Revised Common Lectionary (Semicontinuous)
परमेश्वर यिर्मयाला बोलावितो
4 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. हा संदेश असा होता.
5 “तू आईच्या गर्भात जन्म घेण्यापूर्वीपासून
मला माहीत होतास.
तू जन्माला येण्यापूर्वीच
मी तुझी विशेष कामगिरीसाठी निवड केली.
राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून मी तुझी निवड केली.”
6 मग यिर्मया म्हणाला, “पण सर्वशक्तिमान परमेश्वरा, मला कसे बोलावे ते माहीत नाही. मी तर एक लहान बालक आहे.”
7 पण परमेश्वर मला म्हणाला,
“‘मी लहान बालक आहे’ असे म्हणू नकोस.
मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे.
मी तुला सांगेन ती प्रत्येक गोष्ट तू लोकांना सांगितलीच पाहिजे.
8 कोणालाही घाबरु नकोस.
मी तुझ्या पाठीशी आहे.
मी तुझे रक्षण करीन.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
9 मग परमेश्वराने हात लांब करुन माझ्या तोंडाला स्पर्श केला. मग परमेश्वर मला म्हणाला,
“यिर्मया, मी माझे शब्द तुझ्या तोंडात घालीत आहे.
10 खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी,
नष्ट करुन टाकण्यासाठी आणि उलथून टाकण्यासाठी,
उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी
आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”
71 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
2 तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील.
तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
3 माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो,
तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस.
तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.
4 देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव.
मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
5 प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच
तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
6 जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे
मी माझ्या आईच्या शरीरात होतो
तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीच तुझी प्रार्थना केली.
18 ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दु:ख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नविन ठिकाणी आला आहात. 19 कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यानी ऐकला त्यानी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये. 20 कारण ते जी आज्ञा केली होती सहन करू शकले नाहीत. “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा.” [a] 21 खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.” [b]
22 परंतु तुम्ही सीनाय पर्वताजवळ जिवंत देवाच्या नगराजवळ आणि स्वर्गीय यरुशलेम येथे आलेले आहात आणि तुम्ही आनंदाने जमा झालेल्या हजारो देवदूतांजवळ आलेले आहात. 23 आणि तुम्ही प्रथम जन्मलेल्या मुलांच्या मंडळीकडे, ज्यांची नावे स्वर्गात लिहिली आहेत अशांकडे आला आहात, आणि तुम्ही देव जो सर्वांचा न्यायाधीश आहे त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही नीतिमान लोकांच्या आत्म्यांकडे जे पूर्ण आहेत त्यांच्याकडे आला आहात. 24 आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी सांगते.
25 जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरविले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे? 26 त्यावेळेस त्याच्या आवाजाने भूमि हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हादरवून टाकीन.” [c] 27 “पुन्हा एकदा” हे शब्द हेच दर्शवितात की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलविता येत नाहीत त्या तशाच राहतील.
28 म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या, आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची उपासना करू. 29 कारण आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.
येशू एका स्त्रीला शब्बाथ दिवशी बरे करतो
10 शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता. 11 तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने अठरा वर्षे पांगळे केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. 12 येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस!” 13 नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली. आणि ती देवाची स्तुति करु लागली.
14 नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बाथ दिवशी तिला बरे केले होते. तो लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”
15 येशूने त्याला उत्तर दिले, आणि म्हणाला. “ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? 16 ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?” 17 तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करु लागला.
2006 by World Bible Translation Center