Revised Common Lectionary (Semicontinuous)
4 याकोबाच्या वंशजांनो, इस्राएलमधल्या कुळांनो,
परमेश्वराचा संदेश ऐका.
5 परमेश्वर असे म्हणतो:
“मी तुमच्या पूर्वजांशी न्यायीपणाने वागलो नाही असे तुम्हाला वाटते का?
म्हणून ते माझ्यापासून दूर गेले का?
त्यांनी कवडी मोलाच्या दैवतांना
पूजले व स्वतः कवडीमोल झाले.
6 तुमचे पूर्वज असे म्हणाले नाहीत
‘परमेश्वराने आम्हाला मिसरहून आणले.
परमेश्वराने आम्हाला वाळवंटातून पार नेले.
त्यानेच आम्हाला ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून बाहेर नेले.
काळोख व धोका असलेल्या, निर्जन, जेथून कोणीही प्रवास करीत नाही
अशा प्रदेशातून देवाने आम्हाला पार केले.
तो परमेश्वर आता कोठे आहे?’”
7 परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टींनी
भरलेल्या उत्तम प्रदेशात आणले.
तुम्हाला तेथे पिकणारी फळे व धान्य खायला मिळावे म्हणून मी हे केले.
पण तुम्ही माझी ही भूमी ‘गलिच्छ’ केली.
मी तुम्हाला दिलेली
ही भूमी तुम्ही खराब केली.
8 “याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’
असे विचारले नाही.
कायदा जाणणाऱ्यांनी मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
इस्राएलचे नेते माझ्याविरुद्ध् गेले.
संदेष्ट्यांनी खोटा देव बआल याच्या नावे भविष्य वर्तविले.
त्यांनी निरुपयोगी मूर्तींची पूजा केली.”
9 परमेश्वर म्हणतो, “म्हणून आता मी तुम्हाला पुन्हा दोषी ठरवीन
आणि तुमच्या नातवंडांनासुद्धा् दोषी ठरवीन.
10 समुद्र पार करुन कित्ती बेटावर जा.
कोणाला तरी केदारला पाठवा.
लक्षपूर्वक पाहा.
कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!
11 कोणत्या राष्ट्राने, नवीन दैवतांची पूजा करायची म्हणून,
जुन्या, दैवतांना पूजायचे थांबविले आहे का?
नाही. आणि त्यांचे दैवत मुळी देवच नाही.
पण माझ्या लोकांनी त्यांच्या तेजस्वी देवाची पूजा करायचे
सोडून कवडीमोलाच्या मूर्तींची पूजा करणे सुरु केले.
12 “आकाशा, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्र्चर्याचा धक्का बसू दे.
भीतीने थरथर काप.”
हा परमेश्वराचा संदेश होता.
13 “माझ्या लोकांनी दोन पापे केली.
ते माझ्यापासून दूर गेले.
(मी जिवंत पाण्याचा झरा आहे.)
आणि त्यांनी स्वतःची पाण्याची टाकी खोदली.
(ते दैवंताकडे वळले.)
पण ती टाकी फुटली आहे.
त्यात पाणी राहू शकत नाही.
प्रमुख गायकासाठी गित्तीथ चालीवर बसवलेले आसाफये स्तोत्र.
81 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा,
इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे
मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले.
इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही.
इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले.
इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले,
जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन.
जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील.
त्यांना कायमची शिक्षा होईल.
16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल.
देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
Worship That Pleases God
13 ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधु व भगिनीसारखी प्रीति करा. 2 पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे. 3 तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही देहात असल्याने जे दु:ख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.
4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा. व वैवाहिक अशुद्धता असू नये. कारण जे व्यभिचारी व विषयवासनेबद्दल भ्रष्ट आहेत अशा लोकांचा देव न्याय करील. 5 आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे.
“मी कधीही तुला सोडणार नाही,
मी कधीही तुला त्यागणार नाही” (A)
6 म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो,
“देव माझा सहाय्यकर्ता आहे,
मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करणार?” (B)
7 ज्यांनी तुम्हांला देवाचा संदेश दिला त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील निष्पत्ती पाहा. आणि त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे.
15 तर मग आपण येशूच्या द्वारे स्तुतीचा यज्ञ सातत्याने करू या. म्हणजे त्याचे नाव आपल्या ओठांनी सतत घेऊ या 16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?
14 एका शब्बाथ दिवशी तो प्रमुख परुश्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे असणारे लोक येशूवर बारकाईने नजर ठेवीत होते.
स्वतःला महत्त्व देऊ नका
7 मग त्याने पाहुण्यांना एक बोधकथा सांगितली, कारण त्याने पाहिले की, ते त्यांच्यासाठी मानाच्या जागा शोधीत होते. तो त्यांना म्हणाला, 8 “जेव्हा एखादा तुम्हांला लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका. कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या माणसाला त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल. 9 मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल, आणि तुम्हांला म्हणेल, ‘या माणसाला तुझी जागा दे.’ मग खजील होऊन तुम्हांला खालच्या जागी बसावे लागेल.
10 “पण जेव्हा तुम्हांला आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या (शेवटच्या) जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हांला म्हणेल, ‘मित्रा, वरच्या आसनावर येऊन बैस.’ तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझा मान होईल. 11 कारण जो कोणी स्वतःला उच्च करितो त्याला लीन केले जाईल व जो स्वतःला लीन करील त्याला उच्च केले जाईल.”
तुम्हांला बक्षीस दिले जाईल
12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. 13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. 14 आणि तुला आशीर्वाद मिळतील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही असणार नाही. कारण नीतीमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
2006 by World Bible Translation Center