Revised Common Lectionary (Semicontinuous)
15 त्यांनी हे काम, पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सुरु केले.
देव लोकांना उत्तेजन देतो
2 सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गयला परमेश्वराकडून संदेश मिळाला: 2 यहूदाचा राज्यपाल आणि शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल व प्रमुख याजक यहोसादाकचा मुलगा यहोशवा आणि इतर लोक यांच्याशी तू बोल. त्यांना ह्या गोष्टी सांग. 3 “तुमच्यातील कितीजण ह्या मंदिराकडे पाहून ह्याची तुलना आधीच्या नाश झालेल्या सुंदर मंदिराशी करण्याचा प्रयत्न करतात? तुम्हाला काय वाटते? आधीच्या मंदिराच्या तुलनेत हे काहीच नाही ना? 4 पण आता परमेश्वर म्हणतो, ‘जरुब्बाबेल, निराश होऊ नकोस.’ यहोसादाकच्या मुला, प्रमुख याजक यहोशवा, ‘नाउमेद होऊ नकोस. या देशाच्या सर्व लोकांनो, धीर सोडू नका. हे काम चालू ठेवा, मी तुमच्याबरोबर आहे.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.”
5 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मिसर सोडले, तेव्हा मी तुमच्याबरोबर करार केला. मी माझ्या वचनाला जागलो. माझा आत्मा तुमच्यात आहे. तेव्हा घाबरु नका. 6 का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी हलवून सोडीन आकाश आणि पृथ्वी कंपित करीन समुद्र आणि कोरडी जमीन यांना कंपित करीन. 7 मी राष्ट्रांना धक्का देईन आणि मग प्रत्येक राष्ट्र तुमच्याकडे संपत्ती घेऊन येईल मग हे मंदिर वैभवाने भरुन टाकीन. सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. 8 त्यांच्याकडील सर्व सोने-चांदी माझ्या मालकीची आहे सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे. 9 आणि सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की आताचे मंदिर हे आधीच्या मंदिरापेक्षा सुंदर असेल. मी ह्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करीन. लक्षात ठेवा, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे.”
दावीदाचे स्तोत्र
145 देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो.
मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
2 मी तुझी रोज स्तुती करतो.
तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.
3 परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात.
त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.
4 परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील.
तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
5 तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे.
मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.
17 परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते.
तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
18 जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात,
त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो.
जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो,
त्याच्या अगदी जवळ तो असतो.
19 भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो.
परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो.
तो त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देतो
आणि त्यांना वाचवतो.
20 जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
21 मी परमेश्वराची स्तुती करेन.
प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.
स्तुतिगान
98 परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या
म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
त्याच्या पवित्र उजव्या बाहूने
त्याच्याकडे विजय परत आणला.
2 परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली.
परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
3 त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला.
दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
4 पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर.
त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
5 वीणे, परमेश्वराची स्तुती करा.
वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.
6 कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे,
परमेश्वराचे गुणवर्णन करा.
7 समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना
जोर जोरात गाऊ द्या.
8 नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो,
सगळ्यांनी बरोबर गाणे गा.
9 परमेश्वरासमोर गा.
कारण तो जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने राज्य करेल,
तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.
वाईट गोष्टी घडतील
2 आता बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, ती प्रभु येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी, आणि त्याच्याबरोबर आमच्या एकत्र भेटण्याविषयी. 2 आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही तुमचे मन पूर्णपणे अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा सतत विचलित होऊ नका, जर तुम्ही ऐकले की, प्रभूचा दिवस आला आहे, काही लोक अशा प्रकारचे भविष्य वर्तवतील. किंवा काही लोक शिकवणुकीद्वारे किंवा काही लोक आम्हांकडून पत्र लिहिले आहे असे भासवून असा दावा करतील. 3 तर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये. म्हणून सावध असा. मी असे म्हणतो कारण पहिल्यांदा मोठी बंडखोरी झाल्याशिवाय प्रभूचा दिवस येणार नाही. आणि जो नाशासाठी नेमला आहे, तो नियम मोडणारा प्रकट होईल. 4 तो विरोध करील आणि स्वतःला सर्व गोष्टींच्या वर उच्च करील. त्याला देव किंवा उपासना करण्याची कोणतीही एखादी वस्तु असे म्हणतील. येथपर्यंत की तो देवाच्या मंदिरात जाईल आणि सिंहासनावर बसेल आणि तो स्वतःला देव असे जाहीर करील.
5 मी तुमच्याबरोबरच होतो तेव्हा तुम्हाला मी ह्या गोष्टींबद्दल सांगत होतो. ते तुम्हाला आठवत नाही काय?
तारणासाठी तुमची निवड झाली आहे
13 पण आम्ही देवाकडे तुमच्याविषयी नेहमीच आभार मानले पाहिजेत. ज्यांच्यावर देव प्रेम करतो असे तुम्ही आमचे बंधु आहात. कारण आत्म्याच्या द्वारे शुद्धीकरण आणि सत्यावर विश्वास ठेवून तारण व्हावे म्हणून देवाने तुम्हाला प्रारंभापासून निवडले आहे. 14 आणि या तारणासाठीच, आम्ही सांगितलेल्या सुवार्तेद्वारेच देवाने तुम्हांला बोलाविले. यासाठी की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे जे गौरव ते तुम्हांलाही मिळावे 15 म्हणून बंधूंनो, दृढ उभे राहा. आणि आमच्या तोंडच्या वचनाद्वारे किंवा आमच्या पत्राद्वारे जी परंपरा आम्ही तुम्हाला शिकविली आहे तिला धरुन उभे राहा.
16-17 आता प्रभु येशू ख्रिस्त स्वतः आणि देव आमचा पिता ज्याने आम्हावर प्रेम केले आणि ज्याने आपल्या कृपेमध्ये आम्हाला अनंतकाळचे समाधान आणि चांगली आशा दिली. ते तुमच्या अंतःकरणाला समाधान देवोत व तुम्ही ज्या प्रत्येक चांगल्या गोष्टी करता अथवा सांगता त्यामध्ये तुम्हाला बळकट करो.
काही सदूकी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात(A)
27 मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले, 28 “गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मेला, व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्याला मुले व्हावीत. 29 सात भाऊ होते. पाहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मेला. 30 नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले. 31 नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले. 32 नंतर ती स्त्रीही मरण पावली. 33 तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.”
34 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करुन घेतात व लग्न करुन देतात. 35 परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करुन घेणार नाहीत, आणि लग्न करुन देणार नाहीत 36 आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत. 37 जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले व मेलेलेसुद्धा उठविले जातात हे दाखवून दिले. 38 देव मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.”
2006 by World Bible Translation Center