Revised Common Lectionary (Semicontinuous)
पिकलेल्या फळाचा दृष्टांन्त
8 परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या मी एक उन्हाळी फळांची टोपली पाहिली. 2 परमेश्वराने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?”
मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.”
मग परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे. ह्यापुढे मी त्यांच्या पापाकडे दुर्लक्ष करणार नाही. 3 मंदिरातील गाण्याचे रूपांतर विलापिकेत होईल. परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील. लोक गुपचूप, प्रेते उचलतील आणि ढिगावर फेकतील.”
इस्राएलच्या व्यापाऱ्यांना फक्त पैसे मिळविण्यात स्वारस्य आहे
4 माझे ऐका! तुम्ही असहाय्य लोकांना तुडविता
ह्या देशातील गरिबांचा नाश करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात.
5 तुम्ही, व्यापारीलोक म्हणता,
“प्रतिपदा केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू शकू.
शब्बाथ, केव्हा संपेल?
म्हणजे मग आम्हाला गहू विकता येईल?
आम्ही किंमत वाढवू शकतो
आणि माप लहान करू शकतो
तराजू आपल्या सोयीचे करून
आपण लोकांना फसवू शकतो.
6 गरीब कर्ज फेडू शकत नाहीत,
तेव्हा आपण त्यांना गुलाम म्हणून विकत घेऊ.
एका जोड्याच्या किंमतीत आपण
त्या असहाय्य लोकांना विकत घेऊ.
हो! आणि जमिनीवर सांडलेले गहू
आपण विकू शकू.”
7 परमेश्वराने वचन दिले आहे त्याने त्याच्या नावाची, याकोबच्या अभिमानाची शपथ घेऊन वचन दिले.
“त्या लोकांनी केलेली कृत्ये मी कधीही विसरणार नाही.
8 त्या कृत्यांमुळे सर्व भूमी हादरेल.
ह्या देशात राहणारा प्रत्येकजण मृतासाठी रडेल.
मिसरमधील नील नदीप्रमाणे,
संपूर्ण देश वर फेकला जाऊन खाली आदळेल.
देश हेलकावे खाईल.”
9 परमेश्वराने पुढील गोष्टीही सांगितल्या,
“त्या वेळी, मी सूर्याचा दुपारीच अस्त करीन.
स्वच्छ निरभ्र दिवशी, मी जगावर अंधार पसरवीन.
10 मी तुमचे उत्सव शोकदिनांत बदलीन.
तुमची सर्व गाणी ही मृतांसाठीची शोकागीते होतील.
मी प्रत्येकाला शोकप्रदर्शक कपडे घालीन.
मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन.
एकुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो,
तसा मी करीन.
तो फारच कडू शेवट असेल.”
देवाच्या वचनांच्या उपासमारीची भयंकर वेळ येत आहे
11 परमेश्वर म्हणतो,
“पाहा! मी देशात उपासमार आणीन.
ते दिवस येतच आहेत लोकांना भाकरीची भूक नसेल.
ते पाण्यासाठी तहानेले नसतील
परमेश्वराच्या वचनांचे ते भूकेले असतील.
12 लोक मृतसमुद्रापर्यंत
आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील.
परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील.
पण त्यांना ते सापडणार नाहीत.
प्रमुक गायकासाठी दावीदाचे मास्कील (बोधपर स्तोत्र) “दावीद अहीमलेखाच्या घरी आला आहे” असे देवगअदोमीने शौलाकडे येऊन सांगितले त्यावेळचे स्तोत्र
52 बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस?
तू देवाला एक कलंक आहेस.
तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.
2 तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे.
तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस.
3 तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस.
तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते.
4 तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते.
5 म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल.
तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल.
तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.
6 चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन.
ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील.
ते तुला हसतील.
7 व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि
त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”
8 पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे.
मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो.
9 देवा, तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो.
तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो.
जेव्हा आम्ही खिस्ताकडे पाहतो तेव्हा आम्ही देवाला पाहतो
15 तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे
आणि निर्माण केलेल्या
सर्व गोष्टीत तो प्रथम आहे.
16 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही
त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले.
जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे,
सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो, सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत
सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले.
17 सर्व गोष्टी निर्माण होण्याच्या अगोदरपासूनत तो अस्तित्वात आहे.
सर्व गोष्टी त्याच्याद्वारे चालतात.
18 आणि तो शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे.
तो प्रारंभ आहे, मृतांमधून पुनरुत्थान पावलेल्यांमध्ये तो प्रथम आहे.
यासाठी की प्रत्येक गोष्टीत
त्याला प्रथम स्थान मिळावे.
19 कारण देवाने त्याच्या सर्व पूर्णतेत त्याच्यामध्ये राहण्याचे निवडले.
20 आणि ख्रिस्ताद्वारे सर्व गोर्ष्टींचा स्वतःशी म्हणजे त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत,
किंवा स्वार्गांतील गोष्टी असोत समेट करण्याचे ठरविले.
ख्रिस्ताने जे रक्त वधस्तंभावर सांडले त्याद्वारे देवाने शांति केली.
21 एके काळी तुम्ही परके होता आणि तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या दुष्ट कृत्यांमुळे तुम्ही देवाचे शत्रू होता. 22 परंतु आता, ख्रिस्ताच्या शरीरिक देहाने व त्याच्या मरणाने देवाने तुमचा त्याच्याशी समेट घडवून आणला आहे यासाठी की, त्याच्यासमोर पवित्र, निष्कलंक आणि दोषविरहीत असे सादर करावे. 23 तुम्ही तुमच्या विश्वासात दृढ व स्थिर असावे आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली आहे तिच्याद्वारे तुम्हांला दिलेल्या आशेपासून दूर जाऊ नये, ज्याचा मी पौल सेवक झालो.
मंडळीकरिता पौलाचे कार्य
24 आता, तुमच्यासाठी मला झालेल्या दु:खात मला आनंद वाटतो आणि माझ्या स्वतःच्या शरीरात मी ख्रिस्ताचे त्याच्या देहाचे म्हणजे मंडळीच्या वतीने ख्रिस्ताचे जे दु:ख कमी पडत आहे ते मी पूर्ण करीत आहे. 25 देवाच्या आज्ञेप्रमाणे मी एक त्यांच्यापैकी सेवक झालो. ती आज्ञा तुमचा फायदा व्हावा म्हणून दिली होती. ती म्हणजे देवाचा संदेश पूर्णपणे गाजवावा. 26 हा संदेश एक रहस्य आहे, जे अनेक युगांपासून आणि अनेक पिढ्यांपासून लपवून ठेवले होते. परंतु आता ते देवाने त्याच्या लोकांना माहीत करुन दिले आहे. 27 देवाला त्याच्या लोकांना माहीत करुन द्यायचे होते की, विदेशी लोकांमध्ये या वैभवी रहस्याची संपत्ती ख्रिस्त येशू जो तुम्हांमध्ये आहे आणि जो देवाच्या गौरवामध्ये सहभागी होण्याची आमची आशा आहे. 28 आम्ही त्याची घोषणा करतो. प्रत्येक व्यक्तीला सूचना देतो, व प्रत्येक व्यक्तीला शक्य ते ज्ञानाने शिकविण्याचा प्रयत्न करतो यासाठी की, आम्हांला प्रत्येक व्यक्ति ख्रिस्तामध्ये पूर्ण अशी देवाला सादर करता यावी.
मरीया आणि मार्था
38 मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका खेड्यात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करुन आदरातिथ्य केले. 39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. 40 पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभु, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”
41 प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. 42 पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
2006 by World Bible Translation Center