Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
8 भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
9 तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
5 याकोबाच्या वंशजांनो, या आपण परमेश्वराच्या प्रकाशातून चालू या.
6 तुम्हाला हे सांगायचे कारण तुम्ही तुमच्या लोकांपासून दूर गेलात. तुमचे लोक पूर्वेकडील चुकीच्या कल्पनांनी भारावून गेले आहेत. पलिष्ट्यांप्रमाणे ते भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी परकीयांच्या कल्पनांचा स्वीकार केला आहे. 7 दुसरीकडून आणलेल्या सोन्याचांदीने तुमचा देश भरलेला आहे. तुमच्याकडे खूप खजिने आहेत. असंख्य घोडे व रथ आहेत. 8 तुमचा देश लोक पूजत असलेल्या मूर्तीनी भरून गेला आहे. लोकच त्या मूर्ती घडवितात आणि त्यांची पूजा करतात. 9 दिवसेंदिवस लोक वाईट होत चालले आहेत. ते नीच पातळीवर पोहोचले आहेत. देवा, तू नक्कीच त्यांना क्षमा करणार नाहीस. हो ना?
10 येथून चालते व्हा. कडेकपारीमागे धुळीत लपून बसा. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याच्या महान सामर्थ्यापासून लपून राहिले पाहिजे.
11 गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल.
ख्रिस्तापासून दूर जाऊ नका
26 सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. 27 पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही. 28 जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मारतात. 29 तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा! 30 कारण त्याला ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.” [a] पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.” [b] 31 जीवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे.
2006 by World Bible Translation Center