Revised Common Lectionary (Semicontinuous)
117 सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा.
सर्व लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
2 देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि
देव आपल्याशी सदैव खरा वागतो.
परमेश्वराचा जयजयकार करा!
आशेचे वचन
30 यिर्मयाला परमेश्वराकडून पुढील संदेश आला. 2 परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणाला, “मी तुझ्याशी बोललेले शब्द ग्रंथात लिहून ठेव. ते तुझ्यासाठी लिहून ठेव. 3 असे करण्याचे कारण असा काळ येईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “तेव्हा मी इस्राएल आणि यहूदा येथील माझ्या हद्दपार केलेल्या लोकांना परत आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत मी त्यांना परत वस्ती करु देईन. मग ती भूमी पुन्हा त्यांच्या मालकीची होईल.”
4 इस्राएल व यहूदा येथील लोकांबद्दल परमेश्वराने हा संदेश दिला. 5 परमेश्वर म्हणाला,
“लोकांचे भीतीने रडणे आम्हाला ऐकू येते.
लोक घाबरले आहेत.
कोठेही शांती नाही.
6 “पुढील प्रश्न विचारा व त्यांचा विचार करा.
पुरुषाला मूल होऊ शकेल का? अर्थात् नाही
मग प्रत्येक पुरुष प्रसूतिवेदना होणाऱ्या बाई प्रमाणे
पोट धरताना का दिसत आहे?
प्रत्येकाचा चेहरा मृताप्रमाणे पांढराफटक का पडला आहे?
का? कारण ते फार घाबरले आहेत.
7 “याकोबाच्या दृष्टीने हा फार महत्वाचा काळ आहे.
हा अतिशय संकटाचा काळ आहे.
पुन्हा असा काळ कधीच येणार नाही.
पण याकोबाचे रक्षण होईल.
8 “त्या वेळी,” हा सर्वशक्तिमान परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल व यहूदा ह्यांच्यामधील लोकांच्या मानेवरील जोखड तोडीन. तुमची बंधने तोडीन. परक्या देशातील लोक पुन्हा माझ्या माणसांना गुलाम होण्यास भाग पाडणार नाहीत. 9 इस्राएल आणि यहूदा यांच्यामधील लोक परक्या देशांची सेवा करणार नाहीत. नाही! ते परमेश्वराची, त्यांच्या देवाची सेवा करतील. मी त्यांच्यासाठी पाठवणार असलेल्या त्याच्या दावीद राजाचीही ते सेवा करतील.
10 “तेव्हा, याकोब, माझ्या सेवका, घाबरु नकोस,”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“इस्राएल, भीऊ नकोस
मी त्या दूरच्या ठिकाणाहून तुझे रक्षण करीन.
तुम्ही त्या दूरच्या प्रदेशात कैदी आहात.
पण मी तुमच्या वंशजांना वाचवीन.
मी त्यांना तेथून परत आणीन.
याकोबाला पुन्हा शांती लाभेल.
लोक त्याला त्रास देणार नाहीत.
माझ्या माणसांना घाबरविणारा कोणीही शत्रू नसेल.
11 इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आहे.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“मी तुमचे रक्षण करीन.
मी तुम्हाला त्या राष्ट्रांमध्ये पाठविले.
पण त्या सर्व राष्ट्रांचा मी नाश करीन.
खरंच! मी त्या राष्ट्रांचा नाश करीन.
पण मी तुमचा नाश करणार नाही.
तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे.
पण मी न्याय्यबुद्धीने तुम्हाला शिक्षा करीन.”
12 परमेश्वर म्हणतो,
“इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, तुम्हाला कधीही बरी न होणारी जखम झाली आहे,
कधीही भरुन न येणारी हानी पोहोचली आहे.
13 तुमच्या व्रणांची काळजी घेणारा कोणीही नाही,
म्हणून तुम्ही बरे होणार नाही.
14 तुम्ही बऱ्याच राष्ट्रांचे मित्र झालात
पण ती राष्ट्रे तुमची पर्वा करीत नाहीत.
तुमचे ‘मित्र’ तुम्हाला विसरले आहेत.
मी शत्रूला दुखवावे, तसे तुम्हाला दुखविले आहे.
मी तुम्हाला कडक शिक्षा केली.
तुमच्या भयंकर अपराधांसाठी मी हे केले.
तुम्ही खूप पापे केलीत, म्हणून मी असे केले.
15 इस्राएल आणि यहूदा, तुमच्या जखमेबद्दल तुम्ही आरडाओरड का करता?
तुमची जखम यातना देणारी आहे.
पण त्यावर काही इलाज नाही.
मी, परमेश्वराने, तुमच्या भयंकर अपराधांबद्दल ह्या गोष्टी घडवून आणल्या.
तुमची पापे खूप वाढली. म्हणून मी असे केले.
16 त्या राष्ट्रांनी तुमचा नाश केला.
पण आता त्या राष्ट्रांचा नाश केला जाईल.
इस्राएल व यहूदा, तुमच्या शत्रूंना कैद केले जाईल.
त्या लोकांनी तुमच्या वस्तू चोरल्या.
पण आता दुसरे लोक त्यांच्या वस्तू चोरतील.
युद्धात त्यांनी तुम्हाला लुटले.
आता लढाईत इतर लोक त्यांना लुटतील.
17 मी तुम्हाला पुन्हा तंदुरूस्त करीन.
तुमच्या जखमा मी बऱ्या करीन.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“का? कारण दुसरे लोक म्हणतात तू बहिष्कृत आहेस.
ते म्हणतात, ‘सियोनाची काळजी करणारे कोणीही नाही.’”
5 जो सिंहासनावर बसलेला होता, तो म्हणाला, “पाहा मी सर्व काही नवीन करीत आहे!” मग तो पुढे म्हणाला, “लिही! कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत.”
6 नंतर तो मला म्हणाला, “पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे, त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. 7 जो विजय मिळवितो, त्याला या सर्व गोष्टी मिळतील, मी त्याचा देव होईन, व तो माझा पुत्र होईल. 8 परंतु भित्रे, विस्वास न ठेवणारे अंमगळ, खुनी, व्यभिचारी, (म्हणजे लैंगिक अनीतीने वागणारे लोक), चेटकी, मूर्तिपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्या तळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे.”
9 मग ज्या देवदूतांच्या हातात सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या होत्या. त्यांच्यापैकी एक देवदूत आला, आणि तो मला म्हणाला, “इकडे ये! जी कोकऱ्याची वधु आहे, ती मी तुला दाखवितो.” 10 मी आत्म्याने भरुन गेलो असता देवदूत मला एका उंच पर्वतावर घेऊन गेला. आणि त्याने पवित्र नगर, यरुशलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले.
11 ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते. त्याचे तेज एखाद्या मोलवान रत्नासारखे होते; स्फटिकासारख्या चमकत असणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते. 12 त्या नगराच्या सभोवती मोठमोठ्या उंच भिंती होत्या. आणि त्याला बारा वेशी होत्या. त्या बारा वेशींजवळ बारा देवदूत उभे होते. आणि त्या वेशींवर इस्राएलाच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती. 13 त्या नगरला पूर्व दिशेला तीन, उत्तर दिशेला तीन, दक्षिण दिशेला तीन आणि पश्चिम दिशेला तीन वेशी होत्या. 14 नगराच्या भिंतीना बारा पाये होते. त्या पायांवर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.
15 नगराची, वेशीची आणि भिंतीची लांबी-रुंदी मोजता यावी म्हणून जो देवदूत माझ्याशी बोलला, त्याच्याजवळ सोन्याची एक मोजपट्टी होती. 16 नगर चौरस आकाराचे होते. त्याची लांबी व रुंदी सारखीच होती. देवदूताने सोन्याच्या मोजपट्टीने नगराचे माप मोजून पाहिले. ते पंधरा हजार मैल [a] भरले. नगराची लांबी, रुंदी व उंची समसमान होत्या. 17 नंतर देवदूताने नगराच्या भिंतीचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 72 मीटर (216 फूट) [b] भरले. देवदूताच्या हाताने देखील माप तेवढेच भरले. 18 नगराच्या भिंती यास्फे रत्नाच्या होत्या. आणि नगर शुद्ध सोन्याचे, चमकाणाऱ्या काचेसारखे होते.
19 नगराचे पाये प्रत्येक प्रकारच्या मोलवान अशा रत्नांनी सजविले होते. पाहिला पाया यास्फे रत्नाचा होता. दुसरा नीळ, तिसरा शिवधातु, चौथा पाचू (पाच), 20 पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकिंथ, बारावा पदमाराग रत्नाचा होता. 21 बारा वेशी बारा मोत्यांनी बनविल्या होत्या. आणि प्रत्येक वेस एकाएका रत्नाची होती. नगरातील रस्ता शुद्ध सोन्याचा, काचेसारखा स्पष्ट होता.
22 त्य नगरात मला कोठेही मंदीर दिसले नाही; 23 प्रभु देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवीत होते, आणि कोकरा हा त्याचा दिवा आहे. 24 राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील. आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडे आणतील. 25 त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही. 26 राष्टांचे वैभव आणि संपत्ती त्या नगरात आणण्यात येतील. 27 जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही. अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.
2006 by World Bible Translation Center