वडिलांच्या
मालकीचे सर्व काही खाल्ले आहे.
त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली गिळली.
आमच्या तारुण्यापासून हे घडले.
त्या भयानक खोट्या देवाने आमच्या वडिलांच्या मेंढ्या आणि गुरे
आणि त्यांची कोकरे व वासरे घेतली.
25 लज्जेचे आपण अंथरुण करु या आणि
पांघरुणाने आपण शरीर झाकतो तशी लाज आपण पांघरु या.
आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरुद्ध् जाऊन पाप केले.
आम्ही आणि आमच्या वडिलांनी पाप केले.
आम्ही लहान असल्यापासून परमेश्वर देवाच्या
आज्ञा पाळल्या नाहीत.
मोठ्या मेजवानीविषयीची गोष्ट(A)
15 आता जेव्हा मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्यात जेवतो, तो प्रत्येक जण धन्य!”
16 मग येशू त्याला म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले. 17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या, कारण सर्व तयार आहे’ हे सांगण्यासाठी नोकराला पाठविले. 18 ते सर्वजण सबब सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करुन मला क्षमा कर.’ 19 दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत व त्या कशा आहेत हे बघण्यासाठी मी चाललो आहे, कृपा करुन मला क्षमा कर.’ 20 आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
21 “म्हणून जेव्हा तो नोकर परत आला, तेव्हा त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘लवकर बाहेर रस्त्यावर आणि नगारातल्या गल्ल्यांमध्ये जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’
22 “नोकर म्हणाला, ‘आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे. आणि तरीही जागा आहे.’ 23 मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरुन जाईल. 24 कारण मी तुम्हांस सांगतो की, त्या आमंत्रित केलेल्या कोणालाही माझ्या मेजवानीतली चव पाहायला मिळणार नाही.’”
2006 by World Bible Translation Center