Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाने परमेश्वरापाशी गायलेले स्तोत्र हे स्तोत्र बन्यामीनी कुटुंबातील कुशाचा मुलगा शौल याच्या संबंधी आहे.
7 परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
2 तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल
मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.
3 परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही.
मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो.
4 मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही
आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.
5 जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर.
शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो.
त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.
6 परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे
म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द् लढ.
परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
7 परमेश्वरा लोकांचा निवाडा कर.
सगळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर.
8 परमेश्वरा, माझा निवाडा कर.
मी बरोबर आहे हे
सिध्द् कर मी निरपराध आहे हे सिध्द् कर.
9 वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर.
देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्रदयात डोकावून बघू शकतोस.
10 ज्याचे ह्रदय सच्चे आहे अशांना देव मदत करतो
म्हणून तो माझे रक्षण करेल.
11 देव चांगला न्यायाधीश आहे
आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो.
12-13 देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर
तो त्याचे मन बदलत नाही.
देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे. [a]
14 काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात.
ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
15 ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात.
परंतु ते स्वत:च्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
16 त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल.
ते इतरांशी फार निर्दयपणे वागले.
त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
17 मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे
मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो.
इस्राएलसाठी शोकगीत
5 इस्राएलच्या लोकांनो, हे गीत ऐका हे विलापगीत तुमच्याबद्दल आहे.
2 इस्राएलची कुमारिका पडली आहे.
ती पुन्हा कधीही उठणार नाही.
तिला एकटीलाच सोडून दिले आहे ती धुळीत लोळत आहे.
तिला उठवणारा कोणीही नाही.
3 परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो:
“हजार माणसांना घेऊन
नगर सोडणारे अधिकारी फक्त शंभर माणंसाना बरोबर घेऊन नगर
सोडणारे अधिकारी फक्त
दहा माणसांना घेऊन परततील.”
परमेश्वर इस्राएलला परत येण्यासाठी प्रोत्साहन देतो
4 परमेश्वर इस्राएल राष्ट्राला असे सांगतो,
“मला शरण या आणि जगा.
5 पण बेथेलास शरण जाऊ नका;
गिल्गालला जाऊ नका;
सीमा ओलांडून खाली बैरशेब्यालाही जाऊ नका.
गिल्गालमधील लोकांना कैदी म्हणून नेले जाईल.
आणि बेथेलचा नाश केला जाईल.
6 परमेश्वराकडे जा आणि जगा.
तुम्ही परमेश्वराकडे गेला नाहीत, तर योसेफच्या घराला आग लागेल, ती आग योसेफचे घर भस्मसात करील.
बेथेलमधील ही आग कोणीही विझवू शकणार नाही.
7-9 तुम्ही मदतीसाठी परमेश्वराची याचना करावी.
देवानेच कृत्तिका व मृगशीर्ष यांची निर्मिती केली.
तो परमेश्वरच अंधाराचे रूपांतर सकाळच्या उजेडात करतो.
तोच दिवसाचे परिवर्तन अंधाव्या रात्रीत करतो.
समुद्रातील पाण्याला बोलावून जमिनीवर
ओततो त्याचे नाव ‘याव्हे!’
तो एक मजबूत शहर सुरक्षित ठेवतो.
तर दुसऱ्या भक्कम शहराचा नाश होऊ देतो.”
इस्राएली लोकांनी केलेली पापकर्मे
तुम्ही चांगुलपणा विषात बदलता
तुम्ही न्यायाला मारून धुळीत पडू देता.
मनुष्याचा पुत्र सर्वाचा न्याय करील
31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल. 32 मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. 33 तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.
34 “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे. 35 हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी प्रवासी असता तुम्ही माझा पाहुणचार केलात 36 मी कपड्यांशिवाय होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे समाचारासाठी आलात.
37 “मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले? 38 आम्ही तुला प्रवासी म्हणून कधी पाहिले आणि तुझा पाहुणचार केला? किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? 39 आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्या समाचारास आलो?’
40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे सांगतो: येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.’
41 “मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. 42 ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. 43 मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’
44 “मग ते लोक सुद्धा त्याला उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?’
45 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे सांगतो: माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.’
46 “मग ते अनीतिमान लोक अनंतकाळच्या शिक्षेसाठी जातील, पण नीतिमान अनंतकाळच्या जीवनासाठी जातील.”
2006 by World Bible Translation Center