Revised Common Lectionary (Semicontinuous)
यिर्मया शेत विकत घेतो
32 सिद्कीया यहूदाचा राजा होता त्याच्या कारकिर्दीचा दहाव्या वर्षी [a] यिर्मयाला परमेश्वराकडून एक संदेश आला. सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे दहावे वर्ष म्हणजेच नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष होय. 2 त्यावेळी बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला होता आणि यिर्मया चौकीदारांच्या पहाऱ्यात असलेल्या यहूदाच्या राजवाड्याच्या चौकात कैद केला गेला होता. 3-4 (यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यिर्मयाने केलेले भविष्यकथन आवडले नाही. म्हणून त्याने यिर्मयाला कैद केले होते. यिर्मयाने सांगितले होते “परमेश्वर म्हणतो, ‘मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन. नबुखद्नेस्सर ही नगरी जिंकेल यहूदाचा राजा सिद्कीया खास्द्यांच्या सैन्यापासून पळून जाऊ शकणार नाही. त्याला बाबेलच्या राजाच्या ताब्यात दिले जाईल सिद्कीया बाबेलच्या राजाशी प्रत्यक्ष समोरासमोर बोलेल.
6 यिर्मया कैदेत असताना म्हणाला, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे. 7 ‘यिर्मया, तुझे काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल लवकरच तुझ्याकडे येईल आणि तुला म्हणेल “अनाथोथजवळचे माझे शेत, यिर्मया, तू विकत घे. तू माझा अगदी निकटचा नातेवाईक असल्याने, तूच ते विकत घे. तो तुझाच हक्क आणि तुझीच जबाबदारी आहे.”’
8 “मग परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच घडले. माझा चुलतभाऊ हानामेल पहारेकऱ्यांच्या चौकात मला भेटला आणि म्हणाला, ‘यिर्मया, अनाथोथ गावाजवळचे माझे शेत तू विकत घे. अनाथोथ हे गाव बन्यामीनच्या कुळाच्या मालकीच्या प्रदेशात होते. तूच ते तुझ्यासाठी विकत घे. कारण ते विकत घेऊन त्याचा मालक होण्याचा तुझा हक्क आणि जबाबदारी आहे.’”
तेव्हा मला कळले की हाच देवाचा संदेश होता. देवाचा संदेश असाच आहे हे मला माहीत होतेच. 9 म्हणून मी माझा चुलतभाऊ हानामेल याच्याकडून ते शेत विकत घेतले. त्याबद्दल मी त्याला 17 चांदीची नाणी [a] दिली. 10 मी खरेदीखतावर सही केली आणि त्याची एक मोहोरबंद प्रत माझ्याजवळ ठेवली काही लोकांना साक्षीला ठेवून मी सर्व गोष्टी केल्या, मी ताजव्यात चांदी मोजली. 11 मग मी माझ्याजवळची मोहोरबंद खरेदीखताची प्रत आणि दुसरी उघडी प्रत अशा दोन्ही प्रती घेतल्या व. 12 त्या बारुखला दिल्या, बारुख हा नरीयाचा व नरीया हा महसेयाचा मुलगा होता. मोहोरबंद खरेदीखतात खरेदीच्या सर्व शर्ती नमूद केलेल्या होत्या. माझा चुलत भाऊ हानामेल व इतर साक्षीदार तेथे असतानाच मी खरेदीखत बारुखला दिले. त्यावर इतर साक्षीदारांनीही सह्या केल्या. ते खरेदीखत मी बारुखला देताना चौकात बसलेल्या यहूदाच्या पुष्कळ लोकांनी पाहिले.
13 “लोक सर्व पाहत असतानाच, मी बारुखला म्हणालो, 14 “सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘खरेदीखताच्या, मोहोरबंद व उघड, अशा दोन्ही प्रती मातीच्या मडक्यात ठेव म्हणजे त्या दीर्घ काळ चांगल्या टिकून राहतील.’ 15 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘भविष्यकाळात माझी माणसे इस्राएलमध्ये पुन्हा एकदा घरे, शेते आणि द्राक्षमळे विकत घेतील.’”
91 तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता.
तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
2 मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला,
माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
3 देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून
आणि भयानक रोगांपासून वाचवेल.
4 तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता.
पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा
तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
5 रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल
आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
6 अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक
आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही.
14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन.
जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो.
ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन.
मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
16 मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.
आणि त्यांना वाचवीन.”
6 वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. 7 कारण आपण जगात काहीही आणले नाही म्हणून आपण हे ओळखावे की, आपणसुद्धा या जगातून काहीही बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही. 8 जर आपणांस अन्न, वस्त्र (आसरा) असेल तर त्यामध्ये आपण संतुष्ट असावे. 9 पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात. 10 कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची इच्छा धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दु:ख करून घेतले आहे.
तू लक्षात ठेवाव्यास अशा काही गोष्टी
11 पण देवाच्या माणासा, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्याचीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रेम, सहनशीलता, आणि लीनता यासाठी जोराचा प्रयत्न कर. 12 विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत टिकून राहा. ज्यासाठी तुला बोलाविले होते. त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस 13 जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो. 14 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या समयापर्यत निष्कलंक आणि दोषरहित राहावे म्हणून ही आज्ञा पाळ. 15 जो धन्य, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु ह्या धन्यवादिताच्या निर्णयानुसार, योग्य समय आल्यावर हे घडवून आणील. 16 ज्या एकालाच अमरत्व आहे, ज्यापर्यंत पोहोंचता येणार नाही अशा प्रकाशात राहतो. ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही, त्याला सन्मान आणि अनंतकाळचे सामर्थ्य असो.
17 या युगातील श्रीमंतांस आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी. 18 चांगले करण्याची त्यांना आज्ञा कर. चांगल्या कृत्यात धनवान आणि उदार असावे. व स्वतःजवळ जे आहे त्यात इतरांबरोबर सहभागी होण्याची इच्छा असावी. 19 असे करण्याने ते स्वतःसाठी स्वर्गीय धनाचा साठा करतील जो भावी काळासाठी भक्कम पाया असे होईल त्यामुळे त्यांना खऱ्या जीवनाचा ताबा मिळेल.
श्रीमंत मनुष्य व लाजार
19 “एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐषारामात घालवीत असे. 20 त्याच्या फाटकाजवळ लाजार नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता. त्याच्या अंगावर फोड भरलेले होते. 21 त्या श्रीमंत मनुष्याच्या टेबलावरुन खाली पडलेले असेल ते खाण्याची तो आतुरतेने वाट पाही. कुत्रीदेखील येऊन त्याचे फोड चाटीत असत.
22 “मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला, व देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले. 23 आणि अधोलोकात. जेथे तो (श्रीमंत मनुष्य) यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले, व दूरवर असलेल्या अब्राहामाला पाहिले आणि लाजाराला त्याच्या शेजारी पाहिले, 24 तो मोठ्याने ओरडला, ‘पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या अग्नीत मी भयंकर वेदना सहन करीत आहे.!’
25 “परंतु अब्राहाम म्हणाला, ‘माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दू:खात आहेस. 26 आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे ज्यांना जायचे आहे त्यांना जाता येऊ नये व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येऊ नये.’
27 “तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘मग तुला मी विनंति करतो की पित्या, लाजाराला माझ्या पित्याच्या घरी पाठव, 28 कारण मला पाच भाऊ आहेत. त्याला त्यांना तरी सावध करु दे. म्हणजे ते तरी या यातनेच्या ठिकाणी येणार नाहीत.’
29 “पण अब्राहाम म्हणाला, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
30 “तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘नाही, पित्या अब्राहामा, मेलेल्यातील कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’
31 “अब्राहाम त्याला म्हणाला, ‘जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यांतून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.’”
2006 by World Bible Translation Center