Revised Common Lectionary (Semicontinuous)
इस्राएल देवाचे नंदनवन
5 मी माझ्या मित्रासाठी (देवासाठी) गाणे गाईन. हे गाणे, माझ्या मित्राच्या द्राक्षमळ्याच्या (इस्राएलच्या) प्रेमासंबंधी असेल.
माझ्या मित्राचा द्राक्षमळा अतिशय
सुपीक जमिनीत होता.
2 माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली.
तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली.
त्याने मळ्याच्या मध्यभागी
एक मनोरा बांधला.
द्राक्षाचे उत्तम पीक येईल अशी त्याला आशा होती
पण त्यातून निकृष्ट प्रतीचीच फळे आली.
3 म्हणून देव म्हणाला, “यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनो व यहूदात राहणाऱ्या लोकांनो,
माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा जरा विचार करा.
4 माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी आणखी काय करू शकलो असतो?
मला जे करणे शक्य होते ते सर्व मी केले
मी चांगल्या पिकाची आशा केली
पण पीक वाईट आले.
असे का झाले?
5 “आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे
ते तुम्हाला सांगतो.
मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढून
मी जाळून टाकीन.
त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून
दगड पायाने तुडवीन.
6 मी माझा द्राक्षमळा उजाड करीन.
कोणीही वेलीची काळजी घेणार नाही.
कोणीही त्या मळ्यात काम करणार नाही.
त्यात तण व काटेकुटे माजतील.
तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
7 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मालकीचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल हा देश होय. ज्या द्राक्षवेली परमेश्वराला प्रिय आहेत त्या म्हणजे यहुदी लोक होत.
परमेश्वराने न्यायाची आशा केली
पण तेथे फक्त हत्याच घडली.
परमेश्वराने प्रामाणिकपणाची आशा धरली
पण तेथे फक्त वाईट रितीने वागविलेल्या लोकांचे आक्रोश होते.
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
8 भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
9 तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
29 विश्वासाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरुन चालावे, तसा तांबडा समुद्र पार केला. पण जेव्हा इजिप्तच्या लोकांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले.
30 लोकांनी विश्वासाने सात दिवस फेऱ्या मारल्यावर यरीहोची भिंत पडली.
31 राहाब वेश्येच्या विश्वासामुळेच ज्या लोकांनी आज्ञा मोडली त्यांच्याबरोबर ती मारली गेली नाही कारण तिने हेरांचे शांतीने स्वागत केले.
32 मी आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आदि संदेष्टे यांच्याबाबत सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही. 33 लोकांनी विश्वासाने राज्ये जिंकली, न्याय स्थापित केला, आणि त्यांना देवाची अभिवचने मिळाली, त्यांनी सिंहांची तोडे बंद केली. 34 त्यांनी अग्निचे सामर्थ्य नष्ट केले. तरवारीने मरण्यापासून बचावले. अशक्तपणात त्यांनी सामर्थ्य मिळविले. ते लढाईत सामर्थ्यशाली ठरले. आणि त्यांनी परकी सेना मागे हटविली. 35 स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले पुन्हा जिवंत असे मिळाले, इतरांना वेदना सोसाव्या लागल्या कारण त्यांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळावे म्हणून सुटका करून घेण्यास नकार दिला. 36 काहींना निंदा व चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले. 37 त्यांना दगडमार झाला. करवतीने त्यांना चिरण्यात आले, त्यांना तरवारीने मारण्यात आले. ते मेंढ्यांचे व बकऱ्यांचे कातडे पांघरून फिरत राहिले. ते निराधार झाले. त्यांना अती दबावाखाली भारी पीडा देण्यात आल्या. 38 त्यांच्यासाठी जग योग्य नव्हते, ते जंगलात, डोंगरकपारीत, गुहांमधून व जमिनीतील बिळांतून लपून फिरत राहिले.
39 या लोकांना त्यांचा विश्वासाविषयी चांगले बोलण्यात आले पण देवाने त्यांना जे अभिवचन दिले होते ते त्यांना मिळाले नाही. 40 देवाने आमच्यासाठी काहीतरी अधिक चांगली योजना तयार केली होती यासाठी की आमच्याबरोबर त्यांनाही परिपूर्ण करावे.
येशूचे उदाहरण आपणसुध्दा अनुसरावे
12 म्हणून, विश्वास धरणारे पुष्कळ ढगांसारखे साक्षीदार सभोवती असल्याने आपल्याला अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टी तसेच सहजासहजी गुंतविणारे पाप आपण दूर फेकू या व जी शर्यत आपल्यासमोर आहे ती शर्यत आपण चिकाटीने पूर्ण करू. 2 जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
लोक येशूविषयी सहमत होणार नाहीत(A)
49 “मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आहे. मला असे वाटते की ती अगोदरच पेटली असती तर किती बरे झाले असते. 50 माझ्याकडे बाप्तिस्मा आहे व तो मला घ्यावयाचा आहे. आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे! 51 तुम्हांला असे वाटते का की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे? नाही, मी तुम्हांला सांगतो मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे. 52 मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकाविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल.
53 त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा
व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल,
आईविरुद्ध मुलगी
व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल,
सासूविरुद्ध सून
व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल.”
समय ओळखणे(B)
54 तो लोकसमुदायाला म्हणाला, “तुम्ही जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, ‘पाऊस पडेल’ आणि तेच घडते. 55 जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता ‘उकाडा होईल’ आणि तसे घडते. 56 अहो ढोंग्यांने! तुम्ही पृथ्वीवरील व आकाशातील स्थित्यंतरे पाहून अनुमान काढता, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हांला का काढता येत नाही?
2006 by World Bible Translation Center