Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरील शेमीनीथवरचे [a] दावीदाचे स्तोत्र.
6 परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस.
रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस.
2 परमेश्वरा माझ्यावर दया कर.
मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे.
मला बरे कर,
माझी हाडे खिळखिळी झाली आहेत.
3 माझे सर्व शरीर थरथरत आहे.
परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे? [b]
4 परमेश्वरा, तू परत ये व मला पुन्हा शक्ती दे.
तू दयाळू आहेस म्हणून मला वाचव.
5 मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत.
मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करु शकत नाहीत.
म्हणून तू मला बरे कर.
6 परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली.
माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे.
माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत.
तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शक्तिहीन, दुबळा झालो आहे.
7 माझ्या शंत्रूंनी मला खूप त्रास दिला.
त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे.
आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहेत.
8 वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा.
का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
9 परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली.
त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले.
10 माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील.
एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील.
अलीशा आणि कुऱ्हाड
6 एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हाला अपुरी पडते. 2 यार्देन नदीवर जाऊन आम्ही लाकूड तोडून आणतो. एकेकजण एकेक ओंडका आणू आणि आमच्यासाठी तिथे राहायला घर बांधू.”
अलीशा म्हणाला, “छान, जा आणि कामाला लागा.”
3 एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.”
अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”
4 तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि झाडे तोडायला लागले. 5 झाड पाडत असताना एकाचे लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ही कुऱ्हाड उसनी मागून आणली होती.”
6 अलीशाने विचारले, “ती पडली कुठे?”
तेव्हा त्याने, लोखंडी कुऱ्हाडीचे पाते पडले ती जागा दाखवली. अलीशाने मग एक काठी घेतली आणि ती त्या जागी पाण्यात टाकली. त्याबरोबर ते पाते काठीबरोबर तरंगत वर आले. 7 अलीशा म्हणाले, “घे ते पाते उचलून.” मग त्या माणसाने पुढे होऊन पाते उचलले.
जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना येशू इशारा देतो(A)
13 “खोराजिना तुझ्यासाठी हे वाईट होईल! बेथसैदा [a] तुझ्यासाठी हे वाईट होइल! कारण जे चमत्कार तुम्हांमध्ये घडले ते जर सोर व सिदोनमध्ये घडले असते तर त्यांनी फार पूर्वीच गोणपाट नेसून राखेत बसून पश्चात्ताप केला असता. 14 तरीसुद्धा सोर व सिदोन यांना न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोपे जाईल. 15 आणि कफर्णहूमा, तुला स्वर्गापर्यंत चढवले जाईल काय? तू तर अधोलोकातच जाशील.
16 “जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो. आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला नाकारतो.”
2006 by World Bible Translation Center