Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवरचे आसाफाचे स्तोत्र
75 देवा, आम्ही तुझी स्तुती करतो.
आम्ही तुझी स्तुती करतो.
तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
2 देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली,
मी बरोबर न्याय करीन.
3 पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल
आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.”
4-5 “काही लोक गर्विष्ठ असतात.
ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते,
परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका.
एवढे गर्विष्ठ बनू नका.’”
6 या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल
अशी कोणतीही शक्ती नाही. [a]
7 देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो.
देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो.
देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
8 देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे.
परमेश्वराच्या हातात पेला आहे.
तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे.
तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.
9 मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन.
मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.
10 मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन
आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.
एका संदेष्ट्याच्या विधवेची अलीशाकडे मदतीसाठी याचना
4 संदेष्ट्यांपैकी एकजण वारला तेव्हा त्याची बायको विधवा झाली. ती अलीशाकडे रडत रडत आली, आणि म्हणाली, “माझा नवरा तुझा सेवक असल्यासारखा होता. परंतु आता तो मरण पावला आहे. परमेश्वराचा तो मान राखत असे हे तुला माहीत आहे. पण तो एका माणसाचे देणे लागत होता. तो माणूस आता माझ्या मुलांना गुलाम करुन घ्यायला येतो आहे.”
2 अलीशा म्हणाला, “मी तुला काय मदत करु? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग.”
तेव्हा ती बाई म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही.”
3 यावर अलीशाने तिला सांगितले, “आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण. 4 मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव.”
5 मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली. 6 अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.”
पण एकही भांडे शिल्लक नव्हते तिचा एक मुलगा तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले.
7 मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल वीक आणि कर्जफेड कर. उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल.”
येशू छळाविषयी सावध करतो(A)
16 “लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा. 17 माणसांविषयी सावध असा. कारण ते तुम्हांला न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांमध्ये ते तुम्हांला फटके मारतील. 18 माझ्यामुळे ते तुम्हांला राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व यहूदीतर लोकांसमोर माझ्याविषयी सांगाल. 19 जेव्हा तुम्हांला अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. त्यावेळेला तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल. 20 कारण बोलाणारे तुम्ही नसून तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
21 “भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्याला विश्र्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांविरूद्ध उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. 22 माझ्यामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल. 23 एका ठिकाणी जर तुम्हांला त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हांला खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावांमध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
24 “विद्यार्थी त्याच्या शिक्षकापेक्षा वरचढ नाही, किंवा नोकर मालकाच्या वरचढ नाही. 25 विद्यार्थी आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे, इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील!”
2006 by World Bible Translation Center