Revised Common Lectionary (Semicontinuous)
91 तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता.
तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
2 मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला,
माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
3 देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून
आणि भयानक रोगांपासून वाचवेल.
4 तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता.
पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा
तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
5 रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल
आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
6 अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक
आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही.
14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन.
जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो.
ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन.
मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
16 मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.
आणि त्यांना वाचवीन.”
खोट्या संदेष्ट्यांविरुद्ध निवाडा
9 संदेष्ट्यांना संदेश:
मी फार दु:खी आहे. माझे हृदय विदीर्ण झाले आहे.
माझी सर्व हाडे थरथरत आहेत.
माझी (यिर्मयाची) स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे.
का? परमेश्वरामुळे व त्याच्या पवित्र शब्दांमुळे.
10 व्यभिचाराचे पाप केलेल्या लोकांनी यहूदा भरुन गेला आहे.
लोकांनी अनेक मार्गांनी निष्ठेचा त्याग केला आहे.
परमेश्वराने शाप दिला आणि ही भूमी ओसाड झाली.
कुरणातील हिरवळ वाळून मरत आहे.
शेते वाळवंटाप्रमाणे झाली आहेत.
संदेष्टे दुष्ट आहेत ते त्यांचे बळ (वजन) व शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात.
11 “संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा पापी आहेत.
माझ्या मंदिरात दुष्कृत्ये करताना मी त्यांना पाहिले आहे.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
12 “मी माझा संदेश त्यांच्याकडे पाठविण्याचे बंद करीन.
मग त्यांची स्थिती अंधारात चालणाऱ्यांसारखी होईल.
मी असे केल्यास संदेष्टे व याजक ह्यांच्यासाठी वाट जणू निसरडी होईल.
ते त्या अंधारात पडतील
मी त्यांच्यावर अरीष्ट आणीन.
मी त्यांना शिक्षा करीन.”
हा देवाकडून आलेला संदेश आहे.
13 “शोमरोनच्या संदेष्ट्यांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे मी पाहिले.
मी त्यांना बआल या खोट्या दैवताच्या नावाने भविष्य वर्तविताना पाहिले.
त्यांनी इस्राएलच्या लोकांना परमेश्वरापासून दूर नेले.
14 आता मी यहूदाच्या संदेष्ट्यांना यरुशलेममध्ये
भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे.
ते व्यभिचाराचे पाप करतात.
ते खोट्या गोष्टी एकतात आणि खोट्या शिकवणुकीचे पालन करतात.
ते दुष्टांना दुष्कृत्ये करायला प्रोत्साहन देतात.
म्हणून लोक पाप करीतच राहतात.
ते सदोममधील माणसाप्रमाणे आहेत.
यरुशलेम आता मला गमोऱ्यासारखे वाटते.”
15 सर्वशक्तिमान परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल म्हणतो,
“मी त्या संदेष्ट्यांना शिक्षा करीन.
विषमिश्रित अन्न खाण्यासारखी वा जहरमिश्रित पाणी पिण्यासारखी ती शिक्षा असेल.
संदेष्ट्यांनी हा आध्यात्मिक आजार आणला व तो सर्व देशात पसरला म्हणून मी त्यांना शिक्षा करीन.
हा आजार यरुशलेममधील संदेष्ट्यांकडून आला.”
16 सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो:
“हे संदेष्टे तुम्हाला जे काय सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका.
ते तुम्हाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात.
ते दृष्टांन्ताबद्दल बोलतात.
पण हे दृष्टांन्त त्यांना माझ्याकडून घडत नाहीत,
तर ते त्यांच्या मनाचेच असतात.
17 काही लोक परमेश्वराकडून आलेल्या खऱ्या संदेशाला नाके मुरडतात
म्हणून हे संदेष्टे त्या लोकांना निराळ्याच गोष्टी सांगतात.
ते म्हणतात, ‘तुम्हाला शांती लाभेल’
काही लोक फार हट्टी आहेत.
ते त्यांना पाहिजे त्याच गोष्टी करतात.
मग ते संदेष्टे त्याना म्हणतात,
‘तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही.’
18 पण ह्या संदेष्ट्यांमधील कोणीही स्वर्गातील देवांच्या सभेत [a] उभा राहिलेला नाही.
त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराचा संदेश पाहिला वा ऐकला नाही.
कोणीही परमेश्वराच्या संदेशाकडे बारकाईने लक्ष दिलेले नाही.
19 आता परमेश्वराकडून वादळाप्रमाणे शिक्षा येईल. परमेश्वराचा राग तुफानाप्रमाणे असेल.
तो त्या दुष्ट लोकांच्या डोक्यावर आदळून त्यांच्या डोक्यांचा चेंदामेंदा करील.
20 परमेश्वराने जे करण्याचे ठरविले आहे,
ते पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचा राग शांत होणार नाही.
पुढील दिवसांत
तुम्हाला हे स्पष्टपणे समजेल.
21 मी त्या संदेष्ट्यांना पाठविले नाही,
पण तेच संदेश द्यायला धावले.
मी त्यांच्याशी बोललो नाही,
पण तेच माझ्यावतीने उपदेश करतात.
22 जर ते माझ्या स्वर्गीय सभेत उभे राहिले असते,
तर त्यांनी माझा संदेश यहूदाच्या लोकापर्यंत पोहोचविला असता.
त्यांनी लोकांना दुष्कृत्ये करण्यापासून परावृत्त केले असते.
त्यांनी लोकांना पाप करु दिले नसते.”
8 मी तुम्हांला आज्ञा करीत नाही, पण मला तुमच्या प्रेमच्या प्रामाणिकतेची तुलना इतरांच्या आस्थेशी करायची आहे. 9 कारण तुम्हांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा माहीत आहे की, जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरिता तो गरीब झाला, यासाठी की, त्याच्या गरीबीने तुम्ही श्रीमंत व्हावे.
10 आणि तुमच्या फायद्यासाठी माझा सल्ला असा आहे की, गेल्या वर्षी तुम्ही केवळ देण्यातच नव्हे तर तशी इच्छा करण्यात पहिले होता. 11 आता ते काम पूर्ण करा, यासाठी की कार्य करण्याची तुमची उत्सुकता ही ती तुमच्याकडे ज्या प्रमाणात आहे त्यानुसार पूर्ण करण्यात यावी. 12 कारण जर इच्छा असेल, तर एखाद्याकडे जे असेल तसे मान्य होईल. जर नसेल तर मान्य होणार नाही. 13 दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणून. 14 सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी. यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात. मग समानता येईल. 15 पवित्र शास्त्र म्हणते,
“ज्याने पुष्कळ गोळा केले होते, त्याला जास्त झाले नाही.
ज्याने थोडे गोळा केले होते, त्याला कमी पडले नाही.” (A)
2006 by World Bible Translation Center