Revised Common Lectionary (Semicontinuous)
देवाचे स्तुतिस्तोत्र
12 त्या वेळेला तू म्हणशील:
“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो
तू माझ्यावर रागावला होतास
पण आता राग सोड
तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.
2 देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे.
मी निर्भय आहे तो मला तारतो.
परमेश्वर हीच माझी शक्तीआहे.
तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.”
3-4 तारणाच्या झऱ्यातून तुम्ही पाणी घ्या
म्हणजे सुखी व्हाल
आणि म्हणाल,
“परमेश्वराची स्तुती असो.
त्याच्या नावाची उपासना करा.
त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”
5 परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण
त्याने महान कार्य केले आहे.
देवबद्दल ही वार्ता सर्व जगात
पसरवा, सर्व लोकांना हे कळू द्या.
6 सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा.
कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे.
तेव्हा आनंदी व्हा.
15 सत्य गेले
आणि सत्कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे लुबाडले गेले.
परमेश्वराने पाहिले पण त्याला कोठेच चांगुलपणा सापडला नाही.
परमेश्वराला हे आवडले नाही.
16 परमेश्वराने पाहिले पण त्याला कोणीही ठामपणे उभा
राहून लोकांना मदत करताना दिसला नाही.
म्हणून परमेश्वराने स्वतःचे सामर्थ्य
आणि चांगुलपणा वापरला आणि लोकांना वाचविले.
17 परमेश्वराने युध्दा्ची तयारी केली.
त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले,
तारणाचे शिरस्त्राण घातले, शिक्षेचे कपडे घातले.
दृढ प्रेमाचा अंगरखा घातला.
18 परमेश्वर त्याच्या शत्रूवर रागावला आहे.
म्हणून परमेश्वर त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे शिक्षा करील.
परमेश्वर त्याच्या शत्रूंवर रागावला असल्यामुळे सर्व देशांतील लोकांना तो शिक्षा करील.
त्यांच्या पात्रतेप्रमाणे तो त्यांना शिक्षा देईल.
19 नंतर पक्ष्चिमेकडील लोक घाबरतील आणि परमेश्वराला मान देतील.
पूर्वेकडचे लोक घाबरतील आणि देवाच्या गौरवांचा आदर करतील.
देवाने सोडलेल्या झंझावातामुळे,
वेगाने वाहणाऱ्या नदीप्रमाणे, देव जलद गतीने येईल.
20 मग तारणारा सियोनला येईल आधी पाप केलेल्या
पण नंतर देवाला शरण आलेल्या याकोबाच्या लोकांकडे तो येईल.
21 परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांबरोबर एक करार करीन. मी तुमच्यात घातलेला माझा आत्मा आणि तुमच्या तोंडात घातलेले माझे शब्द कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत, असे मी तुम्हाला वचन देतो. ते पिढ्यान् पिढ्या तुमच्याबरोबर राहतील ते आताही तुमच्याबरोबर असतील आणि चिरकाल तुमच्याबरोबर राहतील.”
देवाचे राज्य तुम्हांमध्ये आहे(A)
20 एकदा, परुश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल,
त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच राज्यदृश्य स्वरुपात येत नाही. लोक असे म्हणणार नाहीत की 21 ते येथे आहे! किंवा ते तेथे आहे! कारण देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”
22 पण शिष्यांना तो म्हणाला, “असे दिवस येतील की जेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या गौरवाने येण्याच्या एका दिवसाची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहाल. परंतु तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही. 23 आणि लोक तुम्हांला म्हणतील, ‘तेथे पाहा! तेथे जाऊ नका.’ किंवा त्यांच्यामागे जाऊ नका.
24 “कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते आणि प्रकाशते तसेच मनुष्याच्या पुत्राचे त्याच्या दिवसात होईल. 25 पण पहिल्यांदा त्याने पुष्कळ गोष्टीविषयी दु:ख भोगले पाहिजे. व या पिढीने त्याला नाकारले पाहिजे.
26 “जसे नोहाच्या दिवसांत झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातदेखील होईल. ते खात होते, पीत होते, लग्न करीत होते. लग्न करुन देत होते. 27 नोहा तारवात जाईपर्यंत असे चालले होते. मग पूर आला. व त्या सर्वांचा नाश झाला.
28 “त्याचप्रकारे लोटाच्या दिवसात झाले तसे होईल: ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते. 29 परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून बाहेर पडला त्या दिवशी आकाशातून अग्नि व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला. 30 मनुष्याचा पुत्र प्रगट होईल तेव्हा असेच होईल.
31 “त्या दिवशी जर एखादा छपरावर असेल व त्याचे सामान घरात असेल, त्याने ते घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये. 32 लोटाच्या पत्नीची आठवण करा.
33 “जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला गमावील आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्याला राखील. 34 मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यापैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. 35 दोन स्त्रिया धान्य दळत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल. 36 शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेविले जाईल.”
37 शिष्यांनी त्याला विचारले, “कोठे प्रभु?”
येशूने उत्तर दिले, “जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.”
2006 by World Bible Translation Center