Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 10

10 परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस?
    संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत.
गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात.
    आणि गरीब लोकांना त्रास देतात.
दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात.
    आधाशी लोक देवाला शाप देतात.
    अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात.
वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत
    ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.
दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात.
    देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत.
    देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत.
आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात, “आपण मजा करु
    आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.”
ते लोक नेहमी शाप देत असतात.
    ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात.
    ते सतत वाईट योजना आखत असतात.
ते गुप्त जागी लपून बसतात
    आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात.
    ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात.
ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात.
    ते गरीबांवर हल्ला करतात.
दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात.
10 ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना
    पुन्हा पुन्हा त्रास देतात.
11 “देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला.
    आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही”
    असा विचार गरीब लोक करतात.

12 परमेश्वरा, ऊठ!
    आणि काहीतरी कर.
    देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस.

13 वाईट लोक देवाविरुध्द का जातात?
    कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते.
14 परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट
    आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर.
संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात.
    परमेश्वरा, निराधाराला मदत करणारा तूच एक आहेस.
    म्हणून त्यांना मदत कर.

15 परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर.
16 त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.
17 परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस.
    त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे.
18 परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर.
    दुखी: लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस.
    दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून सोड!

यिर्मया 7:1-15

यिर्मयाचे मंदिरातील प्रवचन

यिर्मयासाठी परमेश्वराचा संदेश: “यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दाराजवळ उभा राहा आणि हा उपदेश कर:

“‘यहूदातील सर्व लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. देवाची पूजा करण्यासाठी आत येणाऱ्या सर्व लोकांनो, ऐका! परमेश्वर हा इस्राएलच्या लोकांचा देव आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो तुमची जगण्याची पद्ध् बदला आणि सत्कृत्ये करा. तुम्ही असे केल्यास मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन [a] काही लोक खोटे बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका. ते म्हणतात “हे परमेश्वराचे मंदिर आहे. परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर.” तुम्ही तुमचा जीवनमार्ग बदललात आणि सत्कृत्ये केलीत तर मी तुम्हाला येथे राहू देईन. तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक असले पाहिजे. तुम्ही अपरिचिताशीसुध्दा प्रामाणिकपणे वागले पाहिजे. विधवांसाठी आणि अनाथांसाठी तुम्ही योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. निरपराध्यांना मारु नका. दुसऱ्या देवांना अनुसरु नका. का? कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा नाश करतील. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात, तर मी तुम्हाला येथे राहू देईन. मी ही भूमी कायमची तुमच्या पूर्वजांना दिली.

“‘पण तुम्ही ज्या लबाड्यांवर विश्वास ठेवत आहात, त्या लबाड्या कवडीमोलाच्या आहेत. तुम्ही चोरी आणि खून कराल का? तुम्ही व्यभिचाराचे पाप कराल का? तुम्ही दुसऱ्यांवर खोटे आरोप कराल का? तुम्ही बआल देवाची पूजा कराल का? तुम्हाला माहीत नसणाऱ्या इतर दैवतांना अनुसराल का? 10 तुम्ही ही अशी पापे केलीत तर तुम्ही माझ्या नावाच्या या घरात माझ्यासमोर उभे राहू शकाल असे तुम्हाला वाटते का? अशा भयंकर गोष्टी करुन तुम्ही माझ्यासमोर उभे राहून म्हणू शकाल का “आम्ही सुरक्षित आहोत?” 11 हे मंदिर माझ्या नावाचे आहे. तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का? मी तुमच्यावर नजर ठेवून आहे.’” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

12 “‘यहूदातील लोकांनो, आता तुम्ही शीलो गावात जा. माझ्या नावाचे पहिले घर मी जेथे बांधले, तेथे जा. इस्राएलमधील लोकांनीसुध्दा दुष्कृत्ये केली. त्याबद्दल मी काय केले, ते जाऊन पाहा. [b] 13 इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत होता. हा परमेश्वराचा संदेश आहे! मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हाला बोलाविले, पण तुम्ही ओ दिली नाही. 14 म्हणून, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते यरुशलेममधील माझ्या नावाचे घर मी नष्ट करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन. 15 एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर फेकले, तसे मी तुम्हाला फेकीन.’

इब्री लोकांस 3:7-4:11

आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे

म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे,

“आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
    तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.
ज्याप्रमाणे तुम्ही अरण्यामध्ये
    देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,
जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले,
    तेथे त्यांनी चाळीस वर्षे सामर्थ्यशाली कामे पाहिली.
10 त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि म्हणालो,
    ‘या लोकांच्या मनात नेहमी चुकीचे विचार येतात,
    या लोकांना माझे मार्ग कधीही समजले नाहीत’
11 म्हणून रागाच्या भरात मी शपथ वाहून म्हणालो,
    ‘हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.’” (A)

12 सावध असा, बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंतःकरणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात. 13 उलट, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत. 14 कारण आपण सर्व जण ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाचे वाटेकरी आहोत. जर आम्ही सुरुवातीला धरलेला आमचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून राहिलो, तर 15 पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:

“आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
    तेव्हा तुम्ही देवाविरुद्ध बंड केलेत;
    तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” (B)

16 ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुद्ध बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने इजिप्त देशातून बाहेर नेले होते? 17 आणि तो (देव) कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.

18 कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय? 19 म्हणून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.

ज्याअर्थी देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या. कारण आम्हालासुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही. ज्या आम्ही विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. जसे देवाने म्हटले आहे.

“म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो,
    ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत’” (C)

जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला. कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसा बद्दल असे बोलला आहे की: “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्राति घेतली.” [a] आणि पुन्हा या वचनांमध्ये तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत.”

ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासमुळे त्यात प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे. त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्र्च्ति केली असून त्याला तो “आज” असे म्हणतो, अगोदरच उदधृत केलेल्या उताऱ्यामध्ये म्हटल्याप्रमाणे देव त्या दिवसाविषयी पुष्कळ वर्षांनी दाविदाद्वारे बोलला:

“आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
    तर आपली अंतःकरणे कठीण करु नका.” (D)

कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता. म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही सातवा म्हणजे विसाव्याच्या दिवस आहे. 10 कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वतःच्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता. 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु या. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center