Revised Common Lectionary (Semicontinuous)
नामानची समस्या
5 नामान हा अरामच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्याला कोड होते.
2 अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलमध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलमधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानच्या बायकोची दासी झाली. 3 ती नामानच्या बायकोला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनमधला संदेष्टा अलीशा याला भेटावे असे मला वाटते. तो यांचे कोड बरे करु शकेल.”
4 नामान मग अरामच्या राजाकडे गेला. त्याने राजाला ही इस्राएलची मुलगी काय म्हणाली ते सांगितले.
5 त्यावर राजा म्हणाला, “तू आत्ताच जा. इस्राएलच्या राजासाठी मी पत्र देतो.”
तेव्हा नामान इस्राएलला निघाला. आपल्याबरोबर त्याने नजराणा घेतला. साडेसातशे पौंड चांदी, सहा हजार सुवर्णमुद्रा आणि दहा वस्त्रांचे जोड घेतले. 6 आपल्या राजाकडून त्याने इस्राएलच्या राजासाठी पत्रही घेतले. पत्रात म्हटले होते: “आणि पत्रास कारण की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे.”
7 इस्राएलच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा आपण दु:खी आणि हतबल झालो आहोत हे दाखवण्यासाठी त्याने आपले कपडे फाडून घेतले. तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे की काय? छे छे! जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. असे असताना अरामच्या राजाने कोड असलेल्या माणसाला उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? तसा विचार केला तर यात काही तरी कारस्थान दिसते. अरामचा राजा काही तरी कुरबूर सुरु करायच्या विचारात आहे!”
8 राजाचे हे दु:खाने कपडे फाडणे आणि अस्वस्थ होणे संदेष्टा अलीशाच्या कानावर गेले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, “तू कपडे का फाडलेस? (तू एवढा दु:खी का होतोस?) नामानला माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलमध्ये संदेष्टा असल्याचे त्याला कळेल.”
9 तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराशी आला आणि दाराबाहेर थांबला. 10 अलीशाने नोकरा मार्फत नामानला निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात सात वेळा स्नान कर म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ, नितळ होशील.”
11 नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “मला वाटले, अलीशा निदान बाहेर येईल, माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवील आणि मला बरे करील. 12 अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलमधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करुन मी शुध्द का होऊ नये?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.
13 पण नामानचे नोकर त्याच्या पाठोपाठ गेले आणि त्यांनी त्याला समजावले. ते म्हणाले. “स्वामी, संदेष्ट्याने तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? मग एखादी साधीशी बाब तुम्ही ऐकायलाच हवी नाही का? ‘आंघोळ कर.’ त्याने तू स्वच्छ, निर्दोष होशील एवढेच तर त्याने सांगितले.”
14 तेव्हा नामानने अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे केले. यार्देन नदीत त्याने सात वेळा बुडी मारुन स्नान केले. त्याने तो स्वच्छ, नितळ झाला. त्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल झाली.
दावीदाचे एक स्तोत्र हे स्तोत्र मंदिरअर्पण करण्याच्या वेळचे आहे.
30 परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस.
तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस
आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.
2 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली
आणि तू मला बरे केलेस.
3 तू मला थडग्यातून वर उचललेस तू मला जगू दिलेस
तू मला खड्ड्यात झोपलेल्या मृत लोकात राहू दिले नाहीस.
4 देवाचे भक्त परमेश्राची स्तुती करतात.
त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात.
5 देव रागावला होता म्हणून
त्याचा निर्णय होता “मृत्यू.”
परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला “जीवन” दिले आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो
परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदी होतो व गात होतो.
6 मी जेव्हा सुरक्षित व निर्धास्त होतो
तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे वाटले.
7 होय, परमेश्वरा तू माझ्याशी दयाळू पणे वागात होतास
तेव्हा कोणीही माझा पराभव करु शकणार नाही असे मला वाटत होते.
परंतु तू माझ्यापासून काही काळापुरता दूर गेलास
आणि मला खूप भीती वाटली.
8 देवा, मी तुझ्याकडे वळलो आणि तुझी प्रार्थना केली.
मी तुला मला दया दाखवण्याची विनंती केली.
9 मी म्हणालो, “देवा, मी मेल्यावर खाली थडग्यात गेलो तर चांगले होईल का?
मेलेले लोक मातीत नुसते झोपतात.
ते तुझी स्तुती करत नाहीत.
आम्ही तुझ्यावर किती अवलंबून आहे हे ते इतरांना सांगू शकत नाहीत.
10 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर दया कर.
परमेश्वरा, मला मदत कर.”
11 मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस.
तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस.
तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुंडाळलेस.
12 परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन.
अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन.
तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल.
एकमेकांना मदत करा
6 बंधूंनो, कोणी दोषात सापडला, तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे. पण ते सौम्यतेच्या आत्म्याने हे करा. आणि स्वतःकडे लक्ष ठेवा. यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये. 2 एकमेकांची ओझी वाहा. अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. 3 कारण जर कोणी स्वतःला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी, तर तो स्वतःची फसवणूक करुन घेतो. 4 प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वतःची इतरांबरोबर तुलना न करता स्वतःविषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल. 5 कारण प्रत्येकाला त्याची स्वतःची जबाबदारी असलीच पाहिजे.
जीवन हे शेत पेरणान्यासारखे आहे
6 ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.
7 तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल. 8 जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. पण जो आत्म्यात बीज पेरतो, त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. 9 जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करु नये. कारण आपण आळस केला नाही, तर योग्य वेळी आपणांस आपले पीक मिळेल. 10 तर मग ज्याप्रमाणे आपणांस संधि मिळेल, तसे सर्व लोकांचे आणि विशेषतः ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करु या.
Paul Ends His Letter
11 पाहा किती मोठे अक्षरे मी लिहिलीत. 12 ज्यांना बाह्य देखावा करणे आवडते, ते तुम्हांला सुंता करुन घेण्याची सक्ती करतात. परंतु ते अशासाठी की ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये. 13 परंतु सुंता करुन घेणारेही नियमशास्त्र पाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते. यासाठी की, त्यांना तुमच्या देहावरुन फुशारकी मारता यावी.
14 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगू नये. त्याच्या द्वारे मला जग वधस्तंभावर खिळलेले, व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. 15 कारण सुंता होणे किंवा न होणे काही नाही, तर नवी उत्पति हीच महत्वाची आहे. 16 तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांति व दया असो.
येशू बहात्तर पुरुषांना कामगिरीवर पाठवितो
10 या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांची [a] नेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले. 2 तो त्यांना म्हणाला, “पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने त्याच्या पिकासाठी कामकरी पाठवावेत यासाठी प्रार्थना करा.
3 “जा! आणि लक्षात ठेवा, लांडग्यात जशी कोंकरे तसे मी तुम्हास या जगात पाठवीत आहे. 4 थैली, पिशवी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करु नका. 5 कोणत्याही घरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा पहिल्यांदा असे म्हणा, ‘या घरास शांति असो!’ 6 जर तेथे शांतिप्रिय मनुष्य असेल तर तुमची शांति त्याच्यावर राहील, परंतु तो मनुष्य शांतिप्रिय नसेल तर तुमची शांति तुमच्याकडे परत येईल. 7 त्या घरात तुम्हांला जे देतील ते खातपीत राहा. कारण कामकरी हा त्याच्या मजुरीस पात्र आहे. या घरातून त्या घरात असे घर बदलू नका.
8 “कोणत्याही नगरात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा आणि जेव्हा ते तुमचे स्वागत करतील तेव्हा, तुमच्यासमोर जे वाढलेले असेल ते खा. 9 तेथील रोग्यांना बरे करा आणि नंतर त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे!’
10 “परंतु तुम्ही एखाद्या गावात प्रवेश कराल आणि त्यांनी जर तुमचे स्वागत केले नाही तर रस्त्यात जा आणि म्हणा. 11 ‘आमच्या पायाला लागलेली तुमच्या गावाची धूळदेखील आम्ही तुम्हांविरुद्ध झटकून टाकीत आहोत! तरीही हे लक्षात असू द्या की, देवाचे राज्य लवकरच तुमच्याकडे येत आहे.!’
16 “जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो. आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला नाकारतो.”
सैतानाचे पतन
17 ते बहात्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले, “प्रभु, तुझ्या नावाने भुतेसुद्धा आम्हांला वश होतात!”
18 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले! 19 ऐका मी तुम्हांला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार दिला आहे. व मी तुम्हांला शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे. आणि कशानेच तुम्हांला अपाय होणार नाही. 20 तथापि तुम्हांला भुते वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वार्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”
2006 by World Bible Translation Center