Revised Common Lectionary (Semicontinuous)
40 देव त्याच्या माणसांवर रागावला.
देवाला त्यांचा कंटाळा आला.
41 देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले.
देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करु दिले.
42 देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले
आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.
43 देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले.
पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले.
देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
44 पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती
तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली
आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
45 देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली
आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.
46 इतर देशांनी त्यांना कैदी बनवले
पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.
47 परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून
आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू
आणि तुझे गुणगान करु.
48 परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या.
देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे.
आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन!”
परमेश्वराची स्तुती करा.
विनाश येत आहे
17 आपल्या मालकीच्या सर्व चीजवस्तू घेऊन पळून जाण्याच्या तयारीत राहा.
यहूदाच्या लोकांनो, शत्रूने तुमच्या शहराला वेढले असून
तुम्ही आता अडकला आहात.
18 परमेश्वर म्हणतो,
“यावेळी, मी यहूदाच्या लोकांना ह्या देशा बाहेर घालवून देईन.
मी त्यांना त्रास देऊन दु:ख भोगण्यास भाग पाडीन
म्हणजे त्यांना धडा मिळेल.”
19 अरेरे, मी (यिर्मया) फारच जखमी झालो.
माझ्या जखमा भरुन येण्यासारख्या नाहीत.
तरीसुद्धा मी स्वतःलाच सांगतो, “हे माझे दु:ख
मला पूर्णपणे भोगलेच पाहिजे.”
20 माझ्या तंबूचा नाश झाला.
तंबूचे सर्व दोर तुटले आहेत.
माझी मुले मला सोडून निघून गेली आहेत.
माझा तंबू उभारायला एकही माणूस उरला नाही.
माझा निवारा बांधायला एकही माणूस शिल्लक नाही.
21 मेंढपाळ (नेते) मूर्ख आहेत.
ते परमेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत.
ते शहाणे नाहीत.
त्यामुळे त्यांचे कळप (लोक) इतस्ततः विखरुन हरवले आहेत.
22 मोठा आवाज ऐका!
तो आवाज उत्तरेकडून येत आहे;
यहुदातील शहरांचा तो नाश करील.
युहदाचे निर्जन वाळवंट होईल.
तेथे कोल्ह्यांची वस्ती होईल.
23 परमेश्वरा, माणसाच्या आयुष्यावर त्याचा स्वतःचा खरा हक्क नसतो, हे मला माहीत आहे.
लोक भविष्याच्या योजना खरोखरच ठरवू शकत नाहीत.
24 परमेश्वरा, आम्हाला सुधार!
पण न्याय्य रीतीने सुधार!
रागाच्या भरात आम्हांला शिक्षा करु नकोस.
नाही तर तू कदाचित् आमचा नाश करशील.
25 तुला राग आला असेल,
तर दुसऱ्या राष्ट्रांना शिक्षा कर.
ते तुला जाणत नाहीत वा मान देत नाहीत.
ते तुझी उपासना करीत नाहीत.
त्या राष्ट्रांनी याकोबच्या कुटुंबाचा विनाश केला.
त्यांनी इस्राएल नेस्तनाबूत केले
आणि इस्राएलच्या भूमीचा नाश केला.
नियमशास्त्रातील शिक्षकांविरुद्ध इशारा(A)
45 सर्व लोक हे ऐकत असताना तो शिष्यांना म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते, 46 त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते. 47 ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या माणसांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”
खरे दान(B)
21 येशूने वर पाहिले व श्रीमंत लोकांना दानपेटीत दाने टाकताना न्याहाळले. 2 त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी टाकताना पाहिले. 3 तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. (मी असे म्हणतो) 4 कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”
2006 by World Bible Translation Center